Heart Attack due to Gas: रात्रीचे जेवण झाल्यानंतर साधारणपणे माणूस विश्रांती घेतो, पण हेच जेवण एखाद्याच्या जीवावर बेतू शकते असा विचारही कोणी केला नसेल. उत्तर प्रदेशातील एका घटनेने सध्या सर्वांनाच हादरवून सोडले आहे. केवळ गॅस झाला म्हणून दुर्लक्ष करणे किती महागात पडू शकते, याचे हे धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. एका 56 वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला असून त्यामागील प्राथमिक कारण ऐकून डॉक्टरही सतर्क झाले आहेत.
काय आहे प्रकरण?
ही खळबळजनक घटना बिजनौर जिल्ह्यातील उमरी गावात घडली आहे. येथील 56 वर्षांचे मोहम्मद साजिद हे आपल्या घरात एकटेच राहत होते. नेहमीप्रमाणे त्यांनी रात्रीचे जेवण केले, पण त्यानंतर बराच वेळ झाला तरी त्यांच्या घरातून कोणतीही हालचाल जाणवली नाही. आजूबाजूच्या लोकांना आणि नातेवाईकांना संशय आल्याने त्यांनी घरात जाऊन पाहिले, तेव्हा साजिद हे मृतावस्थेत आढळले. या घटनेमुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आणि तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले.
( नक्की वाचा : Crime News : 100 तोळे सोने देऊनही सासरच्यांची भूक मिटेना; मुंबईच्या उच्चभ्रू कुटुंबातील छळाची धक्कादायक कहाणी )
पोलीस आणि फॉरेन्सिक टीमची तपासणी
घटनेची माहिती मिळताच नगीना क्षेत्राधिकारी अंजनी कुमार आणि फील्ड युनिटची टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी घराची आणि मृतदेहाची बारकाईने पाहणी केली. साजिद यांच्या शरीरावर मारहाणीच्या किंवा कोणत्याही जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत. त्यामुळे हा घातपात नसावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.

गॅसमुळे हार्ट अटॅक येणे शक्य आहे का?
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक खुलासा क्षेत्राधिकारी अंजनी कुमार यांनी केला आहे. साजिद यांनी जेवण केल्यानंतर त्यांच्या पोटात प्रचंड गॅस तयार झाला होता, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. पोटात गॅसचा दाब वाढल्यामुळे त्याचा थेट परिणाम हृदयावर झाला आणि त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) आला असावा, अशी शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.
अंजनी कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, साजिद यांच्या शरीरावर कोणतीही दुखापत नसल्याने डॉक्टरांनी गॅस्ट्रिक समस्येमुळे हार्ट अटॅक आल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढला आहे. मात्र, मृत्यूचे नेमके आणि अचूक कारण पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. जेवणानंतर होणाऱ्या अपचनाच्या तक्रारीकडे वेळीच लक्ष देणे किती गरजेचे आहे, हेच या घटनेतून अधोरेखित झाले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world