राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी शनिवारी आणीबाणीच्या काळ्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अनेक नेत्यांना तुरुंगात टाकले, मात्र त्यांनी कधीही त्यांच्याशी गैरवर्तन केले नाही, असे लालू प्रसाद यादव यांनी म्हटले. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख असलेल्या लालू यांनी एका पोस्टमध्ये पत्रकार नलिन वर्मा यांनी लिहिलेला "द संघ सायलेन्स इन 1975" हा लेख शेअर केला आहे. लेखात त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर हल्लाबोल करत म्हटले आहे की, 1975 हे साल देशाच्या लोकशाहीवर डाग असला तरी 2024 मध्ये विरोधकांचा आदर कोण करत नाही हे आपण विसरता कामा नये.
'एक्स' वरील पोस्टमध्ये लालू यांनी म्हटले आहे की, त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. त्या काळातील दडपशाहीविरोधात आवाज उठविण्यासाठी जयप्रकाश नारायण यांनी एका समितीचे गठण केले होते. लालू यांनी सांगितले की आपण या समितीचे समन्वयक होतो. ही समिती आणीबाणीच्या विरोधात आंदोलने करण्यासाठी तयार करण्यात आली होती. लालू यांनी सांगितले की मी 'मीसा' (Maintenance of Security Act) कायद्याअंतर्गत ते 15 महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात होते. लालू यांनी म्हटले की आणीबाणीबद्दल बोलणाऱ्या भाजपच्या आजकालच्या अनेक मंत्र्यांना ते ओळकत नाहीत. जे.पी.नड्डा आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील काही मंत्री हे आज स्वातंत्र्याबद्दल भाषणे ठोकतात त्यांच्याबद्दल मी ऐकलंही नव्हतं असं लालू यांनी म्हटले आहे.
त्यांनी आम्हाला कधीही देशद्रोही म्हटले नाही : लालू
राजद प्रमुख असलेल्या लालू प्रसाद यादव यांनी म्हटले की, इंदिरा गांधी यांनी आम्हाला तुरुंगात डांबले मात्र त्यांनी आमच्यासोबत कधीही गैरवर्तन केले नाही. त्यांच्या मंत्र्यांनीही आम्हाला कधी देशविरोधी, देशद्रोही म्हटले नाही. त्यांनी कधीही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती अपवित्र करणाऱ्या, गोंधळ माजवणाऱ्यांना बलकटी देण्याचा प्रयत्न केला नाही. 1975 हे साल देशाच्या लोकशाहीवर डाग असला तरी 2024 मध्ये विरोधकांचा आदर कोण करत नाही हे आपण विसरता कामा नये.
आणीबाणीवर राष्ट्रपतींनी केली होती टीका
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या संयुक्त बैठकीत संबोधित करताना 'आणीबाणी' लागू करण्यावरून टीका केली होती. त्यांनी म्हटले की, "आणीबाणी हा राज्यघटनेवरील हल्ल्याचा सर्वात मोठा आणि काळा अध्याय होता. आणीबाणीच्या काळात देश अराजकाच्या खाईत लोटला गेला होता, मात्र अशा असंवैधानिक शक्तींविरुद्ध देश विजयी झाला."
राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर इंडिया आघाडीची संतप्त प्रतिक्रिया
राष्ट्रपतींच्या या वक्तव्यावर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी टीका केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींना खोटे बोलून भाषण करायला लावून स्वस्तात प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world