जाहिरात

Holi 2025: आमचे दाराशी हाय शिमगा! कोकणामध्ये जपली जातेय संकासुराची परंपरा

Holi 2025: कोकणामध्ये शिमगोत्सवातील जपली जाणारी संकासूरची परंपरा म्हणजे नेमके काय?

Holi 2025: आमचे दाराशी हाय शिमगा! कोकणामध्ये जपली जातेय संकासुराची परंपरा

Holi 2025: कोकणाची ओळख असलेल्या शिमगोत्सवाला गावागावातून सुरुवात झाली आहे. फाक पंचमीच्या दिवशी पहिल्या होळीने कोकणात खऱ्या अर्थाने शिमग्याला सुरुवात होते. कोकणातील शिमगोत्सव म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक संस्कृतीचं दर्शन घडवणारा उत्सव... शेकडो वर्षांच्या परंपरा आणि मान जपत प्रत्येक कोकणी माणूस या उत्सवात सहभागी होतो. कोकणातील माणूस कामधंद्यासाठी आपल्या गावापासून कितीही लांब गेलेला असला तरीही होळी सणासाठी त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात. घरट्याबाहेर उडालेल्या पिलाची जशी पक्षी वाट पाहतो तसेच गाव आणि गावकरी आपल्या चाकरमान्यांची वाट पाहतात. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Rakesh Gudekar

कोकणात विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा सण सुमारे 5 ते 15 दिवस असतो. काही ठिकाणी महिना ते 2 महिने देखील हा उत्सव चालतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन शुद्ध द्वादशी/त्रयोदशी किंवा पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. गावागावातील ग्रामस्थ जंगलात जाऊन होळीसाठी झाड निश्चित करतात. काही ठिकाणी शेवरी तर काही ठिकाणी आंब्याचे झाड, काही ठिकाणी सुरमाड तर काही ठिकाणी पोफळीचे झाड होळीसाठी आणले जाते. जंगलात गेलेली ही मंडळी निश्चित केलेल्या झाडाचे पूजन करतात. मग हे झाड कोकणचे पारंपरिक वाद्य असलेल्या ढोल ताशांच्या गजरात नाचवतच गावात आणले जाते. गावात वर्षानुवर्षाच्या निश्चित केलेल्या जागेवर हे झाड उभारलं जातं. हे ठिकाण कधीही बदलत नाही. होळी उभारल्यानंतर होळीची पूजा केली जाते. होळीच्या वेळी फाका मारल्या जातात म्हणजेच बोंब ठोकली जाते. होळी पेटवल्यानंतर होम पेटवला जातो. शिमग्याची ही परंपरा गेली अनेक वर्ष अखंड सुरू आहे. नवीन पिढीही ती आपल्या परीनं जपण्याचा प्रयत्न करत आहे.

(नक्की वाचा: Happy Holi 2025 Wishes: पिचकारीने प्रेमाच्या रंगांचा करा वर्षाव, प्रियजनांना पाठवा होळीच्या खास शुभेच्छा)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Rakesh Gudekar

होळीच्या आधी पालखीला लागतात रूपं

या शिमगोत्सवातलं आकर्षण असतं ते देवाच्या पालखीचे आणि या पालखीला रूपं लावण्याच्या कार्यक्रमाचे. आपल्या ग्रामदेवतेची पालखी कोकणातल्या शिमग्याला बाहेर पडते. ही पालखी घरोघरी जाण्याआधी पालखीतल्या देवाला रुपं लावण्याचा कार्यक्रम फारच रंगतदार असतो. देवाला भरजरी वस्त्रांनी सजवण्यात येतं. देवाचा आकर्षक असा मुखवटा या पालखीत विराजमान केला जातो. या पालखीतल्या देवाला देवपण यावं यासाठी देवाला रुपं लावण्याचा कार्यक्रम शिमगोत्सवाला कोकणातल्या प्रत्येक गावात पाहायला मिळतो. या रुप लावण्याच्या कार्यक्रमाबरोबरच सुवर्ण अलंकारांनी सजवलं जातं आणि त्यानंतर देवाचं दिसणारं तेजस्वी रुप प्रत्येकाच्या मनात तेवढ्याच भक्तीने कोरलं ही जातं.

(नक्की वाचा: Holika Dahan 2025 Significance : होळीची पूजा कशी करावी, शुभ मुहूर्त आणि होलिका दहनाची पौराणिक कथा जाणून घ्या)

पालखी जाते घरोघरी

होळीनंतर काही ठिकाणी पालखी गावातील प्रत्येक घरी जाते, तर काही ठिकाणी गावातील सहाणेवर म्हणजे गावात एखाद्या विशिष्ट ठिकाणी ठेवली जाते. ज्या ठिकाणी पालखीची पूजा केली जाते. ग्रामदैवतापासून निघालेली पालखी गावाला प्रदक्षिणा घालून पुन्हा ग्रामदैवतापाशीच येते.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Rakesh Gudekar

कोकणात जपली जातेय शिमगोत्सवातील संकासूरची परंपरा

शिमगोत्सवातील संकासूर आणि गोमुच्या जोडीचं आकर्षण सर्वांनाच असतं. गावागावातील नमन खेळ गावभोवणीसाठी दहा दिवस बाहेर पडतात. यावेळी अबालवृद्ध हा संकासूर पाहण्यासाठी आवर्जून घराबाहेर पडतात. संकासूर काटखेळे करत मृदुंग, टाळ आणि कोकणी लोकगीतांवर गोमुभोवती प्रदक्षिणा घालून ठेका धरतो. त्याची नाचण्याची लकब बघून पाहणारेही मोहीत होतात. डोक्यावर उंच टोपरे, त्या टोपऱ्यावर गोल फिरणारा गोंडा असतो. चेहऱ्यावर कापडाचा मुखवटा त्याला लाल रंगाचे कापडी नाक, जीभ आणि कान तसेच पांढऱ्याशुभ्र दाढीमुळे संकासूर अधिक आकर्षक दिसतात. कंबरेला कासे किंवा पितळेच्या धातूचे मोठ्या घुंघरुंचा पट्टा यातून येणारा नाद हा संकासूर आल्याची चाहुल देतात. संकासुराच्या हातात रस्सी असते. संकासूर आपल्या घरी आले की त्यांची आरती करुन नमस्कार केला जातो आणि संकासूर आशीर्वाद देतात. उन्हाच्या झळा लागत असतानाही संकासूर हे खेळ्यांसोबत अनवाणी पायाने आणि काळा पायघोळ घालून गावोगावी फिरून आपली संस्कृती जपत असतात. वर्षानुवर्ष चालत आलेली ही परंपरा ग्रामीण भागात आजही मोठ्या भक्तिभावाने जपली जातेय.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: