जाहिरात
Story ProgressBack

राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन 11 एप्रिलला का साजरा केला जातो? जाणून घ्या मुख्य उद्देश

National Safe Motherhood Day 2024: राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस साजरा करण्यासाठी 11 एप्रिल याच तारखेची निवड का करण्यात आली? काय आहे यामागील विशेष कारण? जाणून घ्या सविस्तर माहिती...

Read Time: 3 min
राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन 11 एप्रिलला का साजरा केला जातो? जाणून घ्या मुख्य उद्देश

National Safe Motherhood Day: देशभरामध्ये दरवर्षी 11 एप्रिल रोजी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस (National Safe Motherhood Day) साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने गर्भवती आणि स्तनदा मातांच्या आरोग्याची योग्य पद्धतीने देखभाल करणे का गरजेचे आहे? याबाबत जगजागृती केली जाते.  राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन साजरा करण्यामागील प्रमुख उद्देश, या दिवसाचे महत्त्व काय आहे, याबाबत जाणून घेऊया सविस्तर माहिती...

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, वर्ष 2020 मध्ये गर्भधारणा आणि प्रसूतीशी संबंधित समस्यांमुळे जगभरात दररोज जवळपास 800 महिलांचा मृत्यू झाला होता. म्हणजेच दर दोन मिनिटांमध्ये एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. 

आपल्या भारत देशाबाबत सांगायचे झाले तर महिलांचे आरोग्य आणि सुरक्षित मातृत्वाकरिता अनेक सरकारी योजना अंमलात आणल्या गेल्या आहेत. गर्भवती महिलांना अनेक प्रकारच्या विशेष सोयीसुविधा पुरवल्या जात आहेत. आवश्यक त्या सुविधा उपलब्ध असतानाही कुठे आणि कोणत्या स्तरावर चुका होत आहेत, हे पाहणे देखील आपणा सर्वांची जबाबदारी आहे.  

(Sudha Murty Motivational Quotes: तुमची मुले गाठतील प्रगतीचे शिखर, फॉलो करा सुधा मूर्तींचे हे प्रेरणादायी विचार)

राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस साजरा करण्याचा उद्देश काय?

गर्भवती महिलांचे आरोग्य तसेच सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण व्हावी याकरिता आणि माता मृत्यूदर कमी करण्याच्या मुख्य उद्देशाने राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस साजरा केला जातो. गर्भधारणेवेळी महिलांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता निर्माण होऊ नये, प्रसूतीशी संबंधित असलेल्या सोयीसुविधा योग्य वेळेत उपलब्ध व्हाव्यात, प्रसूतीपूर्वी तसेच प्रसूतीनंतर महिलांच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेता यावी आणि विशेष म्हणजे गर्भवती महिलांना पौष्टिक आहार मिळावा, यासह असंख्य मुद्यांसंदर्भात जनजागृती करण्यासाठी हा दिवस दरवर्षी 11 एप्रिल रोजी साजरा केला जातो.  

राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन साजरा करण्याची सुरुवात कशी झाली?

वर्ष 2000मध्ये राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन साजरा करण्याचा मुद्दा मोठ्या प्रमाणात मांडला गेला. कारण या काळात देशामध्ये मातामृत्यूचे प्रमाण (Maternal Mortality Ratio) वाढत होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून व्हाईट रिबन अलायन्स इंडिया (WRAI) ने या विषयावर अनेक संघटनांना एकत्रित आणण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. यानिमित्ताने  जवळपास 1 हजार 800 हून अधिक संस्था एकत्र आल्याची माहिती आहे. यानंतर वर्ष 2003मध्ये राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन औपचारिकरित्या साजरा केला जाऊ लागला. भारत सरकारने 11 एप्रिल हा दिवस 'राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन' म्हणून घोषित केला. ही महत्त्वपूर्ण घोषणा करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. हे मोठे पाऊल उचलून भारताने संपूर्ण जगाला मोठा संदेश दिला. 
 
11 एप्रिल - हीच तारीख का निवडण्यात आली?

11 एप्रिल याच तारखेची निवड करण्यामागील देखील खास कारण आहे. 11 एप्रिल म्हणजे कस्तुरबा गांधी यांचा जन्मदिवस. कस्तुरबा गांधी यांनी महिला सक्षमीकरणासह सामाजिक कार्यामध्ये मोठे योगदान दिले आहे.    

(भारत आणि पाकिस्तानमध्ये लोकप्रिय असलेल्या 'रूह अफजा' चा इतिहास माहिती आहे का?)

माता मृत्यूची संख्या घटली

अलिकडील काही वर्षांमध्ये सुरक्षित मातृत्वाच्या दिशेने देशभरामध्ये मोठी पावले उचलण्यात आली आहेत. पण तरीही देशामध्ये माता मृत्यूचे प्रमाण आणखी कमी करण्याची आवश्यकता आहे. तज्ज्ञमंडळींच्या मदतीने महिला व नवजात बालकांचा जीव वाचवला जाऊ शकतो, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. 

(दात-हिरड्या निरोगी नाहीत? येऊ शकतो हार्ट अटॅक, या वाईट सवयी ठरतील तुमच्या हृदयासाठी घातक)

मृत्यू होण्यामागील अनेक कारणे

पुरेशा प्रमाणात पौष्टिक आहार न मिळणे हे देखील मृत्यूमागील एक प्रमुख कारण आहे, ज्यामुळे माता आणि नवजात बालकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. गर्भधारणा, प्रसूतीदरम्यान आणि प्रसूतीनंतर उत्तम दर्जाचा आहार व आरोग्य सुविधा मिळणे हा प्रत्येक महिलेचा अधिकार आहे. गरिबी-शिक्षणाचा अभाव यामुळे देखील आरोग्यावर वाईट परिणाम होतात. बालविवाह प्रथेवर बंदी घालण्यात असली तरीही आजही अनेक ठिकाणी याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे.

डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination