
Kishtwar Cloudburst: जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील चशोती भागात ढगफुटीमुळे मोठं नुकसान झालं आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 38 जणांच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. मात्र, मृतांचा आकडा वाढतच आहे. या अपघातात जवळपास 80 जण जखमी झाले आहेत, त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर चशोतीमध्ये NDRF, SDRF सोबतच स्थानिक पोलीस आणि लष्कराचे जवान बचावकार्य करत आहेत. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्यासह इतर नेत्यांनी या घटनेवर अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले आहेत. किश्तवाडमधील चशोती येथे झालेल्या ढगफुटीच्या घटनेशी संबंधित जे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत, ते तेथील भयाण परिस्थितीची साक्ष देत आहेत.
चशोतीचे फोटो पाहून असे वाटते की जणू काही कुणीतरी जमीन दुभंगली आहे. फोटोंमध्ये दूरपर्यंत ढिगारे पसरलेले दिसत आहेत. त्यात वाहनं, बाईक, घर, दुकान सर्वत्र विनाशाचे दृश्य दिसत आहे. या दुर्घटनेत सापडलेल्यांपैकी बहुतांश लोक किश्तवाड जिल्ह्यातील मचैल माता मंदिराच्या यात्रेला निघाले होते, असे सांगण्यात आले.
लंगर चालू होता, तेव्हाच
ढगफुटीची घटना ज्या ठिकाणी घडली, तिथे लंगर चालू होता. ढगफुटी होताच तिथे वेगाने पाणी आले, ज्याच्या तडाख्यात तिथं उपस्थित सर्वजण आले. मचैल माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चशोती गावात हा अपघात गुरुवारी (14 ऑगस्ट) 12 ते 1 च्या दरम्यान झाला. अपघाताच्या वेळी मचैल माता यात्रेसाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते.

साडे 9 हजार फूट उंचीवर मंदीर
साडेनऊ हजार फूट उंचीवर असलेल्या मचैल माता मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी भाविक चशोती गावापर्यंत मोटर वाहनाने पोहोचू शकतात, त्यानंतर त्यांना 8.5 किलोमीटरची पायपीट करावी लागते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, किमान 32 लोकांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे, परंतु मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, आतापर्यंत 65 लोकांची सुटका करण्यात आली आहे.
किश्तवाड जिल्हा प्रशासनाच्या वेबसाइटनुसार, पद्दारमधील मचैल गाव 'चंडी माता'च्या मंदिरामुळे धार्मिक महत्त्वाचे आणि पवित्र ठिकाण बनले आहे. दरवर्षी पहिल्या भाद्रपद संक्रांतीला (15 किंवा 16 ऑगस्ट) जेव्हा पद्दारमधील मंदिरांचे दरवाजे उघडतात, तेव्हा मचैल येथील चंडी माता मंदिराबाहेर एक मोठी जत्रा भरते, जिथे संपूर्ण पद्दारमधील लोक एकत्र येतात आणि देवीची पूजा करून तिचा आशीर्वाद घेतात.
चशोती गाव किश्तवाड शहरापासून सुमारे 90 किलोमीटर दूर आहे. येथे भाविकांसाठी लावण्यात आलेल्या लंगरला (सामुदायिक स्वयंपाकघर) या घटनेचा सर्वाधिक फटका बसला. ढगफुटीमुळे अचानक आलेल्या पुरात दुकाने आणि एक सुरक्षा चौकीसह अनेक इमारती वाहून गेल्या.
( नक्की वाचा : बाबा, आम्ही वाचणार नाही… हर्षिल खोऱ्यातून आला शेवटचा फोन, उत्तरकाशीमधील ही कहाणी वाचून डोळ्यात येईल पाणी! )
मचैल माता मंदिराची वार्षिक यात्रा स्थगित
अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेनंतर मंदिराची वार्षिक यात्रा पुढे ढकलण्यात आली आहे आणि अधिकारी सर्व बचाव कार्यांवर लक्ष केंद्रित करत आहेत. मोठ्या प्रमाणावर बचाव आणि मदत कार्यासाठी पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (NDRF) दोन पथके उधमपूरहून किश्तवाडला पाठवण्यात आली आहेत.

उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, "या भागात मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे." ते स्वतः घटनास्थळी पोहोचत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट वस्तीत अचानक आलेल्या पुरामुळे अनेक घरांना फटका बसला आहे.
#WATCH | J&K | A flash flood has occurred at the Chashoti area in Kishtwar following a cloud burst. Rescue Operations have been initiated.
— ANI (@ANI) August 14, 2025
Latest visuals from the area, showing the extent of damage. pic.twitter.com/pCsgP0GZq2
उपराज्यपालांनी दिले निर्देश
उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या घटनेतील जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर लिहिले, "किश्तवाडमधील चशोती येथे झालेल्या ढगफुटीच्या घटनेने व्यथित आहे. शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या संवेदना आहेत आणि जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. नागरी, पोलीस, लष्कर, एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) आणि एसडीआरएफ (राज्य आपत्ती प्रतिसाद दल) अधिकाऱ्यांना बचाव आणि मदतकार्य अधिक जलद करण्याचे आणि बाधितांना शक्य ती सर्व मदत देण्याचे निर्देश दिले आहेत."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world