- देशात महागाई वाढली असून पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या तुटवड्यामुळे महागाईवर थेट परिणाम झाला आहे
- आघाडीची दुग्ध उत्पादक कंपनी अमूलने दुधाच्या दरात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ १४ मे पासून लागू केली आहे
- अमूलच्या सर्व प्रकारच्या दुधांवर या दरवाढीचा परिणाम होणार असून ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत
सध्या देशात महागाई पाहायला मिळत आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या तुटवड्याचा थेट परिणाम या महागाईवर झाला आहे. त्यात महागाईचा आणखी एक फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसला आहे. देशातील आघाडीची दुग्ध उत्पादक कंपनी 'अमूल'ने (GCMMF) दुधाच्या दरात वाढ केली आहे. अमूलने प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली आहे. ही दरवाढ उद्यापासून, म्हणजेच 14 मे पासून संपूर्ण देशभरात लागू होणार आहे. त्यामुळे सर्व सामान्यांच्या खिशाला आणखी कट लागणार आहे. सध्याच्या स्थितीत ही दोन रूपयांची वाढ ही सर्व सामान्यांसाठी न परवडणारीच म्हणावी लागेल.
गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने स्पष्ट केले आहे की, ही दरवाढ अमूलच्या सर्व प्रकारच्या दुधावर लागू असेल. यामध्ये अमूल गोल्ड, अमूल ताझा, अमूल शक्ती, टी-स्पेशल, स्लिम अँड ट्रिम आणि गाईच्या दुधाचा समावेश आहे. या निर्णयामुळे आता ग्राहकांना प्रत्येक लिटरमागे 2 रुपये जादा मोजावे लागतील. दूध उत्पादन आणि वितरणाच्या खर्चात झालेली वाढ लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
गेल्या काही महिन्यांपासून पशुखाद्याच्या किमती आणि वाहतूक खर्च वाढल्याने डेअरी उद्योगावर ताण निर्माण झाला होता. या दरवाढीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.उद्या, गुरुवारपासून जेव्हा तुम्ही अमूल दुधाची पिशवी खरेदी कराल, तेव्हा तुम्हाला वाढीव किमतीत ती खरेदी करावी लागेल. या दरवाढीचा परिणाम हॉटेल व्यवसाय आणि मिठाई उत्पादनांवरही होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आगामी काळात इतर पदार्थांच्या किमतीही वाढू शकतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world