Health News: अंडे हे आरोग्यासाठी सुपरफूड मानले जाते, यामध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले अनेक पोषक घटक भरपूर प्रमाणात आहेत. पण अंड्यांबाबत अनेक शंका देखील लोकांच्या मनात असतात जसे की नाश्त्यात अंडे खावे की खाऊ नये? अंडे खाल्ल्याने वजन कमी होते का? कोलेस्टेरॉल किंवा फॅटी लिव्हरच्या त्रास असल्यास अंड्यांचे सेवन करावे का? इत्यादी... या विषयावर प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी इंस्टाग्राम हँडलवर व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये त्यांनी अंड्यांशी संबंधित नऊ महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. जाणून घेऊया...
अंड्याच्या सेवनासंदर्भातील 9 प्रश्न आणि उत्तरं | Eggs FAQs
प्रश्न 1: नाश्त्यामध्ये अंडे खावे का?
डॉ. सेठी यांच्या मते, सर्वोत्तम प्रोटीन स्रोतांमध्ये अंड्याचाही समावेश आहे. यामध्ये उच्च दर्जाचे प्रोटीन असते, ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि दिवसभर शरीरातील ऊर्जा टिकून राहते. त्यामुळे नाश्त्यात अंडे नक्कीच खाऊ शकता.
प्रश्न 2: अंडे खाल्ल्याने वजन वाढते की कमी होते?
योग्य प्रमाणात अंडे खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत मिळते. अंड्यातील प्रोटीन भूक कमी करते, वारंवार भूक लागण्याची इच्छा कमी होते आणि विशेषतः पोटावरील चरबी कमी करण्यास मदत होते.
(नक्की वाचा: Hernia Types : हर्नियाकडे दुर्लक्ष करताय? वेळीच व्हा सावधान अन्यथा या गंभीर परिणामांचा करावा लागेल सामना)
प्रश्न 3: अंडे खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी वाढते का?
अंड्याचे बलक (जर्दीला) खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी वाढते असा अनेकांचा समज आहे. पण डॉ. सेठी म्हणाले की बहुतेक लोकांमध्ये अंडे खाल्ल्याने कोलेस्टेरॉल वाढत नाही.
प्रश्न 4: फॅटी लिव्हरची समस्या असल्यास अंडे खाऊ शकतो का?
फॅटी लिव्हर असलेले रुग्णही मर्यादित प्रमाणात अंडी खाऊ शकतात. कारण अंड्यातील प्रोटीन लिव्हरचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते.
प्रश्न 5: मधुमेहाच्या रुग्णांसाठी अंडे खाणे किती योग्य आहे?
अंड्यामध्ये जवळजवळ शून्य प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात, त्यामुळे शरीरातील रक्तशर्करेचे प्रमाण वाढत नाही. मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहारात अंड्यांचा समावेश करावा.
प्रश्न 6: अंड्यामुळे पोटात गॅस किंवा ब्लोटिंगची समस्या होते का?
बहुतांश लोकांना अंडे खाल्ल्याने कोणतीही समस्या होत नाही. पण काहींना त्रास होऊ शकतो. अशा वेळी शरीराची प्रतिक्रिया समजून घेणे महत्त्वाचे आहे.
(नक्की वाचा: Health News: रात्री किती वेळा लघवी होणे सामान्य आहे? सतत होणाऱ्या लघवीच्या समस्येपासून कशी सुटका मिळावावी? वाचा उपाय)
प्रश्न 7: कच्चे अंडे चांगले की शिजवलेले?
डॉ. सेठी यांच्या मते, कच्चे अंडे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे सॅल्मोनेला इन्फेक्शनचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून अंडे नेहमी शिजवूनच खावे. शिजवलेल्या अंड्यातील प्रोटीन शरीर अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेते.
प्रश्न 8: अंडे खाण्याचा सर्वाधिक आरोग्यदायी मार्ग कोणता?
उकडलेले अंडे, पोच्ड अंडे किंवा ऑम्लेट तयार करून खाणे हे सर्व अंडे खाण्याचे आरोग्यदायी पर्याय आहेत.
प्रश्न 9: एका दिवसात किती अंड्यांचे सेवन करावे?
डॉ. सौरभ सेठी यांच्या मते, नियमित एक ते दोन अंडी खाणे आरोग्यासाठी योग्य ठरू शकते.
अंडे हे स्वस्त, पौष्टिक आणि सहज उपलब्ध असणारे सुपरफूड आहे. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाल्ल्यास वजन कमी होण्यास, स्नायू मजबूत होण्यास मदत मिळू शकते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

