Shardiya Navratri 2024: नवरात्रौत्सवास 3 ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला आहे. विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली आहे. देवीआईच्या आगमनामुळे चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवरात्रीचे नऊ दिवस भाविक देवीची मनोभावे पूजा अर्चना करतात. काही भाविक नवरात्रीचे नऊ दिवस उपवास देखील करतात. पण तुम्हाला नवरात्रीचे व्रत करण्याची, देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत माहिती आहे का? चला जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती....
नवरात्रीमध्ये देवीच्या या नऊ रुपांची केली जाते पूजा
1. शैलपुत्री
2. ब्रह्मचारिणी
3. चंद्रघंटा
4. कुष्मांडी
5. स्कंदमाता
6. कात्यायनी
7. कालरात्री
8. महागौरी
9. सिद्धिदात्री
नवरात्रौत्सवामध्ये देवीच्या या नऊ रुपांची पूजा केली जाते.
(नक्की वाचा: Navratri Colours 2024: नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 रंग, जाणून घ्या प्रत्येक रंगाचे महत्त्व)
व्रत करण्याची पद्धत घ्या जाणून
- नवरात्र व्रतास पुष्कळ घराण्यांमध्ये कुलाचाराचे स्वरूप असते. अश्विन शुद्ध प्रतिपदेस या व्रताचा प्रारंभ होतो.
- घरामध्ये एका स्वच्छ ठिकाणी सिंहारूढ अष्टभुजादेवीची आणि नवार्णयंत्राची स्थापना करावी. यंत्राशेजारी घट स्थापना करावी आणि देवीची विधीवत पूजा करावी.
- नवरात्रमहोत्सवामध्ये कुलाचाराप्रमाणे घटस्थापना आणि मालाबंधन करावे. शेतातील माती आणून जाड चौकोनी थर करावा आणि त्यामध्ये पाच-सात धान्य घालावे. जव, गहू, तीळ, मूग, राळे, सावे आणि चणे ही सप्तधान्ये आहेत.
- मातीचा किंवा तांब्याचा कलश घेऊन त्यामध्ये पाणी, गंध, फुले, दुर्वा, अक्षता, सुपारी, पंचपल्लव, पंचरत्ने किंवा नाणी इत्यादी वस्तू त्यामध्ये ठेवाव्या.
- सप्तधान्ये आणि घट स्थापनेचे वैदिक मंत्र येत नसल्यास पुराणोक्त मंत्र म्हणावे. तेही येत नसल्यास त्या-त्या वस्तूंचे नाम घेऊन ‘समर्पयामि' म्हणून नाममंत्रांचा विनियोग करावा. कलशापर्यंत माळ पोहोचेल अशा पद्धतीने ती व्यवस्थित बांधावी.
- नऊ दिवस प्रतिदिन कुमारिकेची पूजा करून तिला भोजन घालावे.
- अखंड दीपप्रज्वलन करून, उपवास आणि जागरण इत्यादी कार्यक्रमांसह नवरात्रमहोत्सव साजरा करावा.
(नक्की वाचा: Navratri Wishes 2024: अंबाबाईचा उदो उदो! नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी पाठवा हे मेसेज)
विशेष नैवेद्य
नवरात्री उत्सवामध्ये देवीच्या नैवेद्यासाठी सात्त्विक पदार्थांचे भोजन तयार करावे. नेहमीच्या पदार्थांव्यतिरिक्त विशेषकरून पुरण आणि वरण या पदार्थांचा समावेश करावा.
(नक्की वाचा: कोल्हापूरचा ऐतिहासिक शाही दसरा महोत्सव, 3 ते 12 ऑक्टोबरपर्यंत या विशेष कार्यक्रमांचे आयोजन)
देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत
- देवीला अर्पण करण्यासाठीची साडी सुती किंवा रेशमी कापडाची असावी, असे म्हणतात.
- दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी, त्यावर खण आणि नारळ ठेवावा. आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल, अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे.
- जीवनात चैतन्य मिळावे आणि आध्यात्मिक उन्नती व्हावी, अशी प्रार्थना देवीच्या चरणी करावी.
- साडी, खण आणि नारळ देवीच्या चरणी अर्पण करावा. त्यानंतर तांदळाने देवीची ओटी भरावी.
- देवीच्या चरणांवरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करावे आणि नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करावा.
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Nashik Navratri 2024 | सप्तश्रृंगी गडावर भक्तिमय वातावरण, देवीच्या अलंकाराची पूजा
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world