
तामिळनाडूमध्ये सुरु असलेल्या भाषा वादाला (Tamilnadu Language Row) वेगळं वळण मिळालंय. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी राज्याच्या यंदाच्या बजेटमधून '₹' हे चिन्ह हटवलंय. त्याच्या जागी तामिळ चिन्ह ரூ' त्यांनी जाहीर केलं आहे. तामिळनाडू सरकार 2025/26 चे बजेट शुक्रवारी विधानसभेत सादर करणार आहे. त्यापूर्वी त्यांनी रुपयाचे चिन्ह बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सत्तारुढ द्रमुक सरकारनं नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातील त्रिभाषा सूत्रांच्या आधारे राज्यावर हिंदी लादत असल्याचा आरोप केलाय. रुपये चिन्ह हटवणारं तामिळनाडू हे देशातील पहिले राज्य आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
DMK शी कनेक्शन
₹ या चिन्हावर तामिळनाडूमधल्या डीएमके सरकाला आक्षेप आहे. त्यामुळे त्यांनी बजेटपूर्वी त्याच्या जागेवर ரூ चा उपयोग केलाय. पण, महत्त्वाची गोष्ट म्हणजे डीएमकेचे माजी आमदार एन. धर्मलिंगम यांचा मुलगा उदयकुमार धर्मलिंहम यांनीच हे चिन्ह तयार केले आहे.
भारतीय मुद्रा असलेल्या रुपयाचे चिन्ह निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारनं स्पर्धा ठेवली होती. त्यामध्ये 3331 जणांनी लोगो तयार करुन सरकारला पाठवले होते. त्यामध्ये पाच जणांचे लोगो अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले. त्यामधून अखेर ₹ चिन्ह निवडण्यात आले. विशेष म्हणजे ही सर्व प्रक्रिया 2010 साली झाली. त्यावेळी केंद्रात यूपीए सरकार होते.
( नक्की वाचा : देशभर मिळणार थेट उपग्रहातून इंटरनेट कनेक्शन, Starlink मुळे काय होणार आपला फायदा? वाचा सर्व माहिती )
तामिळनाडूमधील दिग्गज नेते पी. चिदंबरम यांनी या चिन्हाचे अनावरण केले होते. त्यावेळी तामिळनाडूमध्ये डीएमके सरकार सत्तेत होते. केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. आजही या दोन पक्षांची आघाडी आहे. 2024 मधील लोकसभा निवडणूक दोघांनी एकत्र लढवली होती. आता एमके स्टॅलिन यांनी हे चिन्ह बदलण्याची घोषणा केल्यानंतर भाजपा आणि अन्य पक्षांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
डीएमके नेते एन. धर्मालिंगम यांनी त्यावेळी मला माझ्या मुलाचा अभिमान आहे. हा तामिळ लोकांसाठी अभिमानाचा क्षण आहे, अशी भावना व्यक्त केली होती. हा लोगो बनवणारे उदय हे डिझाईनर आहेत. ते सध्या आयआयटी गुवाहटी इथं सहाय्यक प्राध्यापक आहेत.
तामिळनाडूमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक
द्रमुकच्या नेत्यांनी 2010 साली जी भावना व्यक्त केली होती त्याच्या विरुद्ध भूमिका आता पक्षानं घेतली आहे. तामिळनाडूमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीपूर्वीच ही चिन्हांची अदला-बदल राज्य सरकारनं केलीय. विधानसभा निवडणुकीत डीएमके आणि AIMDK यांच्यात प्रमुख लढत आहे. भाजपाला मागील लोकसभा निवडणुकीत राज्यात एकही जागा मिळालेली नाही. पण, भाजपाची मतांची टक्केवारी वाढलीय. आगामी निवडणुकीत आणखी पक्षाचा विस्तार करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world