Heart Attack Vs Panic Attack: अचानक घाबरल्यासारखे होणे, हृदयाची धडधड वाढणे, घाम येणे आणि आता जीव जातो की काय? अशी भीती वाटणे ही लक्षणे दिसू लागताच सामान्यतः प्रत्येक व्यक्तीच्या मनात पहिला विचार येतो तो म्हणजे हार्ट अटॅक. पण प्रत्येक वेळेस छातीत होणारी धडधड हार्ट अटॅकच असते असे नाही, काही प्रकरणांत पॅनिक अटॅक देखील असू शकतो. पॅनिक अटॅकची लक्षणं काही अंशी हार्ट अटॅकसारखीच असतात. ज्यामुळे लोक प्रचंड घाबरतात. या दोघांमधील फरक समजून घेणे आवश्यक आहे. प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ नवीन अग्रवाल यांनी या दोन्ही समस्यांमधील महत्त्वाचा फरक आणि कोणती काळजी घ्यावी? याबाबत सविस्तर माहिती दिली आहे
पॅनिक अटॅक आणि हार्ट अटॅकमध्ये फरक काय आहे?
डॉ नवीन अग्रवाल यांच्या मते पॅनिक अटॅकचा थेट संबंध आपल्या मानसिक आरोग्याशी असतो.
कारणे: अतिप्रमाणात मानसिक ताणतणाव नैराश्य किंवा तीव्र भावनिक दबावामुळे पॅनिक अटॅक येऊ शकतो काही वेळा कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय देखील हा अटॅक येऊ शकतो.
लक्षणे: अचानक घाबरल्यासारखे होणे, हृदयाचे ठोके अनियंत्रित होणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि अचानक मृत्यूची भीती वाटणे यांचा समावेश होतो.
मेडिकल टेस्ट: विशेष म्हणजे पॅनिक अटॅक आलेल्या रुग्णाची ईसीजी इको किंवा इतर हृदयविकाराशी संबंधित चाचण्या केल्यास त्या सर्व पूर्णपणे नॉर्मल येतात.
(नक्की वाचा: Banana FAQs: 30 दिवस रोज केळ खाल्ल्यास काय होईल? 1 दिवसात किती केळी खावी? महागडे केळ कुठे पिकते? 10 FAQs)
हार्ट अटॅकमध्ये छातीत तीव्र वेदना होणे किंवा प्रचंड दाब जाणवणे, या वेदना खांदे दुखणे, हात, मान किंवा जबड्यापर्यंत वेदना पसरणे, श्वास घेताना त्रास होणे यासारख्या समस्या उद्भवतात. हायब्लड प्रेशर, डायबिटीज, हाय कोलेस्टेरॉल, धूम्रपानाची सवय किंवा हृदयविकाराचा इतिहास असणाऱ्या लोकांमध्ये हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो.

हार्ट अटॅक आणि पॅनिक अटॅक कसे ओळखावे? (Image NDTV)
पॅनिक अटॅकमुळे हार्ट अटॅक येऊ शकतो का?
डॉ. अग्रवाल यांनी सांगितलं की, केवळ पॅनिक अटॅकमुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता अतिशय कमी असते. तणावादरम्यान शरीरात काही हार्मोन्समध्ये बदल होऊ शकतात किंवा हार्मोन्सची पातळी वाढते, ज्यामुळे धोका वाढतो. पण हार्ट अटॅक येईल, हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे केवळ पॅनिक अटॅकच्या कारणामुळे हृदयासाठी औषधोपचार करणे योग्य मानले जात नाही. पण जर एखाद्या व्यक्तीला वारंवार पॅनिक अटॅक येत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हार्ट चेकअप, उदाहरणार्थ ईसीजी, इको आणि आवश्यकता वाटल्यास ट्रेडमिल टेस्ट करून घ्यावी. विशेषतः 30-35 वर्षांहून अधिक लोकांना एकदा तरी कार्डिअॅक टेस्ट करून घेणे आवश्यक आहे.
डॉक्टरांकडे कधी जावे?
जर छातीत तीव्र वेदना सतत होत असतील, त्या हातापर्यंत किंवा जबड्यापर्यंत पसरत असतील, श्वास घेण्यास त्रास होत असेल, व्यक्ती बेशुद्ध पडत असेल किंवा आधीपासूनच हृदयरोग असेल तर याकडे सामान्य समस्या म्हणून दुर्लक्ष करू नये. अशा परिस्थितीत तत्काळ हॉस्पिटल गाठणे आवश्यक आहे.
डॉ. नवीन अग्रवाल म्हणतात की, वारंवार पॅनिक अटॅक येत असले तरी बहुतेक लोक सामान्य आणि दीर्घायुषी राहू शकतात. स्वतःच औषधोपचार करण्याऐवजी योग्य निदान करून घेणे आणि तज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणे महत्त्वाचे आहे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world