Uttar Pradesh News: लहान मुलांचे खाण्यापिण्याचे हट्ट आपण अनेकदा पुरवतो, पण याच आवडीचा फायदा घेऊन काही लोक किती खालच्या थराला जाऊ शकतात, याचे जिवंत उदाहरण उत्तर प्रदेशच्या देवरिया शहरात पाहायला मिळाले आहे. सातवीत शिकणाऱ्या मुलाला मोमोज खाण्याचे इतके वेड लागले की, त्याने दुकानदारांच्या सांगण्यावरून घरातील तब्बल 85 लाख रुपये किमतीचे दागिने त्यांना नेऊन दिले.
'फ्री मोमोज'चे घातक आमिष
मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसीतील एका मंदिराचे पुजारी विमलेश मिश्रा यांचा मुलगा देवरिया येथे आपल्या कुटुंबासह राहतो. या मुलाला मोमोज प्रचंड आवडत असत. स्थानिक स्तरावर मोमोजचा स्टॉल लावणाऱ्या तीन तरुणांनी ही बाब हेरली. त्यांनी या मुलाला सुरुवातीला मोफत मोमोज दिले आणि त्यानंतर सांगितले की, "जर तू तुझ्या घरातील दागिने आणून दिलेस, तर तुला रोज मोफत मोमोज खायला देऊ."

(नक्की वाचा- 'कागदपत्र कसे जळाले नाहीत? 5 जणांचा मृत्यू, सहावा व्यक्ती कुठे?', अजितदादांच्या सर्वात जवळच्या नेत्याला संशय)
चोरीचा असा झाला उलगडा
या आमिषाला बळी पडून मुलाने हळूहळू घरातील कपाटातून दागिने चोरण्यास सुरुवात केली आणि ते दुकानदारांना दिले. विमलेश मिश्रा यांची बहीण जेव्हा त्यांच्या घरी आली आणि तिने स्वतःचे दागिने मागितले, तेव्हा कपाट उघडले असता सर्वांनाच धक्का बसला. कपाटातील सर्व दागिने गायब होते. घरच्यांनी जेव्हा मुलाकडे कसून चौकशी केली, तेव्हा त्याने रडत रडत सर्व सत्य सांगितले. त्याने कबूल केले की, मोफत मोमोज खाण्यासाठी त्याने हे सर्व दागिने स्टॉल मालकांना दिले आहेत.
पोलीस तपास आणि कारवाई
विमलेश मिश्रा यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तीनही आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत आजच्या बाजारभावानुसार 85 लाख रुपये इतकी आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world