Female Driver Option in Ola and Uber Apps : आता ओला किंवा उबरने प्रवास करताना महिलांना सुरक्षेची अधिक खात्री मिळणार आहे. केंद्र सरकारने कॅब सेवा देणाऱ्या कंपन्यांसाठी नवीन नियम जाहीर केले असून, त्यानुसार महिला प्रवाशांना कॅब बुक करताना महिला ड्रायव्हर निवडण्याचा खास पर्याय दिला जाणार आहे. महिलांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी सरकारने मोटर व्हीकल एग्रीगेटर्स गाईडलाईन्स 2025 मध्ये हे महत्त्वाचे बदल केले आहेत.
प्रवाशांना ड्रायव्हरचे जेंडर निवडता येणार
केंद्र सरकारने सुधारित केलेल्या नियमांनुसार, ओला, उबर आणि रॅपिडो यांसारख्या ॲप्सवर राइड बुक करताना प्रवाशांना ड्रायव्हर पुरुष असावा की महिला, हे निवडता येईल.
महिला प्रवाशांनी अनेकदा मागणी केल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने राज्यांना हे नियम लागू करण्याचे आदेश दिले असून, जे एग्रीगेटर्स या नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांचा परवाना रद्द करण्याची ताकीदही देण्यात आली आहे. यामुळे प्रवासादरम्यान महिलांची सुरक्षितता वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
( नक्की वाचा : New Labour Code 2025: पगार, सुट्ट्या आणि पेन्शन... नोकरीचे सर्व नियम बदलणार,वाचा 10 मोठे बदल )
कधीपासून होणार अंमलबजावणी?
या नवीन नियमांच्या अंमलबजावणीसाठी सध्या कोणतीही डेडलाईन ठरवण्यात आलेली नाही. मात्र, नियमावली जाहीर झाल्यापासून ती लागू मानली जाते. राज्य सरकारांना त्यांच्या परवाना पद्धतीत हे बदल समाविष्ट करावे लागतील.
कंपन्यांना त्यांच्या मोबाईल ॲपमध्ये तांत्रिक बदल करण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. यापूर्वी 2025 मध्ये अशाच नियमांसाठी राज्यांना 3 महिन्यांचा वेळ देण्यात आला होता, त्यामुळे लवकरच हा बदल सर्वत्र पाहायला मिळू शकतो.
( नक्की वाचा : PIA : भारताशी कनेक्शन असलेल्या उद्योगपतीने खरेदी केली पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स, वाचा कोण आहेत आरिफ हबीब? )
काय आहे मोठे आव्हान?
हा नियम कागदावर चांगला वाटत असला तरी तो प्रत्यक्षात आणणे कठीण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भारतात सध्या एकूण कॅब ड्रायव्हर्समध्ये महिलांचे प्रमाण 5 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी महिला ड्रायव्हर उपलब्ध होणे शक्य होणार नाही.
विशेषतः रात्रीच्या वेळी महिला ड्रायव्हरची कमतरता भासू शकते, ज्यामुळे प्रवाशांना कॅबसाठी जास्त वेळ वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. या आव्हानावर मात कशी करायची, याबाबत अद्याप कंपन्यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
टिप देण्याच्या नियमात पारदर्शकता
ड्रायव्हरला दिल्या जाणाऱ्या टिपबाबतही सरकारने कडक नियम केले आहेत. आता प्रवाशांना ट्रिप पूर्ण झाल्यावरच टिप देण्याचा पर्याय ॲपमध्ये दिसेल. प्रवाशाने दिलेली संपूर्ण टिप ही ड्रायव्हरलाच मिळेल, त्यात कंपनी कोणताही हिस्सा कापून घेणार नाही. तसेच, टिप देण्यासाठी प्रवाशांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणला जाणार नाही किंवा त्यांची दिशाभूल केली जाणार नाही याची काळजी कंपन्यांना घ्यावी लागणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world