आपल्या ध्येयाच्या दिशेने न थकता, न थांबता चालणाऱ्या व्यक्तीलाच यशाची फळं चाखता येतात. नुकतेच UPSC च्या परीक्षेचे निकाल समोर आले आहेत. यातील यशस्वी उमेदवारांपैकी अनेकांनी प्रतिकूल परिस्थितीत यश संपादन केलंय. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत निवड झालेले पवन कुमार याचं आयुष्य कच्चा घरात गेलं. मात्र उज्ज्वल भविष्याची इमारत मजबूत करण्यासाठी पवन कुमारने मेहनत केली आणि या अवघड परीक्षेत यश मिळवलं. युपीएससीचा निकाल समोर आल्यानंतर अनेक व्हिडिओ समोर आले. त्यावेळी पवन कुमार याचा व्हिडिओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळलं.
मातीच्या घरात साजरा केला आनंद...
आयएएस अधिकारी अवनीश शरणने आपल्या ट्विटर अकाऊंवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पवन कुमार कच्चा घरात दिसतोय. घराच्या अंगणात दोन म्हशी बांधलेल्या आहेत. तेथेच घरातील सदस्य बसलेत आणि मिठाई वाटत आहेत. या व्हिडिओ शेअर करताना अवनीश शरण लिहितात, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 239 रँक मिळवणारा पवन कुमार इथं राहतो. मेहनती व्यक्ती स्वत:च भविष्य स्वत: लिहितात.
पवन कुमार हा उत्तरप्रदेशातील रघुनाथपूर गावातील. त्याचे वडील व्यवसायाने शेतकरी आहेत. पवनने आपलं शिक्षण इलाहाबाद विद्यापीठातून केलंय आणि त्यानंतर दिल्लीला जाऊन युपीएससीची तयारी केली. पवन कुमारची यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आपल्या अपयशामागे परिस्थितीचं कारण सांगणाऱ्यांना पवन कुमारच्या अनुभवाने धडा मिळेल.
हे ही वाचा-वडिलांचं निधन नंतर आईलाही गमावलं; लेकाने UPSC मध्ये दुसऱ्या क्रमांकावर येत वाहिली श्रद्धांजली
16 एप्रिल रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला असून लखनऊचा आदित्य श्रीवास्तव याने ऑल इंडिया रँक पहिला पटकावला आहे. तर द्वितीय क्रमांकावर अनिमेष प्रधान आणि तृतीय क्रमांकावर अनन्या रेड्डी आहे. विशेष म्हणजे यंदा टॉप करणाऱ्या पहिल्या पाचातील तीन उमेदवार आधीच IPS अधिकारी आहेत. पहिला रँक मिळवणारा आदित्य श्रीवास्तव, चौथा रँक मिळवणारा सिद्धार्थ रामकुमार आणि पाचवा रँक मिळवणारे रूहानी हे तिघे हैद्राबादमध्ये नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये IPS चं प्रशिक्षण पूर्ण करीत आहेत. गेल्या अकरा वर्षात पहिल्यादांच सेवेत असताना कोणी आयपीएसने या परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला आहे. यापूर्वी 2013 मध्ये आयपीएस अधिकारी गौरव अग्रवाल यांनी युपीएससीच्या परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला होता.