
Alcohol Effect On Liver Function: लिव्हर आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा अवयव आहे. जो रक्त शुद्ध करतो. पोषक तत्वे साठवतो आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढतो. मात्र, अल्कोहोल (दारू) लिव्हरला सर्वाधिक नुकसान पोहोचवते. अनेक लोक विचार करतात की जर थोड्या प्रमाणात दारू प्यायली तर काही नुकसान होत नाही. पण खरंच असं आहे का? त्याबाबत डॉक्टर काय सल्ला देतात. त्यांचे याबाबत काय म्हणणे आहे. खरोखरच काही प्रमाणात दारु प्यायली तर लिव्हरला काही परिणाम होत नाही हे सत्य आहे का? यावरच डॉक्टरांनी प्रकाश टाकला आहे.
डॉ. सरीन यांचं मत काय?
प्रसिद्ध लिव्हर विशेषज्ञ डॉ. सरीन यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, "याबद्दल मी फक्त एकच गोष्ट सांगेन , 'नो अल्कोहोल." त्यांचं म्हणणं आहे की, WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटने नुसार अल्कोहोल एक प्रकारचं विष आहे. जे शरीर आणि खासकरून लिव्हरला नुकसान पोहोचवतं. त्यामुळे, डॉ. सरीन कुणालाही दारू पिण्याचा सल्ला देत नाहीत, अगदी कमी प्रमाणात का असेना दारू घेवू नये असं त्याचं म्हणणं आहे.
कधीतरी दारू पिणं सुरक्षित आहे का?
डॉ. सरीन यांचं म्हणणं आहे की, जर तुम्हाला अल्कोहोल घ्यायचं असेलच तर वर्षातून एकदा घ्या. त्या पेक्षा जास्त घेऊ नका. याची मात्रा प्रत्येक व्यक्तीच्या मेटाबॉलिज्म म्हणजेच शरीराच्या कार्यप्रणाली वर अवलंबून असते. पण याचा अर्थ असा नाही की थोडी मात्रा पूर्णपणे सुरक्षित आहे हे सांगायला ही ते विसरत नाहीत.
जास्त अल्कोहोलमुळे काय होतं?
जास्त प्रमाणात अल्कोहोल प्यायल्याने लिव्हरला अनेक गंभीर आजार होऊ शकतात. ते पुढील प्रमाणे
- फॅटी लिव्हर (Fatty Liver)
- लिव्हरला सूज (Hepatitis)
- सिरोसिस (Cirrhosis)
- लिव्हर फेल्युअर (Liver Failure)
- कॅन्सरचाही धोका
यामुळे हळूहळू लिव्हरच्या पेशी मरू लागतात. शिवाय ते लिव्हर काम करणं बंद करतं.
कमी प्रमाणात पिणं योग्य आहे का?
अनेक लोकांना वाटतं की, "थोडी दारू आरोग्यासाठी चांगली आहे," पण हा केवळ एक भ्रम आहे. वैज्ञानिक संशोधन आणि डॉ. सरीनसारख्या तज्ज्ञांनुसार, कमी प्रमाणातही अल्कोहोल लिव्हरला नुकसान पोहोचवू शकतं, खासकरून जर त्याची सवय लागली तर ते अधिक धोकायदायक ठरतं.
लिव्हरसाठी सर्वोत्तम पेय कोणतं?
लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी आणि डिटॉक्स करण्यासाठी खालील पेये उपयुक्त ठरतात.
- पाणी (सर्वात महत्त्वाचं)
- लिंबू पाणी
- नारळ पाणी
- ग्रीन टी
- हळदीचं दूध
- आवळा ज्यूस
लिव्हरला निरोगी ठेवायचं असेल तर दारूपासून दूर राहणंच सर्वात चांगला उपाय आहे. डॉ. सरीन आणि डब्ल्यूएचओच्या मते, अल्कोहोल कोणत्याही मात्रेत सुरक्षित नाही. "दारू थोडी असो वा जास्त, लिव्हरवर परिणाम नक्कीच करते." त्यामुळे, जर तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी असेल, तर "नो अल्कोहोल" चा मार्ग निवडणं उत्तम राहील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world