Karnataka Accident: ट्रकच्या धडकेनंतर बसला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू

Karnataka Bus Accident: धडक इतकी भीषण होती की, बसने महामार्गाच्या मध्यभागीच पेट घेतला. बस स्लीपर कोच असल्याने आणि प्रवाशांना बाहेर पडायला मार्ग न मिळाल्याने अनेकजण आतच अडकून पडले.

जाहिरात
Read Time: 2 mins

Karnataka Accident News: ख्रिसमसच्या सुट्ट्यांच्या काळात प्रवासाला निघालेल्या प्रवाशांवर काळाने घाला घातला आहे. चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियुर तालुक्यातील गोरलाथू क्रॉसजवळ राष्ट्रीय महामार्ग 48 वर गुरुवारी पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एका खाजगी स्लीपर कोच बस आणि ट्रकमध्ये झालेल्या धडकेनंतर बसने भीषण पेट घेतल्याने हा अनर्थ ओढवला.

अपघात नेमका कसा झाला?

मिळालेल्या माहितीनुसार, हिरियुरहून बेंगळुरूच्या दिशेने जाणारा एक ट्रक नियंत्रणाबाहेर गेली. या ट्रकने महामार्गावरील दुभाजक ओलांडला आणि समोरून येणाऱ्या खाजगी स्लीपर कोच बसला जोरदार धडक दिली. ही बस बेंगळुरूहून शिवमोग्गाकडे जात होती. धडक इतकी भीषण होती की, बसने महामार्गाच्या मध्यभागीच पेट घेतला. बस स्लीपर कोच असल्याने आणि प्रवाशांना बाहेर पडायला मार्ग न मिळाल्याने अनेकजण आतच अडकून पडले.

(नक्की वाचा- Santosh Deshmukh Case: "मला बोलायचंय", कोर्टाने दोनच शब्दात वाल्मीक कराडचं तोंड केलं बंद, सुनावणीत काय घडलं?)

बचावकार्यात अडथळे

आगीचे स्वरूप अतिशय भीषण असल्याने बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांचा अधिकृत आकडा ऑडिट पूर्ण झाल्यानंतरच जाहीर केला जाईल. जे प्रवासी बसमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले, त्यापैकी अनेकजण गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

(नक्की वाचा-  स्पर्धा जिंकली मात्र जीव गमावला! पंजाबच्या प्रसिद्ध पॉवरलिफ्टरचा आणि इन्फ्लुएन्सरचा स्पर्धेतच मृत्यू)

ट्रक चालकाचा निष्काळजीपणा?

प्राथमिक तपासात ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे समोर येत आहे. चित्रदुर्गचे पोलीस अधीक्षक रणजित यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्ग 48 वरील वाहतूक अनेक तास विस्कळीत झाली होती. हिरियुर ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Advertisement

Topics mentioned in this article