मुख्यमंत्रीपदाची सुत्र हातात घेताच विजय यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. तमिळनाडूच्या राजकारणात अभिनेता ते मुख्यमंत्री असा प्रवास करणाऱ्या थलापती विजय यांनी सत्ता हाती घेताच मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये सर्वात जास्त चर्चा होत आहे ती म्हणजे त्यांचे ज्योतिषी थिरु रिक्की राधान पंडित यांची. विजय यांनी राधान पंडित यांची मुख्यमंत्री कार्यालयात (OSD) विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. राधान पंडित यांनीच विजय यांच्या विजयाची भविष्यवाणी केली होती, जी आता खरी ठरली आहे. त्याचचं बक्षिस विजय यांनी दिल्याची चर्चा आहे.
कोण आहेत राधान पंडित?
राधान पंडित हे तमिळनाडूतील एक प्रसिद्ध आध्यात्मिक मार्गदर्शक आहेत. गेल्या 40 वर्षांपासून ते ज्योतिष क्षेत्रात कार्यरत असून सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ते लोकांना मार्गदर्शन करतात. विशेष म्हणजे, तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचेही ते आध्यात्मिक सल्लागार राहिले आहेत. राजकारणातील अनेक मोठे निर्णय घेण्यापूर्वी जयललिता त्यांचा सल्ला घेत असत, असे मानले जाते. त्यांना आता विजय यांनी आपले ओएसडी बनवले आहे. त्यामुळे ते सरकारमध्ये एका महत्वाच्या पदावर असतील.
विजयाची भविष्यवाणी ठरली खरी
निवडणुकीपूर्वी राधान पंडित यांनी थलापती विजय यांच्या 'टीव्हीके' (TVK) पक्षाचा विजय होईल, असे भाकीत केले होते. निकालानंतर जेव्हा विजय यांचा विजय निश्चित झाला, तेव्हा पंडित यांनी थेट त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन केले होते. आता त्यांना थेट सरकारमध्ये स्थान देऊन विजय यांनी त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. विजय यांनी आपल्या सहीने राधान पंडित यांच्या नियुक्तीचे पत्र काढले आहे.
तमिळनाडू विधानसभेचे चित्र
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजय यांच्या 'टीव्हीके' पक्षाने 234 पैकी 108 जागा जिंकून शानदार कामगिरी केली आहे. जरी त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले नसले, तरी काँग्रेस आणि व्हीसीके (VCK) सारख्या पक्षांनी पाठिंबा दिल्याने विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिवाय डाव्या पक्षांनी ही त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या सत्तेचा मार्ग ही मोकळा झाला. आता त्याचे लक्ष चांगली कामगिरी करण्याकडे आहे. मोफत वीज देण्याचा पहिलाच निर्णय त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर घेतला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world