जाहिरात

'मुलांसाठी दुसरी आई मिळणं कठीण असतं'; राज्यसभेच्या पहिल्याच भाषणात सुधा मूर्तींनी मांडला महत्त्वाचा मुद्दा 

Sudha Murthy's speech in Rajya Sabha : आज पहिल्यांदाच राज्यसभेत त्यांनी भाषण दिलं. त्यांनी आपल्या दहा मिनिटांच्या भाषणाने अनेकांची मनं जिंकली.

'मुलांसाठी दुसरी आई मिळणं कठीण असतं'; राज्यसभेच्या पहिल्याच भाषणात सुधा मूर्तींनी मांडला महत्त्वाचा मुद्दा 
नवी दिल्ली:

इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा आणि प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. 8 मार्च, महिला दिनानिमित्त त्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली होती. आज पहिल्यांदाच राज्यसभेत त्यांनी भाषण दिलं. त्यांनी आपल्या दहा मिनिटांच्या भाषणाने अनेकांची मनं जिंकली.

या भाषणात त्यांनी महिलांमधील गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासारखा महत्त्वाचा मुद्दा मांडला. देशभरातील महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळतय. धक्कादायक बाब म्हणजे चौथ्या स्टेजवर पोहोचल्यानंतर महिलांना कर्करोगाचं निदान होतं. मात्र तोपर्यंत आजार खूप बळावलेला असतो. त्यामुळे वेळीच कर्करोगाचं निदान झालं तर यावर नियंत्रण आणणं शक्य असतं. सुधा मूर्ती यांनी या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर राज्यसभेत सूचना दिल्या. 

त्या म्हणाल्या, जिथं स्त्रीचा सन्मान होतो तिथं देवाचा वास असतो. मात्र स्त्री स्वत:च्या आरोग्याकडे कधीच लक्ष देत नाही. तिचं सर्व लक्ष कुटुंबाकडे असते. अशातच अनेक महिलांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा सामना करावा लागतो. दुर्देवाने याचं निदान तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात होतं. त्यामुळे अशा परिस्थितीत महिलांना वाचवणं कठीण होतं. 

नक्की वाचा - भाषण सुरु असतानाच बसले मोदी, राहुल गांधींवर भडकले अध्यक्ष! नेमकं काय झालं?

सुधा मूर्ती गेल्या 30 वर्षांपासून या विषयासंदर्भात काम करीत आहेत. पश्चिम देशांमध्ये तयार करण्यात आलेली कर्करोग प्रतिबंधक लस 9 ते 14 वयाच्या मुलींना दिली तर भविष्यात उद्भवणारा धोका रोखला जाऊ शकतो. उपचारापेक्षा प्रतिबंध अधिक फायदेशीर असतं. त्यामुळे आरोग्य विभागाने सर्व ठिकाणी ही लस लागू करावी. यावेळी सुधा मूर्ती यांनी आपल्या वडिलांचा किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या, माझे वडील सांगायचे की, माझे वडील सांगायचे एका महिलेचा मृ्त्यू झाला तर रुग्णालयासाठी तो आणखी एक आकडा असतो. पण एक कुटुंब आईला मुकतं. घरातील पुरुष दुसरं लग्न करू शकतो. पण तिच्या लेकरांसाठी दुसरी आई मिळणं कठीण असतं. त्यामुळे सरकारने या महत्त्वपूर्ण विषयाकडे लक्ष द्यावं. सरकारने कोरोना काळात लशीची मोठी मोहीम उभी केली होती. त्यामुळे महिलांसाठी या लशीसाठी मोहीम उभी करणं मोठी बाब नाही. ही लस 1400 रूपयांची आहे. मात्र सरकारची मदत मिळाली तर ही लस 700-800 रूपयांपर्यंत सहज मिळू शकेल. 

याव्यतिरिक्त त्यांनी भारतातील पर्यटन स्थळांवरही आपली भूमिका मांडली. भारतात 42 जागतिक वारसा स्थळे आहेत. मात्र त्या व्यतिरिक्त अनेक स्थळे अद्भूत आहेत. त्यामुळे अशा अघोषिक ठिकाणांकडे लक्ष द्यायला हवं. देशभरातील स्टॅच्यू ऑफ बाहुबली - कर्नाटक, 
मांडू - मध्यप्रदेश, शिवाजी महाराजांचे गड किल्ले - महाराष्ट्र, उनाकोटी - त्रिपूरा, नॅचरल रूट्स ब्रिज - मिझोराम, मुघल गार्डन - काश्मीर ही ठिकाण अत्यंत विलोभनीय आहेत. मात्र दुर्लक्षित आहेत. या ठिकाणांची नावं जागतिक वारसा स्थळांच्या यादीत कशी येतील यासाठी प्रयत्न करायला हवेत.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com