'कोणी ऐकत नसेल तर भिंतीवर टांगा', पक्षविरोधी भूमिकेवर राहुल गांधी कोणाला म्हणाले?

यावेळी राहुल गांधींनी शिकाऱ्याची गोष्टही सांगितल्याची माहिती आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे. गेल्या दहा वर्षात संसदेत विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी कोणालाही देण्यात आली नव्हती. मात्र लोकसभेत काँग्रेसचे 99 खासदार निवडून आले आणि राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषविले. दरम्यान एका नेत्याने राहुल गांधींना विचारलेल्या प्रश्नाचं त्यांनी रोखठोक भूमिका मांडली. 

कोणी पक्षविरोधी भूमिका घेत असेल तर पक्ष काय कारवाई करणार असा मुद्दा एका नेत्याने मांडला होता. त्यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, जर कोणी ऐकत नसेल तर शिकार करा आणि भिंतीवरती टांगा. अशा शब्दात राहुल गांधी यांनी रोखठोक भूमिका मांडली. काहींच्या मते काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना हसत खेळत इशारा दिला आहे.

नक्की वाचा - विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधींना मिळणार अनेक अधिकार; किती असेल पगार, काय सुविधा? 

मिळालेल्या माहितीनुसार, कोणी पक्षविरोधी भूमिका घेत असेल तर पक्ष काय कारवाई करणार या प्रश्नावर उत्तर देताना राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना शिकाऱ्याची गोष्ट सांगत इशारा दिला. दोन दिवसांपूर्वी मुंबई युनिटच्या प्रमुख वर्षा गायकवाड यांना बदललं जावं यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिल्याची माहिती समोर आली होती. त्याशिवाय मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भूषण पाटील यांना मुंबई काँग्रेस प्रमुखांकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याचा दावा करण्यात आल्याचं सांगितलं जात होतं. 

त्यामुळे राहुल गांधींच्या या वक्तव्यामागे मुंबईतील वादाची किनार असल्याचं सांगितलं जात आहे.  यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रभारी रमेश चन्नीथला यांना 4 जूलैला मुंबईत जाऊन हा वाद मिटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राहूल गांधी यांच्या इशाऱ्यानंतर अध्यक्षांनी पक्षाविरोधी कारवाई कराल तर खपवून घेतलं जाणार नाही याचा महाराष्ट्रातील नेत्यांना गर्भित इशारा दिल्याचं सांगितलं जात आहे. 

Advertisement

काँग्रेसमध्ये गटाचं राजकारण मारक?
काँग्रेसमध्ये गटातटाचं राजकारण पाहायला मिळतंय. पक्षाच्या भवितव्यासाठी हे मारक असल्याची भूमिका राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. मुंबईत वर्षा गायकवाड विरूद्ध भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांच्यामध्ये वाद पाहायला मिळतो. त्याशिवाय विदर्भात विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्यात मतभेद असल्याचंही सांगितलं जातं. त्यामुळे काँग्रेसमध्ये ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांचं स्वतंत्र गट असल्याचं दिसून येतं.  गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये गटाचं राजकारण सुरू आहे. मात्र राजकीयदृष्ट्या भक्कम होण्यासाठी काँग्रेसला अंतर्गत वाद दूर करणं आवश्यक आहे. आणि राहुल गांधींनी याचसाठी कंबर कसल्याचं दिसून येत आहे.