Winter Health Tips: इतरांच्या तुलनेत तुम्हाला देखील जास्त प्रमाणात थंडी लागते का? गोधडी किंवा हीटरमुळेही तुम्हाला ऊब जाणवत नाही का? तर तुमचे शरीर गंभीर संकेत देतंय, त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण केवळ हवामानातील बदलामुळे थंडावा जाणवत नाही तर शरीरातील काही कमतरतांमुळे ही समस्या उद्भवते शकते. कोणत्या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे जास्त प्रमाणात थंडी लागते, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
कोणत्या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे जास्त थंडावा जाणवतो| Kontya Vitaminschya Kamimule Thandi Lagte
व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D च्या कमतरतेमुळे जास्त थंडी लागते. शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यामध्ये हे दोन्ही व्हिटॅमिन्स महत्त्वाची भूमिका बजावतात. शरीरात या जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण झाल्यास थंडी लागू शकते.
1. व्हिटॅमिन B12
व्हिटॅमिन B12 शरीरातील लाल रक्तपेशींच्या (Red Blood Cells) निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. या रक्तपेशी शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा करतात. व्हिटॅमिन बी12ची कमतरता निर्माण झाल्यास शरीरामध्ये लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये अडथळे निर्माण होतात, यामुळे अॅनिमिया यासारख्या आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. अॅनिमियासारख्या आजारामध्ये शरीराच्या विविध अवयवांपर्यंत पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन आणि ऊब पोहोचत नाही, परिणामी जास्त थंडी लागते.
2. व्हिटॅमिन D
व्हिटॅमिन डीचा उत्तम स्त्रोत म्हणजे सूर्यप्रकाश, याद्वारे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते आणि शरीरावरील सूजही कमी होण्यास मदत मिळते. संशोधनातील माहितीनुसार, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळेही थंडी लागते आणि हिवाळ्यातील आजारांचाही संसर्ग सहजरित्या होऊ शकतो. यामुळे थायरॉइड ग्रंथींच्या कार्यप्रणालीवरही दुष्परिणाम होतात, शरीराचे तापमान नियंत्रित करणारी थायरॉइड ही महत्त्वाची ग्रंथी मानली जाते.

Photo Credit: Canva
थंडी कमी करण्यासाठी काय खाल्ले पाहिजे?
- शरीरामध्ये उष्णता निर्माण करणाऱ्या खाद्यपदार्थांचा डाएटमध्ये समावेश करावा.
- लोह आणि व्हिटॅमिन B12 युक्त खाद्यपदार्थ उदाहरणार्थ पालक, बीट, अंडी, मासे, चिकन आणि दुग्धजन्य पदार्थ.
- आले आणि लसणाचा चहा किंवा सूपमध्ये समावेश करावा. यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते आणि शरीराची चयापचयाची गती जलद होते.
- बदाम, अक्रोड आणि खजूर यासारख्या उष्णता निर्माण करणाऱ्या सुकामेव्याचा डाएटमध्ये समावेश करावा.
- दालचिनी, हळद आणि काळी मिरी यासारख्या गरम मसाल्यांचेही सेवन करावे.

Photo Credit: Canva
हुडहुडी पळवण्यासाठी या 'सुपरफूड्स'चा डाएटमध्ये करा समावेश
हिवाळ्यातील थंडीच्या त्रासातून सुटका करुन घेण्यासाठी उबदार कपड्यांसह डाएटमध्ये योग्य खाद्यपदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे.
कंदमुळं (Root Vegetables): गाजर, रताळं (Sweet Potato) आणि बटाटा यासारख्या कंदमुळांचा डाएटमध्ये समावेश करावा. या कंदमुळांचं पचन धीम्या गतीने होतं, परिणामी पचनप्रक्रियेदरम्यान शरीरामध्ये उष्णता निर्माण होऊ लागते. या कंदमुळांपासून तुम्ही सूप तयार करून पिऊ शकता. रताळ्यामध्ये व्हिटॅमिन A आणि व्हिटॅमिन Cचे प्रमाण जास्त आहे.
अख्ख्या डाळी (Whole Grains): दलिया (Oats), बाजरी आणि ब्राउन राइसचाही डाएटमध्ये समावेश करावा. सकाळच्या नाश्त्यामध्ये दुधासह दलिया खाल्ल्यास शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहण्यास मदत मिळेल.
तूप (Healthy Fats): थंडीमध्ये शरीराला खाद्यपदार्थांद्वारे हेल्दी फॅट्सचा पुरवठा होणे आवश्यक आहे. यासाठी डाएटमध्ये तूप, अॅव्होकाडो आणि सुकामेव्यांचा समावेश करावा. डाळ किंवा पोळीमध्ये तुपाचा समावेश करावा.
खजूर आणि गूळ (Dates and Jaggery): हिवाळ्यात गोड खाण्याची इच्छा झाल्यास साखरेऐवजी गूळ किंवा खजुराचे सेवन करावे. दोन्हीमध्ये लोहाचे प्रमाण अधिक आहे, यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा तसेच ऊब मिळते. रात्री झोपण्यापूर्वी दुधासह गुळाचा छोटा तुकडा खाणे फायदेशीर ठरेल.

Photo Credit: Canva
शरीराला जास्त थंडी लागण्यामागील अन्य कारणं
- शरीरातील व्हिटॅमिनच्या कमतरतेसह अन्य प्रमुख कारणांमुळेही थंडी जास्त प्रमाणात लागू शकते. पहिले कारण म्हणजे अॅनिमिया आजार, यामुळे शरीरामध्ये लोहाची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे लाल रक्तपेशींचे प्रमाण कमी होते. परिणामी शरीराला ऊब मिळत नाही आणि ऑक्सिजनच्या प्रवाहावरही दुष्परिणाम होतात.
- दुसरी थायरॉइडची समस्या (Hypothyroidism). या स्थितीमध्ये थायरॉइड ग्रंथींना पुरेशा प्रमाणात हार्मोन्स तयार करण्यास अडथळे निर्माण होतात, ज्यामुळे चयापचयाची गती मंदावतो आणि शरीरामध्ये उष्णता कमी प्रमाणात तयार होते.
- तिसरे कारण म्हणजे रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळे. रक्तवाहिन्यांच्या समस्यांमुळे हात आणि पाय यासारख्या अवयवांपर्यंत रक्ताचा पुरवठा होत नाही, ज्यामुळे हे अवयव कायम थंड पडतात.
- चौथे कारण म्हणजे शरीराचे वजन कमी असणे किंवा शरीरामध्ये चरबीचे प्रमाण कमी असणे. चरबी शरीरासाठी इन्सुलेटर प्रमाणे कार्य करते. कमी वजनाच्या लोकांच्या शरीरामध्ये उष्णता टिकून राहणं कठीण असतं.
- पाचवे कारण म्हणजे शरीरातील पाण्याच्या कमतरतेमळेही शरीराच्या तापमानावर परिणाम होऊ लागतात. डिहायड्रेशनमुळे शरीरातील उष्णता कमी होऊ शकते.
- डॉक्टरांचा सल्ला आणि रक्ततपासणी: सर्वप्रथम डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D, थायरॉइडशी संबंधित रक्ततपासणी करावी.
- ऊबदार कपडे : हिवाळ्यामध्ये ऊबदार कपडे परिधान करावे. कानामध्ये कापूस घालावा.
- व्यायाम: नियमित 30 मिनिटे हलक्या स्वरुपातील व्यायाम करावा यामुळे रक्तप्रवाह सुधारण्यास मदत मिळेल आणि शरीरामध्ये नैसर्गिक स्वरुपात उष्णता निर्माण होईल.
- जास्तीत जास्त पाणी प्यावे: हिवाळ्यामध्ये लोक कमी प्रमाणात पाणी पितात, पण पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे.
- गरम तेलाने मसाज: हात आणि पायांचा मोहरी किंवा तिळाच्या तेलाने मसाज करावा, यामुळे या अवयवांमध्ये रक्तप्रवाह वाढेल.
- कोणत्याही कारणाशिवायच तुम्हाला वारंवार थंडी वाजत असेल तर हे शरीरातील व्हिटॅमिन बी12, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे, अॅनिमिया, थायरॉइड यासारख्या आजारांचे संकेत असू शकतात. या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world