एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच उष्णतेचा पारा चांगलाच वाढला आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. 2024 च्या तुलनेत 2025 या वर्षात तुम्हाला सर्वाधिक उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागणार आहे. हवामान विभागाने गुजरातसह उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये अलर्टची घोषणा केली आहे.
कोणत्या राज्यांना सर्वाधिक धोका?
रेड अलर्ट-
गुजरात राज्य रेड झोनमध्ये आहे.. गुजरातच्या काही भागात 6 ते 10 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट असेल. सौराष्ट्र आणि कच्छ या भागांमध्ये पुढील दोन दिवस तीव्र उष्णतेचा सामना करावा लागेल. हवामान विभागाने गुजरात राज्यासाठी रेड अलर्ट जारी केलाय.
ऑरेंज अलर्ट-
गुजरातनंतर राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येईल
इथेही पुढील 4 दिवस उष्णतेच्या लाटा वाहतील.. त्यामुळे राजस्थानमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय..
यलो अलर्ट-
तर हिमाचल प्रदेश, हरियाणा, चंदीगड, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.. 10 एप्रिलपर्यंत या राज्यांमध्ये प्रचंड उकाडा आणि तप्त लाटांचा प्रभाव असेल... या सर्व राज्यांमध्ये उष्णतेचा पारा 40 ते 45 अशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे..
गुजरात, राजस्थान आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये नेमकी काय स्थिती असेल
उष्णता वाढण्याचं नेमकं कारण काय?
हवामान तज्ज्ञ अखिल श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारणपणे मे आणि जून महिन्यात तीव्र उष्णतेचं वातावरण असतं. मात्र गेल्या दोन वर्षांतली परिस्थिती पाहिली तर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्ण वारे वाहू लागलेत. यालाच हिटवेव असही म्हणतात. हिटवेवमुळे सपाट प्रदेशातलं तापमान 40 ते 45 अंश सेल्सिअस, किनारी भागातील तापमान 37 अंश सेल्सिअस आणि डोंगराळ भागातलं तापमान 30 अंशावर पोहोचतं. अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या अँटी-सायक्लॉन वादळामुळे राजस्थान आणि गुजरातच्या दिशेने उष्ण वारे वाहत आहेत. समुद्राकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडावा येतो. परंतू अँटी सायक्लॉन सक्रिय झाल्यामुळे सध्या उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. बाष्पीभवनाच्या प्रक्रियेदरम्यान हे वारे वर न जाता जमिनीच्या दिशेने वाहू लागतात.
नक्की वाचा - थेट ताव मारा...! APMC मध्ये हापूसची बंपर एन्ट्री; किंमत घसरल्याने हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात
गेल्या दहा वर्षात उष्णतेच्या लाटांमध्ये तीन पट वाढ...
दरम्यान उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेचा पारा दरवर्षी नवनवे विक्रम रचतोय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जास्तच उकाडा वाढला आहे. असं आपल्यालाही जाणवतंय. याबाबत जागतिक हवामान संघटनेकडून फारच चिंताजनक माहिती समोर आली आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये उष्णतेच्या लाटांमध्ये तीन पट वाढ झाली आहे. त्यामुळे 2025 हे वर्ष आतापर्यंत सर्वात उष्ण वर्ष ठरू शकतं.
2015 या वर्षात 161 दिवस उष्णतेच्या लाटांचा प्रभाव होता..
- 2016 मध्ये 170 दिवस
- 2017 मध्ये 188 दिवस
- 2018 मध्ये 96 दिवस
- 2019 मध्ये 178 दिवस
- 2020 मध्ये 40 दिवस
- 2021 मध्ये 52 दिवस
- 2022 मध्ये 365 दिवस
- 2023 मध्ये 230 दिवस होता
- आणि 2024 मध्ये उष्णतेच्या लाटांचा प्रवाह वर्षभर सुरूच राहिला..
हवामान बदलामुळे पावसाळा आणि हिवाळा या ऋतूंमध्येही उष्णतेच्या लाटा थांबलेल्या नाहीत.
नक्की वाचा - Navi Mumbai Water issue: कोट्यवधींची अलिशान घरे, पण पाण्यावाचून तहानलेली
उष्माघातामुळे किती जणांचा मृत्यू?
दरम्यान देशात उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूंच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ झाली आहे. 2024 मध्ये उष्माघातामुळे 733 जणांचा मृत्यू झाला. तर 41 हजार 789 लोकांना उष्माघाताची लागण झाली होती. तर महाराष्ट्रात 241 जणांनी उष्माघाताने जीव गमावला. गेल्या पाच वर्षात उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत चिंताजनक वाढ होत आहे.
- 2020 मध्ये उष्माघातामुळे 25 जणांचा बळी गेला
- 2021 मध्ये हा आकडा शून्य होता
- तर 2022 मध्ये उष्माघाताच्या मृत्यूंचा आकडा थेट 90 वर गेला
- 2023 मध्ये 111 मृत्यू आणि 2024 मध्ये मृत्यूची संख्या 733वर गेलीय..
- गेल्या 10 वर्षांच्या तुलनेत 2024 चा उन्हाळा फारच जीवघेणा ठरलाय..
- 2024च्या तुलनेत 2025 वर्षात अधिक कडक उन्हाळ्याची शक्यता वर्तवली जातेय.
दरम्यान, सध्या हवामान बदलाचा मोठा फटका जगभरातील अनेक देशांना बसत आहे. याचा आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. उष्माघातापासून बचावासाठी कोणती काळजी घेता येईल.
उष्माघातापासून बचावासाठी कोणती काळजी घ्याल?
- भरपूर पाणी आणि फळांचा रस प्या
- मद्यपान, साखर आणि कॅफीन टाळा
- घर थंड ठेवण्यासाठी वेगवेगळे उपाय करा
- घरात हवा खेळती ठेवा, दार-खिडक्या उघडे ठेवा
- बंदिस्त ठिकाणी जास्त काळ थांबू नका
- योग्य कपडे निवडा आणि सनस्क्रिनचा वापर करा
- हवामानसंबंधित माहितीवर लक्ष ठेवा
- त्यानुसार घराबाहेर पडण्याचं नियोजन करा
उष्माघातापासून संरक्षणासाठी आरोग्यतज्ज्ञ डॉ. अविनाश भोंडवे यांनी काय उपाय सुचवलेत?
उष्णतेच्या लाटांचा फटका फक्त भारतातच नाही तर जगभरातील देशांना सोसावा लागतोय. 2025मध्ये अमेरिका, दक्षिण कोरिया, जपान या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता वाढलीय. उष्णतेच्या प्रमाण वाढल्यामुळे इथली वनसंपदा धोक्यात आलीय. जंगलांमध्ये वणव्यांमुळे पेटलेली आग फोफावतेय. हवामान बदलामुळे जगभरातील सर्वच देशांना उष्णतेचा सामना करावा लागतोय. हवामान बदलाच्या संकटावर काम करणं ही एका देशाची जबाबदारी नसून ती जागतिक जबाबदारी आहे. हवामान संकटाचा सामना करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक देशाला एकजुटीने काम करावे लागेल.