जाहिरात

Fact Check: "भारतात केवळ 9 दिवस पुरेल इतकंच इंधन?" व्हायरल मेसेजवर सरकारचं स्पष्टीकरण

Fuel Shortage Rumors: केंद्र सरकारने देशातील इंधन आणि एलपीजी तुटवड्याच्या अफवांचे खंडन केले असून, भारताकडे पुढील 60 दिवसांचा कच्च्या तेलाचा साठा सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे.

Fact Check: "भारतात केवळ 9 दिवस पुरेल इतकंच इंधन?" व्हायरल मेसेजवर सरकारचं स्पष्टीकरण

इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्धामुळे भारतात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा तुटवडा निर्माण होईल, या सोशल मीडियावरील दाव्यांना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने पूर्णपणे 'खोटे आणि दिशाभूल करणारे' ठरवले आहे. भारताची ऊर्जा सुरक्षा पूर्णपणे भक्कम असून नागरिकांनी भीतीपोटी खरेदीला बळी पडू नये, असे आवाहन सरकारने केले आहे.

पेट्रोल आणि डिझेल रेशनिंगची गरज नाही

ऊर्जा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, भारत हा पेट्रोलियम उत्पादनांचा जगातील 5 वा मोठा निर्यातदार आहे. त्यामुळे देशांतर्गत तुटवडा निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. देशातील सर्व पेट्रोल पंप सुरू असून कुठेही इंधन कपात करण्याचे आदेश दिलेले नाहीत. पंपांवर गर्दी होऊ नये म्हणून तेल कंपन्यांनी पेट्रोल पंपांना देण्यात येणारी 'क्रेडिट मर्यादा' 1 दिवसावरून 3 दिवसांपर्यंत वाढवली आहे.

कच्च्या तेलाची 60 दिवसांची सुरक्षा

होर्मुज जलमार्गातील संकटानंतरही भारताने आपल्या 41 पुरवठादार देशांकडून पुरेसे कच्चे तेल मिळवले आहे.भारताकडे एकूण 74 दिवसांची साठवणूक क्षमता असून सध्या दिवसांचा प्रत्यक्ष साठा उपलब्ध आहे. सर्व भारतीय रिफायनरीज 100% पेक्षा जास्त क्षमतेने सुरू आहेत. त्यामुळे केवळ 6 दिवसांचा साठा शिल्लक असल्याच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत.

(नक्की वाचा-  Central Government on Lockdown: देशात लॉकडाऊनच्या चर्चांदरम्यान केंद्राचं स्पष्टीकरण; सद्यस्थिती काय?)

LPG आणि PNG बाबत स्पष्टीकरण

रिफायनरीमधील एलपीजी उत्पादन 40% ने वाढवून 50 टीएमटी प्रतिदिन करण्यात आले आहे. रशिया, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातून 800 टीएमटी एलपीजी जहाजे मार्गावर आहेत. पाईप्ड नॅचरल गॅस (PNG) स्वस्त आणि सुरक्षित असल्याने त्याचा प्रसार केला जात आहे, एलपीजी संपल्यामुळे नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

(नक्की वाचा-  Kolhapur News: कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलसाठी नवे नियम! इंधन खरेदीवर 31 मार्चपर्यंत मर्यादा)

अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कारवाई

काही समाजकंटक जाणीवपूर्वक जुन्या रांगांचे व्हिडिओ आणि परदेशातील इंधन कपातीच्या बातम्या भारताच्या नावावर खपवून भीती निर्माण करत आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेबाबत अफवा पसरवणे हा कायद्याने गुन्हा असून, अशा व्यक्तींवर सरकार कडक कायदेशीर कारवाई करणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com