
Aurangzeb's Tomb : महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरुन गदारोळ सुरू असताना आता या वादात थेट मुघल वंशजाची एन्ट्री झाली आहे. हिंदू संघटनांकडून औरंगजेबाची कबर पाडण्याची मागणी केली जात असताना आता याच्या संरक्षणासाठी मुघलांचे वंशज पुढे आले आहे. औरंगजेबाच्या कबरीचं संरक्षण करण्याच्या मागणीसाठी मुघल वंशज प्रिन्स याकूब हबीबुद्दीन तुसी यांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवून साकडं घातलं आहे. प्रिन्स याकूब हबीबुद्दीन मुघल कुटुंबांचे उत्तराधिकारी आहेत. त्यांनी या पत्रात त्यांनी कबरीच्या संरक्षणाची मागणी केली आहे. प्रिन्स याकूब हबीबुद्दीन तुसी यांनी हे पत्र भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि स्थानिक पोलीस यंत्रणासह महत्त्वाच्या लोकांना पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पत्रात काय लिहिलंय?
मी मुघल कुटुंबांचा उत्तराधिकारी. शेवटचे मुघल बहादूर शाह जाफर यांचा पणतू आहे. माझे पूर्वज बादशहा औरंगजेब यांची कबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. त्यांच्या इच्छेनुसार त्यांची कबर अत्यंत साधी आहे. गेल्या काही दिवसांपासून काही लोक ही कबर उखडून फेकण्याची मागणी करत आहे. मात्र औरंगजेब यांचा जन्म भारतात झाला आणि ते भारतातच मृत्यू पावले. भारतीय संविधानानुसार प्रत्येक माणसाला या देशात राहण्याचा आणि इथेच मरण्याचा अधिकार आहे. सध्या औरंगजेबाची कबर वक्फची संपत्ती आहे आणि भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिपत्याखाली आहे. काही लोक इतिहासाची मोडतोड करत आहे आणि दोन समाजात वाद लावण्याचा प्रयत्न करत आहेत. असले प्रयत्न हाणून पाडण्याचे सरकारचे काम आहे. मी राष्ट्रपती महोदय यांच्या लक्षात आणून देत आहे की, मी औरंगजेबाची कबर असलेल्या जागेचा मुतवल्ली (वक्फ किंवा मशिदीच्या किंवा त्या संपत्तीचा प्रमुख) आहे. मी त्याचा संरक्षक आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की, या संपत्तीचं महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने संरक्षण करावं. तसंच याबाबत योग्य ते आदेश तातडीने संबंधित यंत्रणांना द्यावेत.
नक्की वाचा - Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यावरुन नवा वाद, नामांतर प्रकरण पेटण्याची शक्यता
छावा या चित्रपटावरुन हा वाद सुरू झाला आहे आणि देशातील वातावरण बिघडलं. त्यामुळे चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकाविरोधात केस दाखल करणार आहे. इतिहासाशी छेडछाड करण्यात आली आहे. औरंगजेब न्यायप्रिय बादशहा होते. ते कट्टरपंथी असते तर खुलताबादहून अवघ्या पाच किलोमीटरवर असलेलं अंजठा-वेरूळ येथील एकही मूर्ती शिल्लक राहिली नसती. औरंगजेबाचा कोणताही धर्म वा समाजाशी वाद नव्हता. त्यांनी सर्व धर्माचा सन्मान केला आहे. मुघलांतील सर्व राजांपैकी औरंगजेबाने सर्वाधिक मंदिराच्या उभारणीसाठी निधी दिला आहे. यामध्ये आसाममधील कामाख्या, उज्जैन महाकाल मंदिरासाठी औरंगजेबाने निधी दिला आहे.
औरंगजेबाच्या कबरीवरुन राजकारण केलं जात आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की, नागरिकांनी इतिहास वाचावा. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविरोधातही पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे. यांच्यासारख्या काही राजकीय नेत्यांमुळे देशाची परिस्थिती बिघडली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासारख्या महत्त्वाच्या पदावर असताना देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या भडकाऊ भाषणामुळे जातीय सलोखा बिघडत आहे. त्यामुळे फडणवीसांचा राजीनामा घ्यावा अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे.
नक्की वाचा - Saugat-e-Modi : 'महाराष्ट्रात घर में घुसकर मारेंगे', ‘सौगात-ए-मोदी' उपक्रमावरुन विरोधकांनी भाजपला घेरलं
हिंदू-मुस्लीन नव्हे बादशहांमधील वाद..
हा बादशहा-बादशहांमधील वाद होता. हा हिंदू-मुस्लीम वाद कधीच नव्हता. औरंगजेबाच्या सैन्यात हिंदू मोठ्या पदावर होते. तर दुसरीकडे शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक मुस्लीमही होते. हा वाद हिंदू-मुस्लिमांचा नाही. शिवाजी महाराज आणि औरंगजेबामधील वाद हा बादशहा-बादशहांमधील होता. यात हिंदू-मुस्लीम वाद नाही. शाहू महाराज 18 वर्षे औरंगजेबाच्या छावणीत राहिले. जर औरंगजेब इतका कट्टर असता तर त्यांनी शाहू महाराजांना इतकी वर्षे का सोबत ठेवलं असतं. हे सर्व इतिहासात नमूद आहे. हिंदू असो वा मुस्लीम, सर्वांनी एकमेकांच्या धर्मांचा मान राखावा आणि कोणाच्याही धार्मिक भावना दुखावू नये.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world