Rahul Gandhi vs PM Narendra Modi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भाषणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी जोरदार उत्तर दिलंय. राहुल गांधी आणि विरोधक संपूर्ण हिंदू समाजाचा अपमान करत आहेत, असा आक्षेप पंतप्रधानांनी नोंदवला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही मोदींना या विषयावर साथ दिली.
राहुल गांधी यांनी लोकसभेतील भाषणाच्या दरम्यान राज्यघटनेची प्रत तसंच देव-देवतांचे फोटो दाखवले. राहुल यांनी त्यांच्या भाषणात भारतीय जनता पार्टी तसंच त्यांची वैचारिक मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) हल्ला केला. भाजपा आणि संघ संपूर्ण हिंदूंचं प्रतिनिधित्व करत नाहीत, अशी टीका राहुल यांनी केली. राहुल गांधी यांच्या भाषणाच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोनवेळा आक्षेप नोंदवला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणं हा गंभीर मुद्दा आहे, असं मोदी यांनी पहिल्यांदा सांगितलं. दुसऱ्यावेळी पंतप्रधानांनी लोकशाही आणि राज्यघटनेनं मला विरोधी पक्षनेत्याला गांभीर्यानं घ्यावं असं शिकवलं आहे, असं स्पष्ट केलं.
राहुल गांधी यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केल्यानंतर हा गोंधळ सुरु झाला. राहुल यांनी भाजपा आणि RSS वर अल्पसंख्याकांच्या विरोधात हिंसाचार करत असल्याचा आरोप केला. 'आपल्याला महापुरुषांनी अहिंसेची शिकवण दिली आहे. पण, जे स्वत:ला हिंदू म्हणतात ते फक्त द्वेषाची भाषा करतात. तुम्ही हिंदू नाहीत,' असं राहुल गांधी म्हणाले.
( नक्की वाचा : लोकसभा अध्यक्षांचं पहिलंच भाषण विरोधकांना झोंबलं, बिर्ला असं काय म्हणाले? )
काय म्हणाले राहुल?
राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात राज्यघटनेवर योजनाबद्ध पद्धतीनं हल्ला होत असल्याचा आरोप केला. 'आमच्यापैकी काही जणांवर वैयक्तिक हल्ला झाला आहे. आमच्यातील काही नेते जेलमध्ये आहेत. माझ्यावरही हल्ला झाला आहे. 20 पेक्षा जास्त खटले, 2 वर्षांची शिक्षा, मला घराच्या बाहेर काढण्यात आलं. त्यानंतरही माझ्यावर मीडियाकडून हल्ले होत होते. माझी ईडीनं 5 तास चौकशी केली. ती चौकशी मी खूप एन्जॉय केली,' असं राहुल गांधी यांनी सांगितलं.
( नक्की वाचा : "इंदिरा गांधींनी आम्हाला तुरुंगात टाकले मात्र आम्हाला वाईट वागणूक दिली नाही": लालू यादव )
राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात शंकरसह अनेक देवतांची फोटो दाखवली. 'मला भगवान शंकरांपासून कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष करण्याची प्रेरणा मिळाली आहे. शंकराच्या गळ्यात साप आहे. जो कठीण परिस्थितीमध्ये ठाम उभं राहण्याची आपल्याला प्रेरणा देतो. शंकराच्या डाव्या हातामधील त्रिशूल हे अंहिसेचं प्रतिक आहे. त्यांच्या उजव्या हातामध्ये त्रिशूल असतं तर वार करण्याच्या उद्देशानं असतं. पण तसं नाही. आम्ही देखील अंहिसेबरोबर उभे आहोत. आम्ही कोणताही हिंसाचार न करता सत्याचं संरक्षण केलं आहे. तुम्ही भगवान शंकरांची प्रतिमा पाहिली तर हिंदू कधीही भीती, द्वेष पसरवत नाहीत, हे लक्षात येईल,' असं राहुल यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world