उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हा रुग्णालयातील एका डॉक्टराने उपचाराच्या नावाखाली लाच मागितली आणि ती न मिळाल्यामुळे एका 14 वर्षांच्या मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या दिव्यांग मुलीचा पाय जबरदस्तीने मोडल्याचा आरोप तिच्या पीडित आईने केला आहे. न्याय मागण्यासाठी ही विधवा माता जेव्हा आपल्या मुलीला घेऊन जिल्हा दंडाधिकारी (डीएम) कार्यालयात पोहोचली, तेव्हा तिची आपबीती ऐकून उपस्थित सर्वजण अवाक झाले.
सरकारी आदेशाला केराची टोपली
पीडित महिला रेशमा हिने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे दीड महिन्यांपूर्वी तिच्या मुलीच्या उजव्या पायाचे हाड तुटले होते. ती मुलीला घेऊन जिल्हा रुग्णालयात गेली असता, तेथील डॉक्टरांनी शस्त्रक्रियेसाठी 25 हजार रुपयांची लाच मागितली. पतीच्या निधनानंतर कुटुंबाचा गाडा एकटीने ओढणाऱ्या रेशमाने पैसे देण्यास असमर्थता दर्शवली, तेव्हा डॉक्टरांनी उपचार करण्यास साफ नकार दिला.
या प्रकारानंतर पीडित मातेने थेट जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे (DM) धाव घेतली. डीएम यांनी या प्रकरणाची दखल घेत मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना (CMO) मुलीवर मोफत उपचार करण्याचे सक्त निर्देश दिले. मात्र, या सरकारी आदेशानंतरही डॉक्टरांचे वर्तन बदलले नाही. डीएमकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून डॉक्टरांनी पुन्हा उपचारास नकार दिला. अखेर हताश झालेल्या आईने व्याजाने कर्ज काढून 8 हजार रुपये दिले. ज्यानंतर मुलीचे ऑपरेशन करण्यात आले. मात्र डॉक्टर उर्वरित पैशांची मागणी करतच राहिला.
(नक्की वाचा- मारुती सुझुकीचं ऐतिहासिक पाऊस, देशातील पहिली 'WagonR Flex Fuel' कार लाँच; शेतकऱ्यांना होणार फायदा)
तपासणीच्या बहाण्याने अमानुष अत्याचार
ऑपरेशन झाल्यानंतर काही दिवसांनी रेशमा मुलीला नियमित तपासणीसाठी पुन्हा रुग्णालयात घेऊन गेली होती. आरोप आहे की, तिथे हजर असलेले डॉक्टर चतुर्वेदी यांनी थकीत पैशांची मागणी करत अत्यंत उद्धटपणे बोलण्यास सुरुवात केली. रेशमाने पुन्हा हतबलता व्यक्त केल्यावर, संतापलेल्या डॉक्टरांनी दिव्यांग मुलीचा गुडघा इतक्या निर्दयीपणे मुरगळला की ती वेदनेने विव्हळली. रेशमाच्या सांगण्यानुसार, पाय मुरगळताना हाड तुटल्याचा स्पष्ट आवाज आला होता.
या अमानुष कृत्याला विरोध केला असता डॉक्टरांनी त्यांना धक्के मारून रुग्णालयातून बाहेर हाकलून दिले. रात्री मुलीच्या पायाला मोठी सूज आली आणि ती वेदनेने तळमळत राहिली. त्यानंतर आईने खाजगी लॅबमधून मुलीचा डिजिटल एक्स-रे करून घेतला. या एक्स-रे रिपोर्टमध्ये मुलीच्या पायाचे हाड पुन्हा तुटल्याचे स्पष्ट झाले.
(नक्की वाचा- VIDEO: 25 रुपये कशाचे घेता? रायगडाचं पावित्र्य राहणार आहे का? महिलेचा रुद्रावतार, कर्मचाऱ्यांना झाप झाप झापलं)
प्रशासनाकडून चौकशीचे आश्वासन
या संवेदनशील प्रकरणावर मुझफ्फरनगरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (CMO) सुनील तेवतिया यांनी म्हटलं की, "दुसरी बाजू ऐकल्याशिवाय किंवा तांत्रिक सल्ला घेतल्याशिवाय या टप्प्यावर कोणतेही विधान करणे घाईचे ठरेल. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन यावर सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीत डॉक्टर किंवा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा अथवा बेकायदेशीर वसुली सिद्ध झाल्यास, संबंधितांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल." सध्या ही पीडित माता आपल्या लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी डीएम कार्यालयाबाहेर ठिय्या मांडून बसली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world