जाहिरात

Paush Month Rituals: पौष महिन्यात लग्नासह शुभ कार्य टाळावी? खरंच हा महिना अशुभ असतो का? ज्योतिषी काय म्हणाले?

Paush Month Rituals: पौष महिन्यामध्ये शुभ कार्य करावी की करू नये? शास्त्रामध्ये नेमकी काय माहिती दिलीय? जाणून घ्या ज्योतिषशास्त्री श्रीकेतन कुलकर्णी यांनी दिलेली माहिती...

Paush Month Rituals: पौष महिन्यात लग्नासह शुभ कार्य टाळावी? खरंच हा महिना अशुभ असतो का? ज्योतिषी काय म्हणाले?
"Paush Month Rituals: पौष महिन्यात शुभ कार्य करावी की टाळावी?"
Canva

- ज्योतिषशास्त्री श्रीकेतन कुलकर्णी 
Paush Month Rituals: वर्षातील बारा महिन्यांपैकी एक असलेला पौष महिना पण त्याविषयी इतके समज - गैरसमज आहेत की पौष महिना सुरू झाला म्हणून अनेक शुभकार्ये पुढे ढकलली जातात, महत्त्वाची बोलणी टाळली जातात. नवीन व्यवहार होत नाहीत इतका महिना वाईट असल्याची समजूत असल्याने याची भयंकर भीती जनसामान्यांमध्ये आहे तर धर्मशास्त्रानुसार हा महिना खरंच इतका वाईट आहे का? याची माहिती जाणून घेऊया...

चैत्र माह वर्षारंभातील दहावा महिना तर हेमंत ऋतूतील दुसरा मास म्हणजे पौष महिना. त्याला 'तैष' आणि 'सहस्य' अशी अन्य दोन नावंही आहेत. अधिक मासाला जसं 'मलमास' किंवा 'धोंडा' मास म्हणतात तसं यास 'भाकडमास' म्हटले जाऊ लागले. कारण मकर संक्रातीशिवाय या महिन्यात अन्य सण नाहीत असा सार्वत्रिक समज. मात्र निर्णयसिंधु, धर्मसिंधु ग्रंथांमध्ये या महिन्यात करण्याची काही कृत्यं सांगितली आहेत ती पुढीलप्रमाणे-

पौष महिना कालावधी | Paush Month Start Date And End Date

21 डिसेंबर 2025पासून ते 18 जानेवारी 2026 पर्यंत पौष महिना आहे.

पौष महिन्यामध्ये नेमकं काय करावे? | Paush Month Rituals In Marathi 

  • पौष पौर्णिमेपासून पौर्णिमान्त माघ सुरू होतो म्हणून या दिवसापासून माघस्नानाला प्रारंभ करावा.
  • पौष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा हा शाकंभरी देवीचा महोत्सव (शाकंभरी नवरात्र) शारदीय नवरात्रौत्सवासारखा असतो.
  • पौष शुद्ध अष्टमीला जर बुधवार असेल तर शिवप्रित्यर्थ स्नान, जप, होम तर्पण आणि ब्राह्मणभोजन करावे.
  • पौष अमावास्येला अधोंदय पर्व आलं असता स्नानदानादी धर्मकृत्यं करावीत.
  • शिवलिंगावर महिनाभर तुपाचा अभिषेक करावा. या शिवापुढे दीपाराधना करावी.
  • पौषाच्या दोन्ही पक्षांतील नवमीला उपवास करून दुर्गेची त्रिकाळ पूजा करावी. दुर्गेची मूर्ती पीठाची करावी व्रतानिमित्त आठ कुमारिकांना भोजन घालावे.
  • महिनाभर एकवेळ उपवास करून जे शक्य असेल ते दान करावे.
  • रवि धनु राशीत प्रवास करून मकर राशीपर्यंत प्रवेश करेपर्यंतच्या कालखंडाला धनुर्मास म्हणतात. धनुर्मास श्रावणासारखाच पवित्र मानला जातो या धनुर्मासाचे काही दिवस पौषात येतात. संपूर्ण धनुर्मासात सूर्योदयापूर्वी देवपूजा आणि अन्हिकं उरकून देवास महानैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. महानैवेद्यास मुगाच्या डाळीची खिचडी, गुळाची पोळी, बाजरीची भाकरी, वांग्याचे आणि तिळाचे पदार्थ केले जातात. वरील विवेचनावरून धार्मिक कार्यासाठी हा महिना निषिद्ध नाही, हे स्पष्ट होतं. 

Aries Horoscope 2026: अडचणी दूर होऊन मनातील इच्छा पूर्ण होतील, मेष राशीने 2026 कोणते उपाय करावे?

(नक्की वाचा: Aries Horoscope 2026: अडचणी दूर होऊन मनातील इच्छा पूर्ण होतील, मेष राशीने 2026 कोणते उपाय करावे?)

पौष महिन्यात लग्न करावे की करू नये?

राहिला प्रश्न विवाह आणि वास्तुविषयक कार्याचा. पौष महिन्यात रवि धनुत असतात विवाहाचे मुहूर्त घेऊ नयेत, असे शास्त्र सांगते. मात्र उर्वरित महिना विवाहासाठी वर्ज्य नाही. पौष महिना शुभकार्यासाठी वर्ज्य आहे ही निव्वळ खुळचट कल्पना असून तिला कसलाही शास्त्राधार नाही. धर्मशास्त्र अभ्यासकांच्या मते पितृपंधरवडाही सर्वच शुभकार्यासाठी वर्ज्य नसतो. पौष महिन्याचा बागुलबुवा करू नये. सोप्या आणि सहज भाषेत सांगायचे तर श्रीखंडोबा आणि श्रीम्हाळसादेवी यांचा विवाह पौष महिन्यामध्ये शुक्ल त्रयोदशीला मृग नक्षत्र असताना गोरज मुहूर्तावर पाली येथे होत असतो. त्यामुळे जनसामान्यांना या महिन्यामध्ये विवाह करण्यास हरकत नसावी. 

गृहप्रवेश आणि वास्तूशांती करावी की करू नये? 

गृहप्रवेश आणि वास्तुशांतीसाठी हा महिना अजिबात वर्ज्य नाही. मुख्य घराचं बांधकाम या महिन्यात सुरू करू नये, पण आधीपासून सुरू असलेले बांधकाम थांबवू नये. घराऐवजी कुंपण किंवा अन्य कामे करायला हरकत नाही. घराची दुरुस्ती, रंगरंगोटी, फर्निचर वगैरे करायला हरकत नाही. संपूर्ण महिनाभर घरखरेदी, दागिने खरेदी, प्रवास वा अन्य नैमित्तिक कामं निर्धास्तपणे करावी.  

काहींच्या मते पौष हे नाव पुष्य नक्षत्रावरून मिळाले असल्याने नक्षत्र स्वामी शनीचा प्रभाव या महिन्यावर असतो आणि शनिग्रह वैवाहिक सौख्यासाठी मारक असल्याने या महिन्यामध्ये विवाह करू नयेत. पण प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला जे चंद्र नक्षत्र असते त्यावरून त्या महिन्याला नाव मिळाले आहे जसे चित्रा वरून चैत्र, विशाखा वरून वैशाख इत्यादी आणि पौर्णिमेच्या त्या चंद्र नक्षत्राचा त्या महिन्यावर प्रभाव असतो, असे ज्योतिष शास्त्राच्या आधारावर सांगतात. त्यापैकी पौष पौर्णिमेला पुनर्वसु नक्षत्र असते त्यामुळे हा युक्तिवाद तकलादू आणि न पटण्याजोगा वाटतो. 

Mulank 1 Numerology 2026: करिअर आणि व्यवसायात काय बदल होतील? मुलांक 1साठी वर्ष 2026 कसं असेल, काय करावे उपाय?

(नक्की वाचा: Mulank 1 Numerology 2026: करिअर आणि व्यवसायात काय बदल होतील? मुलांक 1साठी वर्ष 2026 कसं असेल, काय करावे उपाय?)

पौष महिन्यात शुभकार्य करत नाहीत ही रुढी बनली आहे म्हणून ती पाळावी. कारण शास्त्रात रुढी बलियेसी, असं वचन आहे, असा युक्तिवाद काहीजण करतात. मात्र वरील वचनात हा पंचमी विभक्तीचा प्रत्यय असून पेक्षा आणि पासून अशा दोन्ही अर्थानं तो वापरला जातो. म्हणून वरील वचनाचा अर्थ शास्त्रापेक्षा रुढी बलवान असा नसून शास्त्रापासून उत्पन्नच झालेली रुढी बलवान असा काढता येईल. अर्थात जी रुढी शास्त्रापासून उत्पन्नच झाली नाही ती न पाळणंच योग्य. दुसरा वेड्यांच्या बाजाराला चाललाय म्हणून आपणही निघावं, हे काही खरं नाही. 

श्रीकेतन कुलकर्णी यांची पोस्ट वाचा

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com