Shardiya Navratri 2024: देशभरात नवरात्रौत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. घराघरांत-मंडपांमध्ये देवीचे थाटामाटात आगमन झाले आहे. राज्यातही नवरात्रौत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. राज्यभरामध्ये नवरात्रौत्सव कशा पद्धतीने साजरा करण्यात येत आहे? याचा आढावा आपण घेऊया...
कोल्हापूर :
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या मंदिरामध्ये नवरात्रौत्सवास मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. रंगीबेरंगी फुलांची आकर्षक आरास आणि विद्युत रोषणाईमुळे मंदिराचे सौंदर्य खुलले आहे. उत्सवाच्या पूर्वसंध्येला राज्यातील विविध जिल्ह्यांमधून देवीची ज्योत नेण्यासाठी आलेल्या भाविकांनी देवीमातेच्या जयघोषाने देवीच्या जागराला सुरुवात केली. सकाळी 8.30 वाजता तोफेच्या सलामीने अंबाबाईची घटस्थापना विधीस शुभारंभ करण्यात आला.
(नक्की वाचा: Navratri Colours 2024: नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 रंग, जाणून घ्या प्रत्येक रंगाचे महत्त्व)
नांदेड :
जिल्ह्यातील माहुर नगरी देखील नवरात्रौत्सवासाठी सज्ज झाली आहे. आई रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. आई रेणुका देवीची महापूजा झाल्यानंतर घटस्थापनेला विधिवत सुरुवात झाली. नवरात्रौत्सवामध्ये माहुर गडावर देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. मुंबई आणि कोकण भागातून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते. यंदाही माहुरगडावर खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पण भाविकांच्या सोयीसाठी गडावर जाण्यासाठी 24 तास बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गडावर 24 तास रुग्णालय आणि अॅम्ब्युलन्सची देखील सोय करण्यात आली आहे.
(नक्की वाचा: Navratri Wishes 2024: अंबाबाईचा उदो उदो! नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी पाठवा हे मेसेज)
तुळजाभवानीच्या मंदिरात नवरात्रौत्सवाला सुरुवात#tuljabhavanitemple #Navratri2024 #NDTVMarathi pic.twitter.com/eXLYVvvLfR
— NDTV Marathi (@NDTVMarathi) October 3, 2024
रत्नागिरी :
नवरात्रौत्सवानिमित्त रत्नागिरीमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे श्री दुर्गामाता दौड काढण्यात आली. रत्नागिरी शहर आणि आसपासच्या 15-20 गावांमधील धारकरी मोठ्या संख्येने या दौडमध्ये सहभागी होत असतात. दुर्गामाता दौड घटस्थापना ते विजयादशमी या कालावधीत काढण्यात येते. या दौडमध्ये धारकरी पारंपरिक पेहरावामध्ये सहभागी होतात. दररोज तीन-चार देवींचे दर्शन घेण्यात येते. पहिल्या दिवशी मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून या दौडला प्रारंभ करण्यात आला.
(नक्की वाचा: Navratri 2024: नवरात्रौत्सवाचा पहिला दिवस कधी? जाणून घ्या घट स्थापनेचा शुभ मुहूर्त)
बीड :
आंबेजोगाई येथील श्री योगेश्वरी देवी मंदिरामध्येही नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला आहे. बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते सकाळी घटस्थापना करण्यात आली. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये वेगवेगळ्या रंगांच्या पैठणी तसेच अलंकार देवीला परिधान करून देवीची पूजा करण्यात येते.
अमरावती :
विदर्भाची कुलस्वामिनी म्हणून प्रसिद्धी असलेल्या अमरावतीतील अंबादेवी मंदिरामध्येही नवरात्रौत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. अंबादेवीला विदर्भाचे कुलदैवत म्हणून संबोधले जाते. अमरावती शहराची पौराणिकदृष्ट्या ओळख आहे, कौंडण्यपूर येथील विदर्भ राज्य करणाऱ्या भीष्मक राजाने आपली सुकन्या रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी ठरवला होता, तो तिला अमान्य होता. तिने श्रीकृष्णाला आपली इच्छा कळवताच श्रीकृष्णाने कौंडण्यपूर येथे येऊन माता रुक्मिणीचे हरण केले आणि याच अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात आणून अंबादेवी मंदिरात भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीशी विवाह केल्याची आख्यायिका आहे. श्रीकृष्ण काळापासून हे मंदिर अस्तित्वात असून आजही अमरावती शहरातील तिचे स्थान जागृत समजले जाते. अंबादेवी संस्थानमध्ये नऊ दिवसांचा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
पंढरपूर :
नवरात्रौत्सवानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामध्ये भाविक राम जांभुळकर यांनी फुलांची आकर्षक सजावट केली आहे. घटस्थापनाचे प्रतीक असणाऱ्या कलशाची प्रतिकृती फुलांच्या सजावट करून साकारण्यात आली आहे.
चंद्रपूर :
महाकाली मंदिरामध्ये शारदीय नवरात्र उत्सावास भंडारा उधळून शुभारंभ करण्यात आला आहे. विधिवत मंत्रोच्चारासह सकाळी घटस्थापना करण्यात आली. महाआरतीनंतर हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. चंद्रपूरकरांची कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात देवी महाकालीच्या दर्शनाने करतात. प्रजाहित दक्ष गोंड राणी 'हिराई'ने बांधलेल्या या मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश प्रामुख्याने या चार राज्यातील भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात.
नाशिक :
नाशिकमधील कालिका माता मंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केली आहे. सकाळी 7 वाजता महाआरती करून मंदिर भाविकांसाठी 24 तासांकरिता खुले करण्यात आले आहे. भाविकांची गर्दी पाहता खबरदारी म्हणून मंदिर परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली आहे आणि कडेकोट बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.
पालघर :
पालघर जिल्ह्यातील विरार परिसरातील जीवदानी मातेच्या दर्शनासाठी जीवधन गडावर शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. 900 फूट उंचावर असलेल्या आणि 1 हजार 365 पायऱ्या असलेल्या पांडव कालीन मंदिराला वसई, विरार, पालघर, ठाणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र आणि गुजरातमधील लाखो भाविक भेट देतात.
एकविरा देवी
कार्ला गडावरील एकविरा देवीच्या मंदिरामध्ये भाविकांनी पहिल्याच दिवशी मोठी गर्दी केली. धार्मिक विधी परंपरेनुसार विधिवत गुरुवारी (3 ऑक्टोबर) सकाळी 8 वाजता एकविरा देवीच्या मंदिरात घटस्थापना करण्यात आली. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी कार्ला गडावर आई एकविराचे दर्शन घेतले.
तुळजाभवानी मंदिरात जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी सपत्नीक घटस्थापनेची संतोष पूजा केली. जिल्हाधिकाऱ्यांसह मंदिर संस्थांचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटील, तुळजाभवानीचे महंत पुजारी आणि भाविकांच्या उपस्थितीत ही घटस्थापना करण्यात आली.
MumbaDevi Navratri 2024 | नवरात्रौत्सवासाठी मुंबादेवी मंदिर सज्ज | NDTV मराठी
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world