
CJI Bhushan Gavai AI Video Viral : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकील राकेश किशोर यांनी बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला होता. 6 ऑक्टोबर रोजी ही धक्कादायक घटना सर्वोच्च न्यायालयात घडली होती. त्यानंतर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एक खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे. सरन्यायाधीश (CJI)भूषण गवई यांच्या विरोधात कृत्रिम बुद्धीमत्तेचा (AI)चा वापर करून आक्षेपार्ह आणि बदनामीकारक व्हिडीओ बनवण्यात आलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिस ठाण्यात एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.किकी सिंग असं या आरोपीचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपीने AI तंत्रज्ञानाचा गैरवापर करून सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याबाबत अपमानास्पद व्हिडीओ बनवण्यात आला. या व्हिडीओत त्यांच्या खोट्या विधानांचा उल्लेख करून व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला. व्हिडीओच्या माध्यमातून न्यायव्यवस्थेची बदनामी होईल,तसेच न्यायसंस्थेबद्दल जनतेचा विश्वास कमी होईल, असा मजकूर असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळले आहे.
नक्की वाचा >> भोपाळला जाणारं विमान झाडीत कोसळलं! 'त्या' एका चुकीमुळे झाली मोठी दुर्घटना, पाहा विमानाचा थरारक Video
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांच्या प्राथमिक तांत्रिक तपासानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून खोटी माहिती पसरविण्याच्या घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे, असं पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे.सायबर तज्ज्ञांच्या मदतीने या व्हिडिओचा मूळ स्रोत आणि कोणती प्रक्रिया आहे, हे शोधण्याचं काम सुरू आहे. या व्हिडिओच्या प्रसारणात वापरलेले आयपी एड्रेस (IP Adress) आणि डिजिटल फूटप्रिंट तपासले जात आहेत, असं एका पोलीस अधिकाऱ्याने म्हटलं आहे.तसच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल करण्यात आलेला आक्षेपार्ह मजकूर तत्काळ हटविण्यासाठी निर्देशही देण्यात आले आहेत. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
नक्की वाचा >> गोंडस बाळ आईची वाट पाहत होतं, ड्युटी करून आई घरी परतली अन् बाळानं असं काही केलं..Video पाहून डोळे पाणावतील!
न्यायसंस्थेची किंवा कोणत्याही सार्वजनिक व्यक्तीची प्रतिमा मलिन करण्यासाठी तंत्रज्ञानाचा जाणूनबुजून गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा ‘डीपफेक' आणि बनावट AI कंटेंटच्या वाढत्या प्रसाराबाबत चिंता व्यक्त केली जात असून सायबर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, पनवेल तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (SC/ST Act) विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world