
बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून या निवडणुकीसाठी सगळे पक्ष आपल्या उमेदवारांची नावे घोषित करू लागले आहेत. या रणधुमाळीत अकाली जीवन संपवलेला अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची बहीणही निवडणूक लढवणार असल्याची बातमी समोर आली आहे. दिव्या गौतम असे सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचे नाव आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) पक्षाने तिला उमेदवारी दिली आहे. पाटण्यातील 'दीघा' मतदारसंघातून ती निवडणूक लढवणार असल्याने या मतदारसंघाचा समावेश चर्चेतल्या मतदारसंघांमध्ये झाला आहे. 15 ऑक्टोबर रोजी दिव्या गौतम ही आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तिची पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.
नक्की वाचा: पॉश सोसायटीत रक्ताचे पाट; 11 वर्षांच्या लेकीसमोर गँगस्टर पत्नीची नवऱ्यानं केली हत्या, कारण काय?
भाजप विरूद्ध भाकप मुकाबला
दिव्या गौतम ही बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मामेबहीण आहे. भाकपा (माले) पक्षाने तिला पाटण्यातील दीघा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच्या जागावाटपामध्ये हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला आहे. इंडिया आघाडीतील जागा वाटपात ही जागा भाकपच्या वाट्याला आली आहे.
नक्की वाचा:खरा तो एकची धर्म! मुस्लिम तरुणाने प्रेमानंद महाराजांसाठी केलं असं काही.. येऊ लागल्या धमक्या
कोण आहे दिव्या गौतम?
सुशांत सिंह राजपूत याची मामेबहीण म्हणून दिव्या गौतम जरी परिचित असली, तरी ही तिची एकमेव ओळख नाही. तिने आपल्या बळावर राजकारणात आपले नाव निर्माण करण्याचा प्रयत्न पूर्वीपासून केला आहे. पाटणा विद्यापीठातील पाटणा कॉलेजमधून तिने पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. विद्यार्थी दशेत असल्यापासून ती राजकारणात सक्रिय आहे. 2012 साली AISA तर्फे तिने पाटणा विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. मात्र यात तिला यश मिळाले नव्हते. दिव्या गौतमने पहिल्याच प्रयत्नात बिहार पब्लिस सर्व्हिस कमिशनची परीक्षा पास केली होती आणि तिने यात 64 वा क्रमांक मिळवला होता. यानंतर तिची नियुक्ती अन्न पुरवठा निरीक्षक म्हणून करण्यात आली होती. मात्र तिने सरकारी नोकरी करायची नाही असा निर्णय आधीच घेतला होता. दिव्या सध्या पीएचडी करत असून तिने नेटची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
2020 साली पाटण्याच्या दीघा मतदारसंघातून कोण जिंकलं होतं ?
या आधी झालेल्या म्हणजेच 2020 साली झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत पाटण्यातील दीघा मतदारसंघातून भाजपचे संजीव चौरसिया विजयी झाले होते. त्यांनी 97044 मते मिळवत विजय मिळवला होता. त्यांनी भाकपच्या शशी यादव यांचा पराभव केला होता. यादव यांना 50971 मते मिळाली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world