IIT Kanpur Student Suicide : सरकारी नोकरीत वारंवार अपयश आल्यामुळे एका गोल्ड मेडलिस्टने स्वत:चं आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आयआयटी कानपूरमधून गोल्ड मेडल जिंकणारे २३ वर्षीय तरुणाने आपल्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. अभ्यासात नेहमी अव्वल असणाऱ्या विद्यार्थ्याने तब्बल ५० वेळा सरकारी नोकरीची परीक्षा दिली होती. मात्र नेहमीच त्याला अपयश आलं.
सॉरी पप्पा, मला माफ करा...हे शब्द बेरोजगारीचं भीषण वास्तव दर्शवतात. हे शब्द या विद्यार्थ्याच्या कुटुंबाला, त्याच्या आई-वडिलांना कायम छळत राहिल. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने एक चिठ्ठी लिहिली होती. त्यात त्याने सात-आठ वेळा 'सॉरी' असं लिहिलं होतं. आपल्या वडिलांची माफी मागताना त्याने लिहिलं, "सॉरी, बाबा, मी सरकारी नोकरीसाठी ५० वेळा प्रयत्न केला, पण मला यश आलं नाही. प्लीज मला माफ करा."
अशी समोर आली घटना...
मिळालेल्या माहितीनुसार, आनंद कुमारच्या घरात काम करणारी महिला येऊन बेल वाजवत होती. दार आतून बंद होतं. बराच वेळ आवाज दिल्यानंतरही काहीच उत्तर मिळालं नाही. शेवटी तिने कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली आणि पोलिसांनाही कळवलं. घटनास्थळी आल्यानंतर पोलिसांनी दार तोडलं. त्यावेळी आनंद कुमार छताला लटकलेल्या अवस्थेत होता .
राज्यपालांकडून मिळालं होतं गोल्ड मेडल...
मृत आनंद कुमार मूळचा बिहारच्या बक्सरचा राहणारा होता. तो अभ्यासात अत्यंत हुशार होता. त्याने २०२४ मध्ये त्याने कानपूरच्या एका प्रतिष्ठित इंजिनियरिंग कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये बिटेक केलं होतं. राज्यात तिसरा रँक मिळाल्यानंतर १३ ऑगस्ट २०२४ रोजी कॉलेजमधील एका कार्यक्रमात राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडून त्याचा गोल्ड मेडलने सन्मान करण्यात आला होता. डिग्री पूर्ण झाल्यानंतर आनंद एका खासगी क्षेत्रात काम करीत होता, सोबतच सरकारी नोकरीचीदेखील तयारी करीत होता. मात्र सातत्याने परीक्षेत नापास होत असल्याने तो तणावात होता.
आनंदचे वडील राजकुमार लोहिया एका खासगी कंपनीचे निवृत्त कर्मचारी आहेत. त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी. आनंदचा मोठा भाऊ आणि बहीण बिहारच्या सरकारी शाळेत शिक्षक आहेत. राजकुमार यांनी पोलिसांना सांगितलं की, ते आपल्या मोठ्या मुलाचं लग्न ठरवण्यासाठी पाच दिवस बिहारला गेले होते. आनंदलाही सोबत यायचं होतं, मात्र शेवटच्या क्षणी त्याने येण्यास नकार दिला. गोविंद नगरचे एसएचओ अशोक कुमार दुबे यांनी सांगितलं की, हे प्रकरण सरकारी नोकरी न मिळाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून केलेल्या आत्महत्येचं असल्याचं दिसत आहे. सध्या पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world