जाहिरात

Who is Bhupati : सर्वात मोठं आत्मसमर्पण, 10 कोटींचं बक्षीस असलेला नक्षलवाद्यांचा म्होरक्या भूपती कोण आहे?

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २० वर्षांत ७०० हून अधिक नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलंय. आता शस्त्रधारी माओवादी संपतायत, मात्र शहरी माओवाद्यांवर आमचं लक्ष आहे, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

Who is Bhupati :  सर्वात मोठं आत्मसमर्पण, 10 कोटींचं बक्षीस असलेला नक्षलवाद्यांचा म्होरक्या भूपती कोण आहे?

प्रवीण मुधोळकर, प्रतिनिधी

महाराष्ट्रासाठी आज मोठा दिवस आहे. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादविरोधी कारवाईने मोठा टप्पा गाठला आहे. नक्षलवादाचा म्होरक्या मल्लोजुला वेणुगोपाल याने 60 नक्षलवाद्यांसोबत आत्मसमर्पण केलं आहे. मल्लोजुला वेणुगोपाल हा भूपती किंवा सोनू या नावानेही ओळखला जातो. भूपती हा माओवादी संघटनेचा एक मोठा चतुर रणनितीकार होता. बऱ्याच काळापासून तो महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर नक्षलवादी अभियानांकडे लक्ष देत होता. 

गेल्या काही महिन्यांपासून भूपती आणि नक्षलवादी संघटनाच्या मोठ्या नेत्यांमध्ये वाद सुरू होता. त्यामुळे संघटनेतच संघर्ष पेटला होता. भूपतीचं म्हणणं होतं की, हत्यारांच्या जोरावर लढ्याला यश मिळत नाहीये. याशिवाय लोकांचं समर्थन कमी होत आहे. आतापर्यंत शेकडो नक्षलवादी मारले गेले आहेत. त्यामुळे त्याने शांतता आणि चर्चेचा मार्ग निवडण्याची विनंती केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भूपतीच्या या मतांचा संघटनेच्या इतर नक्षलवाद्यांनी विरोध केला. त्यामुळे बराच काळ संघटनेतील नेत्यांमध्ये लढा सुरू होता.  मात्र नक्षलवादांच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या दबावामुळे भूपतीने शस्त्र त्यागण्याचा निर्णय घेतला. या वर्षाच्या सुरुवातीला भूपतीची पत्नी तारकानेही आत्मसमर्पण केलं होतं. ती प्रतिबंधित आंदोलनाच्या दंडकारण्य विशेष क्षेत्रीय समितीची सदस्य होती.  

भूपतीवर दहा कोटींपेक्षा जास्त बक्षीस

गेली चाळीस वर्षे माओवादी संघटनेच्या विस्तारासाठी सक्रिय असलेला केंद्रीय समिती आणि पोलिट ब्युरो सदस्य भूपतीनं आत्मसमर्पण केलं आहे. नक्षलवादी नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू याच्यावर विविध राज्यांमध्ये मिळून दहा कोटींपेक्षाही जास्त बक्षीस घोषित करण्यात आलं होतं. भूपती हा माओवादी पक्षाच्या पॉलिट ब्युरो आणि केंद्रीय समितीचा सदस्य होता. 69 वर्षांचा भूपती बीकॉम आहे. नक्षलवादी चळवळीतला जहाल नेता, अशी त्याची ओळख. तो महाराष्ट्र–छत्तीसगड सीमावर्ती माड डिव्हिजनमध्ये सक्रिय होता. गेल्या 40 वर्षांपासून तो संघटनेत कार्यरत होता. गडचिरोलीसह छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा आणि आंध्र प्रदेश अशा राज्यांची जबाबदारी त्याच्याकडे होती. 

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शस्त्र त्यागणार...

15 ऑक्टोबर, बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भूपती शस्त्र खाली ठेवणार आहे. भूपती हा नक्षली कट आखायचा. तो अनेक वर्षे महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेवरचा प्लाटूनचा मार्गदर्शक म्हणून कार्यरत होता. भूपतीने 'सशस्त्र संघर्ष' निष्फळ ठरल्याचे मान्य करून, शस्त्रसंधीचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन माओवादी सहकाऱ्यांना केलं होतं. "माओवाद्यांचा जनाधार घटला आहे, शेकडो सहकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे; त्यामुळे संघर्ष नव्हे, तर संवादच पर्याय आहे," असे त्याने एका पत्रकात म्हटलं होतं. त्याच्या या भूमिकेला काही नक्षल नेत्यांनी विरोध केला. महासचिव थिप्पारी तिरुपती उर्फ देवजी यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरू ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र, केंद्रीय समितीने भूपतीवर दबाव आणत शस्त्र खाली ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्याने संघटनेतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आणि अखेर साठ सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. भूपती शरण येताच गडचिरोली जिल्ह्यातला नक्षलवाद जवळपास संपुष्टात आलाय. "एकतर माओवाद्यांनी शरण यावं, अन्यथा त्यांना कंठस्नान घालू," असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता. 


गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 20 वर्षांत 700 हून अधिक नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलंय. आता शस्त्रधारी माओवादी संपतायत, मात्र शहरी माओवाद्यांवर आमचं लक्ष आहे, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय. भूपतीसारख्या केंद्रीय नेत्याने शरणागती पत्करल्याने नक्षल चळवळ कमकुवत झाली आहे. दंडकारण्याच्या जंगलात वर्षानुवर्षे टिकून असलेल्या नक्षल चळवळीचा शेवटचा टप्पा जवळ आला आहे. भूपतीचं आत्मसमर्पण हे त्याचेच संकेत आहेत असंही म्हटलं जात आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com