
विशाल पुजारी, प्रतिनिधी
परिस्थिती अत्यंत गरीब, पण मनानं हार नाही मानली, आलेला दिवस कष्ट करुन आणि जिद्द उराशी बाळगून मेंढपाळाच्या पोरानं कोल्हापूरचं नाव मोठं केलं आहे. बिरदेव डोणे या तरुणांन युपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
युपीएससी UPSC परीक्षेत पास झालेल्या बिरदेवच्या कष्टाचं चीज झालं आहे. एका मेंढपाळाच्या मुलाने क्लास वन अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण केल्यामुळे याची जिल्ह्यात काय पण देशात चर्चा आहे. बिरदेव सिद्धाप्पा डोणे असं या तरुणाच नाव आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 551 रँक मिळवून त्यानं अधिकारी होण्याचं स्वप्न साकार केलंय. मात्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्या वेळी देखील बिरदेव हा सीमाभागात मेंढ्या चरण्यासाठी घेऊन गेला होता. निकाल लागल्यानंतर सीमाभागातील एका पालावर बिरदेवचा धनगरी फेटा बांधून अन् घोंगडं देऊन आगळावेगळा सत्कार करण्यात आला.
2024 मध्ये झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल 22 एप्रिल रोजी दुपारी जाहीर झाला. त्यामध्ये बिरदेव उत्तीर्ण झाल्याचं समजताच त्याच्या जन्मगावी कागल तालुक्यातील यमगे येथे बिरदेवच्या अनुपस्थितीत जल्लोष करण्यात आला. निकाल लागल्यानंतर बिरदेव सीमाभागात असलेल्या मेंढपालावर पोहोचला. त्यानंतर त्याचा नातेवाईक आणि मित्र परिवाराकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याच ठिकाणी सीमाभागातील सामाजिक कार्यरकर्त्यांनी देखील त्याला भेट दिली. त्याचा सत्कार केला. बिरदेव जन्मगावी परतल्यानंतर मोठी जंगी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
नक्की वाचा - Rule Change 2025: आजपासून हे नियम बदलले, तुमच्या खिशावर कसा होईल परिणाम?
बिरदेव डोणेनं कोल्हापूरच नाव मोठं केलं
कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्यातील यमगे येथील विद्यामंदीर या शाळेत बिरदेवचं प्राथमिक शिक्षण झाले. जय महाराष्ट्र हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण झाले. त्यानंतर मुरगूडच्या शिवराज विद्यालय ज्युनिअर कॉलेजमध्ये त्याच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं. बिरदेवने उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंजिनिअरिंगची पदवी घेतली. पुण्याच्या सीओईपी या महाविद्यालयात त्याचे इंजिनिअरिंग झालं. त्यानंतर बिरदेवने दिल्लीमध्ये युपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. एका सामान्य कुटुंबातल्या मुलाने यश मिळवल्यामुळे त्याचं कौतुक आहे. विशेषतः एका मेंढपाळाच्या मुलानं देशातल्या मोठ्या परीक्षेत नावलौकिक मिळवल्यामुळे कोल्हापूरच देखील नाव मोठं झालं आहे.
कशी केली युपीएससीची तयारी...
बिरदेवने शिक्षण सुरू असताना यूपीएससी परीक्षेबाबत माहिती घेण्यास सुरुवात केलेली. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना खऱ्या अर्थाने यूपीएससीच्या परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली. यासाठी बिरदेव दिल्ली येथे गेला. दिल्लीमध्ये गेल्यानंतर त्यांनी यूपीएससीचा क्लास सुरू केला. वाझेराम या क्लासमध्ये त्याने प्रवेश घेतला होता. दिल्लीतल्या अभ्यासिकांमध्ये रात्रंदिवस अभ्यास करायचा. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र हे विषय त्याच्या पदवीच्या शिक्षणापेक्षा वेगळे होते. यासाठी त्यांना कसून अभ्यास करण्यास सुरुवात केली. प्रत्येक विषयाची एक ते दोन पुस्तकं त्याने वाचून काढली होती. तसेच जो विषय अवघड असेल त्याबाबत अधिक संदर्भ साहित्य घेतलेले होते. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन्ही लेखी परीक्षांसाठी विविध तज्ज्ञांकडून त्यांनी मार्गदर्शन घेतलेलं होतं. मुलाखतीमध्ये आपलं कौशल्य सिद्ध केलं. परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर यश संपादन केलं.
बिरदेवच आयपीएसच बनण्याचं स्वप्न
बिरदेव लहानपणापासून अभ्यासामध्ये हुशार होता. दहावी आणि बारावीमध्ये मुरगुड केंद्रात तो प्रथम आला होता. अभियांत्रिकी शिक्षण घेत असतानाही त्यानं चांगली कामगिरी दाखवली होती. आता यूपीएससी पास झाल्यानंतर त्याच्या यशाचं कौतुक केलं जात आहे. बिरदेवच यूपीएससी परीक्षेतून आयपीएस व्हायचं हेच स्वप्न आहे. यूपीएससी परीक्षेसाठी द्यावी लागणाऱ्या पद यादीमध्ये त्याने आयपीएसचा उल्लेख देखील केला आहे. यूपीएससीची यादी समोर आली की त्याला कोणती पोस्ट मिळाली हे समजेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world