
India Suspends Postal Services to US from August 25: भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध गेल्या काही दिवसांमध्ये चांगलेच ताणले आहेत. दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेलेले असतानाच टपाल विभागानं मोठा निर्णय जाहीर केलाय. 25 ऑगस्टपासून अमेरिकेकडे जाणाऱ्या सर्व टपाल सेवा तात्पुरत्या थांबवत असल्याची घोषणा टपाल विभागाने केली आहे. अमेरिकेच्या सीमा शुल्क नियमांमध्ये (Customs Rules) या महिन्याच्या शेवटी होणाऱ्या बदलांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
अमेरिकन प्रशासनाने 30 जुलै रोजी जारी केलेल्या 'कार्यकारी आदेश क्रमांक 14324' (Executive Order Number 14324) नुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे. यासोबतच, भारताने 800 अमेरिकन डॉलरपर्यंतच्या वस्तूंच्या शुल्क-मुक्त किमान सूटची (duty free minimum exemption) सवलतही बंद केली आहे.
( नक्की वाचा : Sergio Gor : ट्रम्प यांच्या खास दूताची दिल्लीत नियुक्ती, भारत-अमेरिका संबंधांना मिळणार ‘बूस्टर डोस'? )
काय आहे निर्णय?
अमेरिकेशी वाढलेल्या व्यापारी तणावाच्या काळात टपाल सेवा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच भारतावर 25 टक्के कर (tariff) लावला आहे. याव्यतिरिक्त, रशियन तेल खरेदी केल्यामुळे 25 टक्के अतिरिक्त करही लावला गेला आहे. यामुळे भारतावर एकूण कर 50 टक्के झाला आहे. या कराचा एक भाग 7 ऑगस्ट रोजी लागू झाला आहे, तर दुसरा भाग 27 ऑगस्ट रोजी लागू होणार आहे.
टपाल विभागाने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, "29 ऑगस्टपासून, अमेरिकेला पाठवल्या जाणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय टपाल वस्तूंवर, त्यांची किंमत काहीही असो, 'देश-विशिष्ट आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक शक्ती कायद्या' (IEEPA) नुसार सीमा शुल्क (customs duty) लागू होईल." मात्र, यामध्ये 100 अमेरिकन डॉलरपर्यंतच्या भेटवस्तूंना (gifts) सूट दिली जाईल असेही नमूद केले आहे.
( नक्की वाचा : Mobile Numerology : तुमचा मोबाईल नंबर सांगतो तुमचं भविष्य! लग्न ते आरोग्य सर्व प्रश्नांची मिळतील उत्तरं )
मार्गदर्शक सूचना काय?
नवीन आदेशानुसार, आंतरराष्ट्रीय टपाल सेवा किंवा अमेरिकेच्या सीमा शुल्क आणि सीमा संरक्षण (CBP) द्वारे मंजूर केलेल्या इतर 'पात्र पक्षां'मार्फत माल पाठवणाऱ्या वाहतूकदारांना शुल्क वसूल करणे आणि जमा करणे आवश्यक आहे. प्रसिद्धीपत्रकानुसार, CBP ने 15 ऑगस्ट रोजी या संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. परंतु, 'पात्र पक्षां'ची नियुक्ती आणि शुल्क गोळा करण्याची प्रणाली अद्याप 'अपरिभाषित' (undefined) आहे. या कारणामुळे, अमेरिका जाणाऱ्या हवाई मालवाहतूक कंपन्यांनी भारतीय अधिकाऱ्यांना सांगितले आहे की, ऑपरेशनल तयारीच्या अभावामुळे ते 25 ऑगस्टनंतर माल स्वीकारू शकणार नाहीत.
100 डॉलरपर्यंतच्या भेटवस्तू पाठवता येतील
प्रसिद्धीपत्रकानुसार, टपाल विभागाने 25 ऑगस्ट 2025 पासून अमेरिका जाणाऱ्या सर्व प्रकारच्या टपाल सेवा तात्पुरत्या निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये फक्त पत्रे/दस्तऐवज आणि 100 अमेरिकन डॉलरपर्यंतच्या भेटवस्तूंचा अपवाद असेल." विभागाने पुढे सांगितले की, ज्या ग्राहकांनी आधीच वस्तूंची नोंदणी केली आहे आणि त्यांची डिलिव्हरी होऊ शकत नाही, ते टपाल शुल्क परत मागू शकतात. विभाग 'सर्व भागधारकांशी समन्वय साधून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, आणि लवकरात लवकर सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.'
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world