- राजस्थान सरकारने माऊंट आबू या हिल स्टेशनचे नाव बदलले आहे
- स्थानिक नागरिक, संत-महंत आणि लोकप्रतिनिधींनी अनेक वर्षांपासून माऊंट आबूचे नाव बदलण्याची मागणी केली होती
- नामांतरामुळे आबू परिसरातील सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक वारशाला अधिक बळकटी मिळेल
राजस्थानमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि राज्यातील एकमेव हिल स्टेशन असलेल्या 'माऊंट आबू'चे नाव बदलण्यात आले आहे. हा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी आज राजस्थान विधानसभेत यासंदर्भात घोषणा केली. आता हे ' माऊंट आबू' या नावाने ओळखले जाणार नाही. त्याचे आता नवीन नाव 'आबू राज' असेल असं सरकारने जाहीर केलं आहे. सरकारच्या या निर्णयाचे सिरोही जिल्हा आणि आबू परिसरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत आहे.
'माऊंट आबू'चे नाव बदलून 'आबू राज' करावे, अशी मागणी स्थानिक नागरिक, संत-महंत आणि लोकप्रतिनिधींकडून अनेक वर्षांपासून केली जात होती. क्षेत्रीय आमदार समाराम गरासिया आणि मंत्री ओटा राम देवासी यांनी या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर राज्य सरकारने या मागणीवर शिक्कामोर्तब केल्याने या भागाच्या अस्मितेचा विजय झाल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे आता माऊंट आबू ला आबू राज या नावाने ओळखले जाणार आहे.
येथे ब्रह्माकुमारी संस्थेचे आंतरराष्ट्रीय मुख्यालय असल्याने, या नामांतराचा प्रभाव जगभरातील 140 देशांमध्ये पडणार आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, 'आबू राज' हे नाव या क्षेत्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक वारशाला अधिक बळकटी देईल. या निर्णयामुळे पर्यटनाला नवी चालना मिळून विकासाच्या नव्या वाटा खुल्या होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
माऊंट आबू हे केवळ पर्यटन स्थळ नसून धार्मिक केंद्रही आहे. आता 'आबू राज' या नावाने या परिसराला एक नवीन ब्रँडिंग मिळेल. विशेषतः आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रह्माकुमारीशी जोडलेले लोक या निर्णयाचे स्वागत करत आहेत. यामुळे राष्ट्रीय स्तरावर आबू राजची ओळख अधिक गडद होईल आणि रोजगाराच्या संधीही वाढतील, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world