
वारंवार लघवीला जाणे ही एक त्रासदायक समस्या असू शकते. दिवसातून आठ ते दहा वेळा लघवीला जाणे हे सामान्य आहे. मात्र त्यापेक्षा जास्त वेळा लघवीला जाण्याची गरज भासत असेल तर ते आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरु शकते. वारंवार लघवी होण्याची समस्या ही सामान्यत: मूत्रमार्गात किंवा लघवीच्या मार्गात काही बिघाड झाल्यास उद्भवते. जर आपल्याला दिवसातून 8 पेक्षा जास्त वेळा लघवीला होत असेल तर लघवी येण्याशी संबंधित आजार उद्भवू शकतात. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. प्रवास करत असताना किंवा शौचालये जवळपास नसलेल्या सार्वजनिक ठिकाणी अनेकदा लघवी करण्याची निकड खूप मोठी समस्या असू शकते. महिलांना या समस्येचा अधिक सामना करावा लागतो असं युरोलॉजिस्ट डॉ. आदित्य देशपांडे यांनी सांगितलं.
काय आहेत या मागची कारणं
• जास्त पाणी किंवा द्रव पदार्थांचे सेवन
• मधुमेह म्हणजेच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे लघवीची वारंवारता वाढते
• मूत्रमार्गाचा संसर्ग (युटीआय)
• मूत्राशय कमकुवत होणे किंवा संसर्ग होणे
• कॅफिन व मद्यपानाचे अति सेवन
• गर्भावस्था – गर्भाशयाचा दाब मूत्राशयावर पडल्यामुळे
• पुरुषांमध्ये प्रोस्टेटशी संबंधित समस्या
काय आहेत लक्षणं
• वारंवार लघवीला जावे लागणे
• लघवी करताना जळजळ किंवा वेदना
• लघवीवर नियंत्रण न राहणे, रात्री वारंवार उठून लघवीला जाणे
• लघवी पूर्ण न झाल्याची भावना
कसे कराल उपाय
• पाण्याचे सेवन संतुलित करणे; खूप कमी किंवा खूप जास्त पाणी पिण्याचे टाळावे
• कॉफी, चहा व मद्यपानाचे सेवन कमी करणे
• स्वच्छतेकडे लक्ष देणे, विशेषतः मूत्रमार्गाच्या संसर्गापासून बचावासाठी स्वच्छतेचे पालन करणे
• जास्त वेळ लघवी दाबून न ठेवणे
• हलके व्यायाम, योगासन व केगल व्यायामाने मूत्राशय बळकट करणे
• वारंवार जळजळ, वेदना किंवा रक्तस्राव आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या
सतत लघवीला जाणे ही एक गंभीर समस्या नसली तरी बऱ्याचदा एखादा आजार यामागचे मुळ कारण असू शकते. योग्य जीवनशैली, स्वच्छता व संतुलित आहार यामुळे ही समस्या कमी दूर करता येऊ शकते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world