Belly Fat Burning Yoga Asanas: शरीराची पचनसंस्था कमकुवत असेल तर पोटाच्या आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होणे साहजिकच आहे. पोट दुखणे, गॅस, अपचन, बद्धकोष्ठता, पित्त, पोटावर अतिरिक्त चरबी वाढणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात. या समस्यांपासून कायमस्वरुपी सुटका हवी असल्यास आपल्या वर्कआऊट रुटीनमध्ये काही आसनांचा समावेश नक्की करावा. यामुळे तुमच्या शरीराची पचनशक्ती-पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळू शकते.
योगासनांमुळे संपूर्ण शरीरासह मानसिक आरोग्यासही फायदे मिळतात. तसेच काही आसनांच्या नियमित सरावामुळे थेट पोटाच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात आणि पोटाशी संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळते. कित्येकदा मानसिक ताणतणावामुळेही पोटाचे विकार उद्भवतात. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी या लेखाद्वारे आपण काही आसनांची माहिती जाणून घेऊया, जेणेकरून बेलीफॅट कमी होण्यापासून ते शरीराची पचनप्रक्रिया सुधारण्यापर्यंत अगणित तुम्हाला लाभ मिळतील.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पोटाच्या आरोग्यासाठी या आसनांचा करा सराव (Yoga Poses For Stomach Problems)
1. अर्ध पवनमुक्तासन
गॅसची समस्या असल्यास अर्ध पवमुक्तासनाचा सराव करणे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
अर्ध पवनमुक्तासनाचा सराव कसा करावा?
- अर्ध पवनमुक्तासनाचा अभ्यास करण्यासाठी सर्वप्रथम योगमॅटवर पाठीच्या बाजूने झोपावे.
- हाताचे पंजे जमिनीच्या दिशेने ठेवावे, दोन्ही पाय सरळ ठेवा.
- आता उजवा पाय 30 अंश डिग्रीमध्ये वर उचलावा आणि गुडघ्यामध्ये दुमडून आपल्या छातीजवळ आणावा व दोन्ही हाताने गुडघा धरावा.
- अर्ध पवनमुक्तासनाची ही अंतिम स्थिती होय.
- आपल्या क्षमतेनुसार आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये राहावे आणि त्यानंतर पूर्वस्थितीमध्ये यावे.
- आता हीच प्रक्रिया डाव्या पायासोबतही करावी.
- आपल्या क्षमतेनुसार सराव केल्यानंतर शरीर शिथल करावे.
(नक्की वाचा : Lemon Water Benefits: उन्हाळ्यात लिंबू पाणी प्यायल्यास मिळतील हे फायदे)
2. धनुरासन
धनुरासनाच्या (Dhanurasana) सरावामुळे संपूर्ण शरीराला चांगला ताण मिळतो. यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळते.
धनुरासनाचा सराव कसा करावा?
- योगमॅटवर आपल्या पोटाच्या बाजूने झोपावे. हात व पाय सरळ ठेवा.
- यानंतर पाय गुडघ्यामध्ये दुमडा व तळवे वर उचला.
- आपल्या हातांच्या बोटांच्या मदतीने पायाचे घोटे पकडा आणि दोन्ही पाय वरील बाजूने उचलण्याचा प्रयत्न करावा.
- छातीचा भाग देखील वर उचलावा.
- आता तुमच्या पोटावर ताण येईल. यामुळे पोटाच्या भागातील अवयवांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल.
- अंतिम स्थितीमध्ये तुमच्या शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे दिसेल, म्हणूच या आसनास 'धनुरासन' असे म्हणतात.
- आपल्या क्षमतेनुसार आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये राहावे.
- ज्या पद्धतीने आसनाची अंतिम स्थिती धारण केली, त्याच उलट क्रमाने आसनातून बाहेर यावे.
- धनुरासनामुळे पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळू शकते.
(नक्की वाचा : Health Tips: नेहमीच्या चहाऐवजी प्या 'हा' पिवळ्या रंगाचा चहा)
3. उत्तानासन
उत्तानासन हे शरीराच्या पचनप्रक्रियेसाठी सर्वोत्तम आसन मानले जाते. यामुळे शरीराची लवचिकताही वाढते आणि शरीराचे स्नायू देखील मजबूत होतात.
उत्तानासनाचा सराव कसा करावा?
- सर्व प्रथम मॅटवर उभे राहा.
- दोन्ही हात-पाय सरळ ठेवा.
- तोल जात आहे, असे वाटत असल्यास दोन पायांमध्ये समान अंतर ठेवावे.
- यानंतर दोन्ही हात हळूहळू वरील बाजूस न्यावे. लयबद्ध पद्धतीने हात जमिनीच्या दिशेला आणा व शक्य असल्यास आपल्या पंजाने पायांचे घोटे पकडा अथवा पंजे आपण जमिनीवर ठेवू शकता.
- क्षमतेनुसार आसनाच्या अंमित स्थितीमध्ये राहावे आणि त्यानंतर आसनातून बाहेर यावे.
- उत्तानासनाचा सराव करताना पाय गुडघ्यांमध्ये वाकवू नये.
4. शवासन
तणाव हे देखील पोटाशी संबंधित समस्यांमागील प्रमुख कारण असू शकते. मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी नियमित शवासनाचा सराव करावा. यामुळे पोटाला देखील आराम मिळतो.
शवासनाचा सराव कसा करावा?
- शवासनाचा अभ्यास करण्यासाठी योगमॅटवर झोपावे.
- दोन्ही पायांमध्ये किंचितसे अंतर ठेवा.
- दोन्ही हात शरीरापासून किंचितसे दूर ठेवा. पंजे आकाशाच्या दिशेने ठेवावे.
- डोके कोणत्याही एका बाजूला झुकवावे.
- डोळे बंद करून श्वासोच्छवासाची प्रक्रिया सुरू ठेवावी. आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रीत करावे.
- एक-एक करून प्रत्येक अवयवांवर लक्ष केंद्रीत करावे.
- डोळे बंद ठेवूनच 5 ते 10 मिनिटांनंतर शरीर एका कुशीवर वळवावे आणि अलगद उठावे.
- यानंतर दोन्ही पंजांचे एकमेकांवर घर्षण करावे आणि यानंतर पंजे डोळ्यांवर ठेवा व नंतर डोळे उघडा.
शवासनाच्या सरावामुळे रक्तदाबाची समस्या कमी होण्यास मदत मिळते. शिवाय एकाग्रता वाढून तणाव कमी होतो, निद्रानाश, डोकेदुखी आणि शारीरिक-मानसिक थकवा यासारख्या समस्याही दूर होण्यास मदत मिळते.
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.