जाहिरात

E30 Petrol: इंधन संकटात केंद्र सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोलमध्ये 30% एथेनॉल मिश्रणासाठी नवीन नियम जारी

पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये 30 टक्क्यांपर्यंत एथेनॉल मिश्रण (E30) करण्यासाठी नवीन अधिसूचना जारी केली आहे.

E30 Petrol: इंधन संकटात केंद्र सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोलमध्ये 30% एथेनॉल मिश्रणासाठी नवीन नियम जारी

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि पश्चिम आशियातील इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता तणाव यामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने पेट्रोलमध्ये थेट 30 टक्क्यांपर्यंत एथेनॉल मिश्रण (E30 Fuel) करण्यासाठी नवीन अधिसूचना जारी केली आहे. 'ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स'ने (BIS) E22, E25, E27 आणि E30 या उच्च एथेनॉल इंधन मिश्रणाचे तांत्रिक मानक नोटिफाय केले आहेत.

सध्या थेट विक्री नाही, फक्त तांत्रिक तयारी! 

केंद्र सरकारने जारी केलेल्या या अधिसूचनेचा अर्थ असा नाही की, उद्यापासूनच देशभरात E30 पेट्रोलची विक्री सुरू होईल. सध्या सरकारने केवळ याचे तांत्रिक निकष निश्चित केले आहेत, जेणेकरून भविष्यात जेव्हा हे इंधन बाजारात आणले जाईल, तेव्हा कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही. म्हणजेच, सध्या E30 पेट्रोलची सक्तीची विक्री होणार नसली, तरी सरकार आता E20 इंधनाच्या पुढे जाण्याची पूर्ण तयारी करत आहे, हे यावरून स्पष्ट होते.

(नक्की वाचा-  Beed News: लेकरं बसमध्ये अन् आई प्रियकरासोबत फरार; खिशात ठेवली चिठ्ठी, तर आजोबांचा प्रश्न ऐकून पोलीस चक्रावले)

एथेनॉल ब्लेंडिंगवर अचानक जोर का वाढला?

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत जागतिक चिंता वाढली आहे. जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी सुमारे 20 टक्के पुरवठा 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' (Strait of Hormuz) या सागरी मार्गावरून होतो. या मार्गावर संकट येण्याच्या भीतीने, भारतासारख्या तेलाच्या आयातीवर अवलंबून असलेल्या देशाला पर्यायी ऊर्जा स्रोतांचा शोध घेणे भाग पडले आहे. अशा परिस्थितीत एथेनॉल ब्लेंडिंग हे भारतासाठी एक मोठे शस्त्र ठरणार आहे.

लक्ष्य वेळेच्या आधीच पूर्ण होणार?

यापूर्वी सरकारने पेट्रोलमध्ये 20 टक्के एथेनॉल मिश्रणाचे (E20) उद्दिष्ट 2030 निश्चित केले होते, ते घटवून आता 2025-26 करण्यात आले आहे. आता थेट E30 पर्यंतचे मानक जारी झाल्यामुळे देश वेगाने हरित इंधनाकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे.

(नक्की वाचा-  Nashik News: विवाहितेचा 8 वेळा गर्भपात; कारण ऐकून सारेच हादरले; नाशिकमधील मन सुन्न करणारी घटना!)

वाहन चालकांची चिंता आणि सरकारचे स्पष्टीकरण

सध्या बाजारात मिळत असलेल्या E20 इंधनामुळे जुन्या वाहनांच्या मायलेजवर आणि इंजिनवर परिणाम होऊन मेंटेनेंसचा खर्च वाढू शकतो, अशी भीती वाहनधारकांमध्ये आहे. मात्र, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, E20 इंधनामुळे इंजिन निकामी झाल्याची किंवा वाहनाचे मोठे तांत्रिक नुकसान झाल्याची एकही घटना अद्याप समोर आलेली नाही.

कच्च्या तेलाची आयात कमी करणे आणि देशातील एथेनॉल उत्पादनाला चालना देणे, या दुहेरी उद्देशासाठी सरकारचे हे नवीन धोरण आगामी काळात भारतीय इंधन बाजारपेठेत मोठा बदल घडवून आणणार आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com