Madhya Pradesh News: इंदूरमधील शासकीय महाराजा यशवंतराव रुग्णालयातून वैद्यकीय हलगर्जीपणाचा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. निमोनियावर उपचार घेण्यासाठी दाखल झालेल्या अवघ्या दीड महिन्याच्या चिमुरड्याचा अंगठा नर्सने कात्रीने कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नर्सने आयव्ही (IV) कॅन्युला काढताना कात्रीचा असा वापर केला की त्यात बाळाचा अंगठाच कापला गेला. या घटनेने संपूर्ण आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, दीड महिन्याचा हा चिमुरडा निमोनिया झाल्यामुळे रुग्णालयाच्या चेस्ट वॉर्डमध्ये व्हेंटिलेटरवर होता. बाळाची प्रकृती सुधारल्याने 7 जानेवारी रोजी त्याला डिस्चार्ज मिळणार होता. नर्स आरती क्षत्रिय ही बाळाच्या हाताला लावलेला कॅन्युला काढत होती. यावेळी पट्टी कापताना तिने कात्रीने चक्क बाळाचा अंगठाच कापला. ही बाब लक्षात येताच रुग्णालय प्रशासनाने तातडीने बाळाला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हलवले. तिथे डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून कापलेला अंगठा पुन्हा जोडला आहे. सध्या बाळाची प्रकृती स्थिर आहे.
(नक्की वाचा- Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)
नर्सवर निलंबनाची कारवाई
या गंभीर हलगर्जीपणाची दखल घेत रुग्णालय प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. दोषी नर्स आरती क्षत्रिय हिला तातडीने निलंबित करण्यात आले आहे. नर्सिंग इंचार्ज आणि दोन असिस्टंट नर्सिंग इंचार्ज अशा एकूण तीन अधिकाऱ्यांचे एक महिन्याचे वेतन रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी चार डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली असून त्यांनी नर्सचा जबाब नोंदवला आहे.
(नक्की वाचा- Pune News: पुण्यात बस आणि मेट्रो प्रवास मोफत खरंच शक्य आहे?)
उपमुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले असून, वैद्यकीय आणि सपोर्ट स्टाफच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्यास सांगितले आहे. "अशा प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही," असा सज्जड दमही त्यांनी दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world