जाहिरात

Padma Shri Maruti Chitampalli : वन अधिकारी मारुती चितमपल्ली अरण्यऋषी कसे बनले?

Padma Shri Maruti Chitampalli : वन अधिकारी मारुती चितमपल्ली अरण्यऋषी कसे बनले?
Maruti Chitampalli (Photo X)
मुंबई:

Maruti Chitampalli : ज्येष्ठ लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ आणि वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. सोलापूरच्या गिरणी कामगारांच्या घरात जन्मलेल्या चितमपल्ली आता अरण्यऋषी म्हणून ओळखले जातात. वनाधिकारी म्हणून सरकारी नोकरी करतच त्यांनी वन, वन्यजीव आणि पक्षीशास्त्र या विषयांवर स्वत:ला वाहून घेतलं. त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळी साहित्य निर्मितीही केली आहे. एका ऋषीतुल्य व्यक्तीमत्वाचा सन्मान पद्म पुरस्कारानं करण्यात येतोय, अशी भावना त्यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर व्यक्त होत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

शिक्षण आणि नोकरी

मारुती चितमपल्ली यांनी सोलापूरच्या टी. एम. पोरे स्कूल आणि नॉर्थकोट टेक्निकल हायस्कूलमधून शालेय शिक्षण आणि दयानंद महाविद्यालयातून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुढील व्यावसायिक शिक्षण त्यांनी स्टेट फॉरेस्ट कॉलेज, कोईमतूर आणि बंगळुरू, दिल्ली, कान्हा राष्ट्रीय उद्यान (मध्य प्रदेश), डेहराडून येथील संस्थामधून घेतले. त्याचबरोबर त्यांनी संस्कृत, जर्मन आणि रशियन भाषांचाही अभ्यास केला आहे.

राज्य सरकारच्या वन विभागात 30 वर्ष त्यांनी नोकरी केली. या कार्यकाळात ते मेळघात व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक देखील होते. या प्रकल्पासह कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य यांच्या विकासात त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे.

चितमपल्ली यांची साहित्यसंपदा

'मराठी विश्वकोशा'नं दिलेल्या माहितीनुसार चितमपल्ली यांना तब्बल 18 भाषा येतात. वनधिकारी म्हणून त्यांनी फक्त सरकारी नोकरी केली नाही. नोकरी करत असताना त्यांना समृद्ध निसर्गाचा सहवास लाभला. चितमपल्ली या सहवासात रमले. हा सर्व अनुभव त्यांनी पुस्तकांच्या रुपातून सर्व वाचकांसाठी खुला केला.

पक्षी जाय दिगंतरा, जंगलाचं देणं,  रानवाटा, शब्दांचं धन , रातवा, मृगपक्षिशास्त्र, घरट्यापलीकडे, पाखरमाया, निसर्गवाचन, सुवर्णगरुड, आपल्या भारतातील साप, आनंददायी बगळे, निळावंती , पक्षिकोश चैत्रपालवी, केशराचा पाऊस, चकवाचांदण  : एक वनोपनिषद, चित्रग्रीव, जंगलाची दुनिया, An Introduction to Mrigpakshishastra of Hansdev, नवेगावबांधचे दिवस ही चितमपल्ली यांची महत्त्वाची पुस्तकं आहेत. 

पक्षीशास्त्रज्ञ आणि  वन्यजीव अभ्यासक असलेल्या चितमपल्ली यांनी त्यांचे जंगलाच्या आयुष्यातील अनुभव तसंच संशोधन हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे यासाठी ललित लेखनाचा मार्ग स्वीकारला. सोलापूरमध्ये झालेल्या 79 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

( नक्की वाचा : Padma Award: पद्मश्री पुरस्काराने सन्मानित  चैत्राम पवार कोण आहेत ? )

पक्षी विश्वातील योगदान

पक्षिजगतामधील योगदानाबद्दल चितमपल्ली यांचं नाव सर्वत्र आदरानं घेतलं जातं.  पक्ष्यांचं आयुष्य तसंच सौंदर्य त्यांनी त्यांच्या साहित्यामधून उलगडलं आहे. त्याचबरोबर त्यांनी पक्षिकोशाची निर्मिती देखील केली आहे. या पक्षिकोशात त्यांनी 450 पक्ष्यांची माहिती दिली आहे. तसंच ज्या पक्ष्यांची नावं मराठीमध्ये आढळत नाहीत त्यांचं नामकरण करत मराठी भाषेला समृद्ध केलं आहे.

अद्भुत आणि अपरिचित अरण्यसंस्कृतीसाठी आयुष्य वेचणाऱ्या त्यामधील खजिना जगासमोर उलडणाऱ्या मारुती चितमपल्लींना आज अरण्यऋषी म्हणून ओळखलं जातं.   

चितमपल्ली यांना मिळालेले महत्त्वाचे पुरस्कार

  • विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार
  •  दमाणी साहित्य पुरस्कार 
  •  फाय फाउंडेशन पुरस्कार 
  • अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदेचा सन्मान 
  •  महाराष्ट्र फाउंडेशनचा गौरव पुरस्कार
  •  वेणू मेमन लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड  
  • नागभूषण पुरस्कार 
  •  वसुंधरा सन्मान 
  •  भारती विद्यापीठ जीवनसाधना पुरस्कार

संदर्भ - मराठी विश्वकोश संकेतस्थळ
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: