पंतप्रधान मोदी रविवारी जळगाव दौऱ्यावर, एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत सस्पेंस कायम

पीआयबीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, या कार्यक्रमामध्ये 11 लाख लखपती दीदींचा सन्माम केला जाणार आहे. या कार्यक्रमात या दीदींना प्रमाणपत्रे देऊन सन्माम केला जाणार आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे रविवारी महाराष्ट्र (Pm Modi in Maharashtra)आणि राजस्थानच्या दौऱ्यावर असणार आहेत. 25 ऑगस्ट रोजी सकाळी 11.15 वाजेच्या सुमारास जळगावमध्ये लखपती दीदी (Lakhpati Didi) संमेलनात सामील होणार आहेत. पीआयबीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, या कार्यक्रमामध्ये 11 लाख लखपती दीदींचा सन्माम केला जाणार आहे. या कार्यक्रमात या दीदींना प्रमाणपत्रे देऊन सन्माम केला जाणार आहे. या कार्यक्रमात 2500 कोटी रुपयांचा रिव्हॉल्व्हींग फंड जारी करण्यात येणार आहे. यामुळे 4.3 लाख स्वयं सहाय्यता गटांच्या 48 लाख सदस्यांना लाभ होणार आहे. या सोबतच या कार्यक्रमात  5 हजार कोटींच्या बँक कर्जाचे वितरणही करण्यात येणार आहे. याचा लाभ 2.35 लाख स्वयंसहाय्यता गटाच्या 25.8 लाख सदस्यांना होईल. लखपती दीदी योजनेअंतर्गत आतापर्यंत 1 कोटी महिला लखपती झाल्या असून 3 कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचे लक्ष्य सरकारने डोळ्यासमोर ठेवले आहे. 

खडसेंबाबत सस्पेंस 

एकेकाळी महाराष्ट्र भाजपमध्ये वजनदार नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकनाथ खडसे यांना युतीची सत्ता आल्यानंतर महसूल खाते देण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांनंतर त्यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. यानंतर खडसे हे नाराज झाले होते. कालांतराने त्यांनी पक्ष सोडला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ते काय भूमिका घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागलेले होते. खडसे यांनी आपली सगळी ताकद त्यांची सून रक्षा खडसे यांच्या पाठीशी उभी केल्याचे दिसून आले होते. रक्षा खडसे यांच्या विजयात त्यांचे सासरे एकनाथ खडसे यांचाही मोठा हात होता. खडसे यांनी पुन्हा भाजपमध्ये परतण्याचे ठरवले आहे. पंतप्रधान जळगावात येत असून याचा फायदा उचलत खडसे स्वगृही परततील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र अद्याप तशी चिन्हे दिसत नाहीयेत. एकनाथ खडसे तसेच भाजप नेते आणि राज्यातील मंत्री गिरीश महाजन यांना खडसे यांच्या पक्षप्रवेशाबाबत विचारले असता त्या दोघांनी यावर बोलणे टाळले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधानांच्या दौऱ्यामध्ये खडसेंचा भाजपमध्ये प्रवेश होणार नाहीये.  
 

Advertisement