
भारताने नुकताच ई-पासपोर्ट (e-Passport) अधिकृतपणे लाँच केला आहे. हा सध्याच्या पासपोर्टचा अत्याधुनिक प्रकार आहे. ज्यात डिजिटल तंत्रज्ञान आणि शारीरिक सुरक्षा यांचा समावेश आहे. एप्रिल 1, 2024 रोजी परराष्ट्र मंत्रालयाच्या एका पायलट प्रोजेक्ट अंतर्गत या सुविधेला सुरुवात झाली. सध्या ही सुविधा निवडक पासपोर्ट कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे. परंतु लवकरच ती देशभरात सुरू केली जाईल. आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सोपा करणे, हे ई-पासपोर्टचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास करताना कुठली ही अडचण यापुढे येणार आहे.
ई-पासपोर्ट म्हणजे काय?
ई-पासपोर्ट म्हणजे सामान्य पासपोर्टचे डिजिटल अपडेटेड रूप. यामध्ये RFID (Radio Frequency Identification) चिप आणि एंटेना बसवलेला असतो. या चिपमध्ये पासपोर्ट धारकाची वैयक्तिक आणि बायोमेट्रिक माहिती (उदा. फिंगरप्रिंट, चेहरा आणि आयरीस स्कॅन) सुरक्षितपणे एन्क्रिप्ट केलेली असते. पारंपारिक पासपोर्टपेक्षा तो वेगळा दिसावा म्हणून, याच्या कव्हरवर एक छोटे सोनेरी चिन्ह (Gold Symbol) असते.
प्रमुख फायदे आणि वैशिष्ट्ये
ई-पासपोर्ट ICAO (International Civil Aviation Organisation) च्या आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तयार केला आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जलद इमिग्रेशन प्रक्रिया. यामुळे एअरपोर्टवर ऑटोमेटेड ई-गेट्स मधून प्रवासाची तपासणी लवकर होते. बायोमेट्रिक सुरक्षेमुळे पासपोर्टची नक्कल करणे किंवा फसवणूक करणे जवळजवळ अशक्य होते. आंतरराष्ट्रीय मान्यता असल्याने विदेश प्रवासासाठी हा एक अधिक सुरक्षित आणि विश्वसनीय पर्याय आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया
ई-पासपोर्टसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सामान्य पासपोर्टसारखीच आहे. पासपोर्ट सेवा पोर्टलवर जाऊन अर्ज भरून, शुल्क भरावे लागते. नंतर पासपोर्ट सेवा केंद्र (PSK) किंवा पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रात (POPSK) अपॉइंटमेंट घेऊन बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनसाठी जावे लागते. या नवीन सुविधेमुळे भारत आता बायोमेट्रिक पासपोर्ट देणाऱ्या देशांच्या यादीत सामील झाला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world