Parenting Tips: मुलांच्या जीवनावर आईवडिलांच्या वागणुकीचा खोलवर परिणाम होतो. पालकांकडून बोलल्या जाणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टी मुलं आत्मसात करतात. या विषयावर पॅरेटिंग कोच संदीप यांनी इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केलीय. रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या मुलांना सहा प्रश्न विचारण्याचा सल्ला त्यांनी पोस्टद्वारे दिलाय. जर पालकांनी रोज पाच ते 10 मिनिटे काढून आपल्या मुलांना ठराविक प्रश्न विचारले तर त्यांचे मुलांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल,असेही संदीप म्हणाले. शिवाय हे प्रश्न तुमच्या मुलांना भावनिकदृष्ट्या अधिक बळकट करतील आणि त्यांचा आत्मविश्वासही वाढवतील. जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती...
झोपण्यापूर्वी मुलांना विचारा 6 प्रश्न
प्रश्न 1- आज तुला कोणत्या गोष्टीमुळे जास्त आनंद मिळाला?
हा प्रश्न मुलांना छोट्या-छोट्या गोष्टींमधील आनंद ओळखण्याची शिकवण देतो. आनंद नेहमी मोठ्या गोष्टींमध्ये नसतो तर छोट्या-छोट्या चांगल्या अनुभवांद्वारेही मिळू शकतो. यामुळे सकारात्मक मानसिकता वाढते आणि आनंदी राहण्याचा दृष्टिकोन निर्माण होतो.
प्रश्न 2- आज शाळेत किंवा दिवसभरात कोणत्या अडचणी आल्या? असतील तर तू परिस्थिती कशी हाताळली?
याद्वारे मुलांना आव्हानांना सामोरे जाण्यास मदत मिळते. चुका करणे आणि अडचणींना सामोरे जाणे, हे चुकीचं नाहीय; ही बाब त्यांना समजते. याउलट त्या परिस्थितीतून शिकणं महत्त्वाचं आहे, हे देखील त्यांना समजते. यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढते.

Photo Credit: File Photo
प्रश्न 3- आज कोणी तुला मदत केली किंवा तु कोणाला मदत केली का?
हा प्रश्न मुलांमध्ये दयाळूपणा आणि सहानुभूती यासारख्या सकारात्मक भावना जागवतो. मदत करणं आणि मदत केलेल्या लोकांचे आभार मानणे, या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, हे मुलांना कळतं.
प्रश्न 4- आज असं काही घडलं का जे तुम्हाला आवडलं नाही?या प्रश्नामुळे मुलं त्यांच्यातील नकारात्मक भावना लपवून ठेवण्याऐवजी मनमोकळेपणाने बोलण्यास शिकतील. मनामध्ये कोणतीही भीती किंवा दबाव तयार होत नाही तर ते आपल्या मनातील विचार प्रामाणिकपणे व्यक्त करू शकतात.
प्रश्न 5- आज कोणत्या गोष्टीमुळे तुला स्वतःचा अभिमान वाटला?हा प्रश्न मुलाचा आत्मसन्मान वाढवतो. ते त्यांच्या चांगल्या सवयी आणि यश ओळखतात तसेच स्वतःला महत्त्व देण्यास शिकतात.

प्रश्न 6- उद्यासाठी तुझे काय नियोजन आहे? उद्या तुला कोणत्या चांगल्या गोष्टी करायच्या आहेत?
हा प्रश्न तुमच्या मुलाला नियोजन करण्याची सवय लावण्यास मदत करतो. ते त्यांच्या भविष्याबाबत विचार करतात आणि त्यांच्या जबाबदाऱ्या समजून घेतात.
(नक्की वाचा: Sleep Quality: चांगल्या झोपेसाठी डाएटमध्ये 1 गोष्ट खाण्यास करा सुरुवात, गाढ आणि चांगली झोप येईल)
या छोट्या-छोच्या प्रश्नांद्वारे पालक-मुलांमध्ये होणारा रोजचा संवाद खास होऊ शकतो. आई-वडील आपलं म्हणणं ऐकून घेतात आणि समजून घेतात, अशी भावना मुलांमध्ये निर्माण होईल. यामुळे आईवडिलांचे मुलांसोबतचे नाते मजबूत होण्यास मदत मिळेल. तसेच मुलांचा भावनिक आणि बौद्धिकदृष्ट्याही विकास होईल.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world