Who is Mausam Benazir Noor : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) नेत्या मौसम बेनझीर नूर यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे आणि आगामी निवडणुकीत त्या मालदा जिल्ह्यातील मालतीपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत.
कोण आहेत मौसम बेनझीर नूर?
मौसम बेनझीर नूर या बंगालमधील राजकारणातील एक महत्त्वाचं नाव आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांचा त्यांच्यावर मोठा विश्वास आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत त्या काँग्रेससाठी बंगालमध्ये एक प्रभावी चेहरा ठरतील, असा पक्षाला विश्वास आहे. मौसम नूर यांची प्रतिमा आणि त्यांचे कार्य पाहता, त्यांच्या पुनरागमनाने मालदा आणि आसपासच्या परिसरात काँग्रेसला मोठे बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
टीएमसीला सोडचिठ्ठी...
मौसम नूर या पूर्वाश्रमीच्या काँग्रेसच्याच नेत्या होत्या. त्यांनी यापूर्वी मालदा उत्तर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून काम केलं आहे. मात्र, मध्यंतरी त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. जिथे त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांनी टीएमसीला सोडचिठ्ठी देत 'घरवापसी' केली आहे.
पश्चिम बंगालच्या २०२६ च्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली असून, मौसम नूर यांना मालतीपूर मतदारसंघातून मैदानात उतरवले आहे. या निर्णयामुळे मालदा जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.
मौसम नूर या पश्चिम बंगालचे दिवंगत दिग्गज नेते गनी खान चौधरी यांच्या भाची आहेत. ज्यामुळे त्यांचे या भागात मोठे राजकीय वजन आहे. २००८ मध्ये आईच्या निधनानंतर मौसम यांनी राजकारणात पाऊल ठेवलं. बरकत दा यांचं नाव आजही मालदाच्या मुस्लीम बहुल भागात सन्मानाने घेतलं जातं. मौसन यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना म्हटलं होतं की, त्यांना बरकत साहेबांची विरासत पुढे घेऊन जायची आहे आणि हे काम काँग्रेसमध्ये राहुनही चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतं. त्यांची चुलत बहीण इशा खान चौधरी मालदा दक्षिणहून काँग्रेसच्या खासदार आहेत. दोन्ही बहिणींनी जोडी आता पक्षासाठी मजबूत किल्ला सिद्ध होऊ शकते. आता त्या काँग्रेसच्या तिकिटावर काय करिष्मा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राहुल गांधी यांचा मौसन नूर यांच्यावर विश्वास...
मौसम नूर या राहुल गांधींच्या जवळच्या नेत्यांपैकी एक मानल्या जातात. त्यांनी युवा काँग्रेसपासून संघटनेच्या विविध पदांवर काम करीत आपली राजकीय क्षमता सिद्ध केलं. २०११ मध्ये त्यांना पश्चिम बंगालमध्ये युवा काँग्रेसच्या अध्यक्षा बनविण्यात आलं होतं. काँग्रेसमध्ये त्यांना एक सशक्त महिला नेत्याच्या रुपात पाहिलं जातं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world