Tiger Conservation : मध्य प्रदेशातील कान्हा व्याघ्रप्रकल्प परिसरात 'कॅनाईन डिस्टेंपर' या घातक विषाणूमुळे पाच वाघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे भारतातील व्याघ्रसंवर्धन प्रणालीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. कान्हा परिसरात पाच वाघांचा मृत्यू 'कॅनाईन डिस्टेंपर' (Canine Distemper Virus) मुळे झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या घटनेची गंभीर दखल घेत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (NTCA) देशभरातील सर्व व्याघ्रप्रकल्पांना सतर्कतेच्या (Alert) नव्या सूचना जारी केल्या आहेत. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याचे आदेश दिले आहेत.
मध्य प्रदेशातील 'सरही' वनपरिक्षेत्रात एका वाघिणीच्या बछड्यामध्ये असामान्य हालचाली आढळल्या. त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी ताब्यात घेऊन नमुने चाचणीसाठी जबलपूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. २०१८ या वर्षी गुजरात येथील गीर अभयारण्यात याच विषाणूमुळे अधिकृतरीत्या २७ सिंहांचा मृत्यू झाला होता. प्रत्यक्षात हा आकडा जास्त असल्याचे बोलले जाते.
कॅनाईन डिस्टेंपर विषाणू काय आहे?
2015 वर्षी पन्ना व्याघ्रप्रकल्पात एका वाघिणीचा मृत्यू झाला होता. २०१२ ते २०१७ दरम्यान भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेने केलेल्या तपासणीत ११ वाघ, १७ बिबट आणि ५४ सिंहांना या विषाणूची लागण झाल्याचे समोर आले होते. कॅनाईन डिस्टेंपर हा विषाणू प्रामुख्याने पाळीव कुत्र्यांपासून वन्य प्राण्यांमध्ये पसरतो. कान्हा येथील मृत्यूंनंतर आता देशातील व्याघ्र संवर्धन व्यवस्था खडबडून जागी झाली असून संपूर्ण भारतातील वाघांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world