Yoga For Anger Management: आजच्या धावपळीच्या जीवनात बहुतांश लोक जबाबदाऱ्या, काम आणि चिंता यामध्ये इतके गुरफटून गेले आहेत की, शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होतंय. परिणामी ताणतणाव (Stress), थकवा आणि अस्वस्थता यासारख्या समस्या उद्भवू लागतात. अशा परिस्थितीत आपले शरीर आणि मन यांना थोडीशी विश्रांती देणे अतिशय आवश्यक आहे. या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी योग हा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. योगच्या विविध प्रकारांपैकी 'शशांकासन' हे एक असे आसन आहे, जे केवळ शरीराला आराम देत नाही तर मनही शांत करते. नियमितपणे हे आसन केल्यास तणाव कमी होऊन शारीरिक तसेच मानसिक ऊर्जा वाढण्यास मोठी मदत मिळू शकते.
शशांकासनाचा सराव का करावा? | Shashankasana Benefits
संस्कृतमध्ये 'शशक' म्हणजे ससा आणि 'आसन' म्हणजे मुद्रा. ज्याप्रमाणे ससा एखाद्या धोकादायक परिस्थितीत स्वतःचे संरक्षण करण्यासाठी शरीर आकुंचित करून शांत होतो, तसाच अनुभव शशांकासनाचा सराव केल्याने आपल्याला मिळतो. या आसनामुळे मनाला विश्रांती आणि शांती लाभते.
शशांकासनाचा सराव करण्याचे फायदे काय आहेत?
आयुष मंत्रालय हे आसन दररोज करण्याचा सल्ला देते. त्याचे मुख्य फायदे खालीलप्रमाणे आहेत:
- मानसिक आरोग्य: हे आसन तणाव, चिंता आणि राग कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी असून मन शांत करते.
- शारीरिक लवचिकता: पाठीचा खालील भाग आणि मणक्याची लवचिकता सुधारण्यास मदत होते.
- पचनसंस्था: हे आसन पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयुक्त आहे.
- ग्रंथी नियंत्रण: हे 'ॲड्रिनल' ग्रंथी नियंत्रित करण्यास मदत करते, ज्यामुळे हे आसन मुले आणि प्रौढ दोघांच्याही आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरते.
- सर्वप्रथम योग मॅटवर वज्रासनात बसा (पाय दुमडून बसा आणि पाठीचा कणा ताठ ठेवा).
- आता दीर्घ श्वास घेत दोन्ही हात वरील दिशेला न्या.
- श्वास सोडत हळूहळू शरीर पुढे वाकवून खाली जमिनीच्या दिशेने न्या.
- आपले कपाळ आणि हाताचे तळवे जमिनीला टेकवा.
- या स्थितीत आपल्या क्षमतेनुसार थांबून पुन्हा सामान्य स्थितीत (वज्रासनात) या.
- 10 ते 15 मिनिटे तुम्ही या आसनाचा सराव करू शकता.
(नक्की वाचा: Happy Hormones: तणावमुक्त व्हायचंय? मोबाइल सोडा, हे 4 हार्मोन्स वाढवा; फॉलो करा डॉ. रुचा पै यांच्या टिप्स)
आसनाचा सराव कधी करू नये?
- तीव्र पाठदुखी, उच्च रक्तदाब (High BP) किंवा हर्नियाचा त्रास असेल तर हे आसन टाळावे.
- मान किंवा गुडघ्याला दुखापत झाली असल्यास हे आसन करू नये.

Photo Credit: NDTV Marathi
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world