
भारत आणि पाकिस्तान तणावादरम्यान (India Pakistan Tension) पाकिस्तानकडून वारंवार केल्या जाणाऱ्या चिथावणीखोर कृत्याला भारताकडून जोरदार प्रत्युत्तर (India Strikes Pakistan) देण्यात आलं. पाकिस्तानने भारताला नमवण्याचा हरतऱ्हेचे प्रयत्न केले मात्र त्यातील एकही प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. भारताच्या अत्यंत मजबूत हवाई सुरक्षा यंत्रणेने (Indian Air Defence System) पाकिस्तानचे सगळे हल्ले परतवून लावले. दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधीचा निर्णय झाल्यानंतर तुर्किए आणि अझरबैजान हे दोन देश पाकिस्तानच्या पाठीशी उभे राहिले आहेत. यामुळे या दोन देशांविरोधात भारतीयांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पाकिस्तानने केलेल्या आगळीकीमुळे संपूर्ण देश भारतीय सैन्य दलाच्या पाठीशी एकवटला होता. पहलगाममध्ये निर्दोश पर्यटकांना धर्म विचारून दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. या हल्ल्यामुळे संपूर्ण भारत देश हादरला होता. तुर्किए आणि अझरबैजान या दोन देशांमध्ये भारतीय पर्यटक मोठ्या प्रमाणावर जातात. याचा तिथल्या पर्यटन यंत्रणेला आणि अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होत असतो. ज्या पर्यटकांमुळे हे दोन देश मोठे झाले ते देश पहलगाम येथील निष्पाप पर्यटकांच्या हत्येला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानसोबत उभे राहिले आहेत. ही बाब भारतीयांना अजिबात आवडलेली नाही. यामुळे भारतीयांनी पुन्हा एकदा एकजुटीने या दोन देशांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतावर हल्ला करणाऱ्या, दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानच्या पाठीशी तुर्किए आणि अझरबैजान उभे राहिल्याने या दोन देशात आम्ही पर्यटकांना पाठवणार नाही अशी भूमिका पर्यटन कंपन्यांनी घेतली आहे. अनेक पर्यचकही स्वत:हून पुढे येत या दोन देशांत फिरायला जाण्यासाठी केलेली बुकींग रद्द करत आहेत. तुर्कीये, अझरबैजान यासह चीनवरही ट्रॅव्हल कंपन्या बहिष्कार घालत आहेत. मे ते जुलै यादरम्यान तुर्कीये आणि अझरबैजान या देशांमध्ये वसंत ऋतू असतो. त्यामुळे या काळात पर्यटकांची संख्या सर्वाधिक असते. भारत-पाकिस्तान तणावानंतर भारतातील पर्यटकांकडून या देशांसाठीचं बुकिंग रद्द करण्यास सुरुवात केली आहे. या दोन देशांत टूरचे आयोजन करणाऱ्या संघटनांकडूनही या दोन्ही देशांसाठीच्या सहलींवर बहिष्कार घातला जात आहे. 'देश प्रथम' ही भूमिका घेत देशभरातील पर्यटक असो, ट्रॅव्हल एजंट असो वा टूर कंपन्या; सगळे जण या देशातील सहलींसाठी नकार देत आहे.
काय आहे पर्यायी ठिकाणं?
क्वालिटी ट्रॅव्हल वर्ल्ड प्राव्हेट लिमिटेडचे प्रमुख, प्रसाद पल्लीवाल यांच्याशी NDTV मराठीने संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, "आम्ही तुर्कीये आणि अझरबैजान या देशांमधील पर्यटनावर बहिष्कार घातला आहे. याऐवजी आम्ही पर्यटकांना त्याच बजेटमध्ये आणि तोच आनंद लुटता येईल अशा जवळच्या देशांचा पर्याय सूचवत आहोत. वसंत ऋतूमध्ये तुर्कीये आणि अझरबैजान या देशांमध्ये जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढते."
मे ते जुलै या काळात तुर्किए आणि अझरबैजानमधील हवामान आल्हाददायक असतं. मात्र या काळात फक्त याच देशातील वातावरण चांगलं असतं असं नाही. इतर असे अनेक देश आहेत जे अत्यंत सुंदर असून या काळात त्यांना भेट देता येऊ शकते. प्रसाद पल्लीवाल यांनी सांगितले की आम्ही तुर्किए आणि अझरबैजानसाठी पर्याय सुचवत असून हे पर्याय पाकिस्तानला समर्थन देणाऱ्या देशांपेक्षा चांगले आहेत.
तुर्कीसाठी कोणते पर्याय?
सर्वसाधारणपणे तुर्कीये देशाच्या 8 दिवसांच्या टूरसाठी 1,50,000 ते 1,75,000 इतका खर्च येतो. त्याऐवजी व्हिएतनाम, मॉरिशस, इंडोनेशिया, बाली या देशांचा पर्याय सूचवला जात आहे. जितका खर्च तुर्कीएच्या टूरवर होतो. तितकाच खर्च या पर्यायी देशांच्या सहलीसाठी होत असल्याचं प्रसाद पल्लीवाल यांनी सांगितलं. यामध्ये अत्यंत निसर्ग सौंदर्य आणि ऐतिहासिक ठेवा असलेल्या ग्रीस या देशाचंही नाव घेता येऊ शकतं. मात्र तुर्कीच्या तुलनेत ग्रीससाठीचा खर्च काही टक्क्यांनी वाढू शकतो.
अझरबैजानला कोणते पर्याय?
अझरबैजानला 5 दिवस 6 रात्रीच्या टूरचा खर्च 80 ते 90 हजारांच्या घरात जातो. याऐवजी जॉर्जिया, उझबेकिस्तान, कझाकिस्तान हे या देशांचा पर्याय पुढे ठेवला जात आहे. अझरबैजानच्या बजेटमध्ये तुम्ही हे तीन देश फिरू शकतात. हे देखील मुस्लीम देश असल्यामुळे येथे भव्य पॅलेस आणि सुंदर वास्तूरचना पाहायला मिळतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world