Mouth Taping Trend: सोशल मीडियावर माऊथ टेपिंग ट्रेंड प्रचंड चर्चेत आहे. या ट्रेंडनुसार लोक रात्री तोंडावर टेप लावून झोपत आहेत, जेणेकरून झोपेत असताना तोंडाऐवजी नाकाद्वारे श्वासोच्छवासाची प्रक्रिया योग्यरित्या पार पडेल. माऊथ टेपिंगमुळे घोरण्याची समस्याही कमी होण्यास मदत मिळू शकते, असे लोकांचे म्हणणंय. शिवाय झोपही चांगली येते आणि शरीराला ऑक्सिजनचाही जास्त प्रमाणात पुरवठा होतो. पण झोपताना तोंडाला टेप लावणं खरंच फायदेशीर ठरेल की यामुळे नुकसान होतील? सविस्तर माहिती जाणून घेऊया...
झोपताना तोंडाला टेप लावून झोपणे योग्य आहे का?
हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, माऊथ टेपिंगचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही तोंडाऐवजी नाकाने श्वास घेता. काही लोकांचे झोपेत असताना तोंड उघडं राहते, ज्यामुळे तोंडावाटे श्वास घेतला जातो.
- बाहेरील हवा फिल्टर होऊन शरीरामध्ये जाते.
- सायनसच्या रुग्णांना आराम मिळेल.
- घोरण्याची समस्या कमी होऊ शकते.
- तोंड सुकण्याची समस्याही कमी होऊ शकते.
रिपोर्टनुसार माऊथ टेपिंगमुळे तोंडाचं pH लेव्हल संतुलित राहण्यास मदत मिळते, ज्यामुळे दातांना कीड लागणं, हिरड्यांचे आजार आणि तोंड सुकण्याची समस्या दूर होण्यास मदत मिळेल. याव्यतिरिक्त नाकावाटे श्वास घेतल्यास शरीरात नायट्रिक ऑक्साइड तयार होतं, जे मेंदूचे कार्य, हृदयाचे आरोग्य आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी आवश्यक आहे.
(नक्की वाचा: Urinating During Bath: आंघोळ करताना लघवी का करू नये? आंघोळीदरम्यान लघवी होणे कोणत्या आजाराचे लक्षणं आहे? वाचा)
माऊथ टेपिंगचे काय आहेत नुकसान?
रिपोर्टमधील माहितीनुसार तोंडावर टेप लावण्याची पद्धत पूर्णपणे सुरक्षित नाहीय. विशेषतः एखाद्या व्यक्तीला सर्दी झाली असेल किंवा अॅलर्जीमुळे नाक बंद असेल किंवा आधीपासूनच श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेमध्ये योग्यरित्या पूर्ण होत नसेल तर माऊथ टेपिंगचा उपाय करू नये. त्यामुळे झोपेमध्ये श्वास घेण्याच्या प्रक्रियेत अधिक अडथळे निर्माण होऊ शकतात. याव्यतिरिक्त त्वचेशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ओठ किंवा तोंडाच्या आसपासच्या त्वचेवर रॅशेज येण्याची समस्या निर्माण होऊ शकते. तोंडावर टेप लावून झोपल्यास काही लोकांना झोपताना समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
(नक्की वाचा: Ginger Water Benefits: जेवणानंतर आल्याचे पाणी प्यायल्यास काय होतं? डॉक्टरांनी सांगितल्या 5 महत्त्वाच्या गोष्ट)
मग काय करावे?
हेल्थलाइनच्या माहितीनुसार, माऊथ टेपिंग ट्रेंड फॉलो करण्यापूर्वी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. घोरण्याची समस्या असल्यास किंवा रात्री झोपेत तोंड सुकत असल्यास माऊथ टेपिंगचा उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी अन्य उपायही करू शकता, उदाहरणार्थ...
- झोपण्यापूर्वी गरम पाण्याने वाफ घ्यावी, यामुळे श्वसननलिका मोकळी होईल आणि तुम्हाला तोंडावाटे श्वास घ्यावा लागणार नाही.
- रात्री घोरण्याची समस्या असल्यास तुम्ही झोपण्याच्या स्थितीवर लक्ष केंद्रित करावे, यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
- रात्री झोपेत तोंड सुकत असेल तर झोपण्यापूर्वी काही द्रवयुक्त पदार्थांचे सेवन करावे. पण अगदी झोपण्याच्या वेळेपूर्वी करू नये कारण वारंवार लघवीला होऊ शकते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

