जाहिरात

Sanjay Raut: ईडी पोहोचली थेट उपराष्ट्रपतींच्या दारात? राजीनामा देण्यासाठी समोर ठेवली फाईल; नवा खळबळजनक दावा

Sanjay Raut New Book: 'नरक मे स्वर्ग' या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीमध्ये चक्क देशाच्या माजी उपराष्ट्रपतींबाबत अत्यंत गंभीर आणि खळबळजनक दावे करण्यात आले आहेत.

Sanjay Raut: ईडी पोहोचली थेट उपराष्ट्रपतींच्या दारात? राजीनामा देण्यासाठी समोर ठेवली फाईल; नवा खळबळजनक दावा
Sanjay Raut New Book: शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे.
मुंबई:

Sanjay Raut New Book: शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे.   त्यांच्या 'नरक मे स्वर्ग' या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीमध्ये चक्क देशाच्या माजी उपराष्ट्रपतींबाबत अत्यंत गंभीर आणि खळबळजनक दावे करण्यात आले आहेत. उपराष्ट्रपती पदासारख्या घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीला राजीनामा का द्यावा लागला, यामागचे अदृश्य राजकारण राऊत यांनी या पुस्तकात मांडले आहे. या पुस्तकातून त्यांनी  पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

संजय राऊत यांच्या दाव्यानुसार, माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 21 जुलै 2025 रोजी प्रकृतीचे कारण देत दिलेला राजीनामा हा नैसर्गिक नव्हता, तर तो एका दबावाचा परिणाम होता.

ईडीची फाईल आणि उपराष्ट्रपतींचे निवासस्थान

संजय राऊत यांनी पुस्तकात असा दावा केला आहे की, उपराष्ट्रपतींच्या अधिकृत निवासस्थानातून मोदी सरकारविरोधात काही हालचाली सुरू असल्याची माहिती सरकारला मिळाली होती. हे समजताच सरकार सतर्क झाले आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. सुरुवातीला धनखड यांनी राजीनामा देण्यास नकार दिला, परंतु त्यानंतर त्यांच्यासमोर ईडीने तयार केलेली एक विशेष फाईल ठेवण्यात आली, असा दावा राऊत यांनी केला आहे.

( नक्की वाचा : Rupali Chakankar: भोंदू बाबा खरात प्रकरण नडलं; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रुपाली चाकणकरांचा राजीनामा )
 

जयपूरमधील घराचा व्यवहार आणि परदेशी पैसा

या दाव्यामध्ये आर्थिक व्यवहाराचाही उल्लेख करण्यात आला आहे. जगदीप धनखड आणि त्यांच्या पत्नीने जयपूरमधील त्यांचे घर विकले होते. या विक्रीतून मिळालेल्या पैशांपैकी काही हिस्सा परदेशात पाठवण्यात आला होता आणि या संपूर्ण व्यवहारावर ईडीची करडी नजर होती, असे राऊत यांनी पुस्तकात म्हटले आहे.

 ईडीने या व्यवहाराची स्वतंत्र फाईल तयार करून ती थेट उपराष्ट्रपतींसमोर सादर केली आणि त्यानंतरच त्यांची प्रकृती बिघडली व त्यांनी राजीनामा दिला, असा धक्कादायक आरोप या पुस्तकातून करण्यात आला आहे.

तपास यंत्रणांवर ओढले ताशेरे

संजय राऊत यांनी या प्रकरणाचा संदर्भ देत अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीवर जोरदार टीका केली आहे. तपास यंत्रणा देशाच्या उपराष्ट्रपती पातळीपर्यंत पोहोचल्या होत्या, हे यातून स्पष्ट होते. ईडीने केलेल्या अशा अनेक कारवाया देशाच्या इतिहासातील काळ्या पानांवर लिहिल्या जातील आणि म्हणूनच ईडी ही भारतीय जनता पक्षाची एक शाखा असल्यासारखी काम करते, असे राऊत यांनी आपल्या पुस्तकात स्पष्ट केले आहे.

पुस्तकाची नवी आवृत्ती आणि अतिरिक्त माहिती

संजय राऊत यांच्या 'नरकातील स्वर्ग' या पुस्तकाची हिंदी आणि इंग्रजी आवृत्ती येत्या सोमवारी प्रकाशित होणार आहे. विशेष म्हणजे, मूळ मराठी आवृत्तीपेक्षा या नव्या आवृत्तीत 4 अतिरिक्त प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणांमध्ये देशातील अनेक बड्या राजकीय घडामोडींमागचे पडद्याआडचे राजकारण उघड करण्यात आले असल्याचे समजते. आता या दाव्यांनंतर सत्ताधारी भाजप आणि संबंधित यंत्रणा काय उत्तर देतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com