दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी योगगुरु रामदेव बाबा आणि त्यांची कंपनी पतंजलीला आजही सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. उलट या प्रकरणी 23 एप्रिलला न्यायालयात पुन्हा हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खोटी जाहिरात आणि कोरोनावरील उपचारासंदर्भात दावे करण्यात आले होते. याबाबातची अवमान याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर आज (मंगळवार) सुनावणी झाली.
आपण जे काही केलं आहे ती गोष्ट माफी देण्यासारखी आहे का? न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी बाबा रामदेव यांना केला. त्यावर बोलताना बाबा रामदेव यांनी आमच्याकडून जी काही चूक झाली आहे त्यासाठी आम्ही विनाशर्त माफी मागितली असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त करत तुम्ही पत्रकार परिषद ही घेतली शिवाय जाहिरातीही दिल्या. आम्ही तुम्हाला माफी द्यायची की नाही यावर विचार करु.
तुमचा इतिहास तेच सांगतो. कंपनी किती ही मोठी असली तरी तुम्हाला काही करता येणार नाही. त्यावर बाबा रामदेव यांच्याकडून असं पुन्हा होणार नाही असे सांगण्यात आले. त्यावर अजून तुम्हाला माफ करायचे की नाही असे याचा विचार केला नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. शिवाय तुम्ही एकदा नाही तर तीन वेळी नियमांचे उल्लंघन केल्याचे न्यायालयाने निदर्शनास आणून दिले. त्यावर बाबा रामदेव यांनी असं पुन्हा होणार नाही असं न्यायालयात स्पष्ट केलं.
न्यायाधीशांनी बाबा रामदेव यांच्यावर प्रश्नांची धार सोडत त्यांना अनेक प्रश्ने विचारली आहेत. न्यायाधीश म्हणाले की, तुम्ही इतर औषधांना वाईट ठरवू शकत नाही. "असाध्य रोगांच्या औषधांची जाहिरात करण्यास मनाई आहे." हे तुम्हाला ठाऊक आहे, तरी तुम्ही बेजबाबदारपणे वागत आहात. यावर उत्तर देताना बाबा रामदेव म्हणाले की, "आम्ही हे बोलायला नको होते, आम्ही आतापासून लक्षात ठेवू."
न्यायमूर्ती ए अमानुल्ला, जे सुनावणी दरम्यान तिथे उपस्थित होते त्यांना देखील बाबा रामदेव यांना अनेक प्रश्न विचारले. ते म्हणाले की, माफी "मनापासून" होती का? माफी मागणे पुरेसे नाही. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. ही बाब कोरोना कालावधीशी संबंधित आहे. पतंजलीने 2021 मध्ये कोरोनिल लाँच केले आणि रामदेव यांनी "COVID-19 साठी पहिले पुरावे-आधारित औषध" असे वर्णन केले होते. इंडियन मेडिकल असोसिएशनने कोरोनिलकडे डब्ल्यूएचओ प्रमाणपत्र असल्याच्या “खोट्या दाव्या” विरोधात आवाज ही उठवला होता. या सगळ्यानंतर तुमचा आणखी एक व्हिडीओही व्हायरल झाला होता ज्यात तुम्ही ॲलोपॅथीला मुर्ख आणि पैशाची लूट करणारे असे म्हटले होते. ज्यासाठी आयएमएने माफी मागण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठवली होती. यावर पतंजलीच्या वकिलाने यापुढे उत्पादनांच्या जाहिराती आणि ब्रँडिंगशी संबंधित कायद्याचे उल्लंघन होणार नाही असे सांगितले.