
Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी (22 एप्रिल) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बहुतांश पर्यटकांचा समावेश आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळ्या झाडण्यापूर्वी त्यांना 'कलमा' म्हणायला सांगितला, अशी माहिती या हल्ल्यात वाचलेल्या त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. इस्लाममधील हा पवित्र श्लोक म्हणता आला नाही म्हणून त्यांची हत्या झाली, असंही त्यांनी सांगितलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कलमा म्हणजे काय?
कलमा हा अरबी शब्द आहे. त्याचा अर्थ 'शब्द' किंवा 'विधान' असा होतो.
हे शब्द नवजात मुलाच्या कानात सांगितले जातात. दररोज पाच नमाजाच्या वेळी त्याची पुनरावृत्ती होते. मृत्यूच्या वेळी आपल्या ओठावर हेच शब्द असतील असं इस्लाममधील सश्रद्ध व्यक्तींची इच्छा असते. देव एकच असून प्रेषित मोहम्मद हेच त्याचे अंतिम दूत आहेत, अशी भावना यामधून व्यक्त करण्यात येते.
इस्लाममध्ये कलमाचे 6 प्रकार आहेत
- कलमा तय्यब (Kalima Tayyib) - यामध्ये अल्लाह आणि मोहम्मद पैंगबर यांचे एकत्व घोषित करण्यात येते.
- कलमा शहादा (Kalima Shahada) - यामध्ये श्रद्धेची खात्री दिली जाते. एखादी व्यक्ती इस्लामचा स्वीकार करते त्यावेळी याचे अनेकदा पठण केले जाते.
- कलमा तमजीद (Kalima Tamjeed) - अल्लाहची महानता आणि दया यांचा गौरव करण्यात येतो.
- कलमा तौहिद (Kalima Tawheed) - अल्लाहची एकता तसंच जीवन आणि मृत्यूवरील त्याच्या सामर्थ्यावर भाष्य
- कलमा अस्तगफर (Kalima Astaghfar) - ज्ञात आणि अज्ञात सर्व पापांसाठी माफी मागण्यात येते
- कलमा रड्डे क्रुफ्र (Kalima Radde Kufr) - अविश्वास आणि पापी कृती नाकारण्यात येते
कलमाचे महत्त्व काय?
हे सहा कलमा इस्लामवरील विश्वासाचे केंद्रस्थान आहेत. ते मुस्लिमांना अल्लाहचे एकत्व, पैगंबराचे महत्त्व आणि क्षमा मागण्याची आणि पापापासून दूर राहण्याची आवश्यकता शिकवतात. त्यांचे पठण केल्याने मुस्लिमांना चिंतन करण्यास, पश्चात्ताप करण्यास आणि त्यांचा विश्वास दृढ करण्यास मदत होते, अशी भावना आहे.
( नक्की वाचा : 'तू बाहेर ये, कलमा म्हण', लेकीसमोर घातल्या वडिलांच्या छातीत गोळ्या, पुण्यातल्या मुलीनं सांगितला सर्व प्रसंग )
कलमा म्हंटल्यानं वाचला जीव
पहलगाममधील हल्ल्यात देबाशीश भट्टाचार्य या आसाममधील प्राध्यपकांचा जीव वाचला. ते त्यांच्या कुटुंबीयांसोबत घटनास्थळी होते. कलमा म्हंटल्यानंच आपला जीव वाचला, असं त्यांनी सांगितलं. गोळीबार सुरु झाल्यानंतर बाजूच्या काही जणांनी कलमाचे पठण करण्यास सुरुवात केली. मी देखील त्यांच्यात सहभागी झालो.
दहशतवाद्यानं माझ्यावर बंदुक रोखली त्यावेळी मी मोठ्यानं कलमा पठण केले, त्यानंतर माझा जीव वाचला, असं त्यांनी सांगितलं.
माझ्या आजूबाजूचे सर्वजण कलमा म्हणत होते. मी देखील त्यांच्यात सहभागी झालो. दहशतवाद्यानं माझ्यावर बंदू रोखली. त्यानंतर मी फक्त 'ला इलाहा...' इतकंच पुटपुटलो. तो मला सोडेल की नाही याची मला खात्री नव्हती. त्यानं ते शब्द ऐकले आणि तो पुढे गेला, असं भट्टाचार्य यांनी NDTV शी बोलताना सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world