
World Mental Health Day 2025: प्रत्येक ठिकठिकाणानुसार मनावर वेगवेगळे परिणाम होत असतात. तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक खोलीमध्येही वेगळे वाटत असेल. ज्या ठिकाणी भजन, कीर्तन किंवा ध्यानधारणा सुरू असेल तेथील कंपनांमुळे मन शांत होते. अशा ठिकाणांमध्ये सकारात्मक ऊर्जा असते. वेळ आणि बदलत्या ऋतूंचेही मनावर प्रभाव होतात. आपण ज्या खाद्यपदार्थांचे सेवन करतो, त्यांचेही मनावर सकारात्मक तसेच नकारात्मक परिणाम होत असतात. सात्विक भोजनामुळे मन प्रसन्न राहतं तर तामसिक खाद्यपदार्थांमुळे मन अस्थिर वाटू लागते. आपली कर्म आणि भूतकाळातील अनुभवही मनावर छाप सोडतात. सजगता, जागरूकता, ज्ञान आणि ध्यान यामुळे मनावर झालेले परिणाम दूर करण्यास मदत मिळू शकते. आपण ज्या लोकांशी तसेच ज्या घटनांशी जोडलेले असतो, ते आपल्या मनाची दिशा ठरवतात. कधीकधी काही लोकांच्या सहवासात मनाला आराम-शांतता मिळते, तेच काही लोकांमुळे मन अस्थिर होते.
या सर्व गोष्टींचा मनासह आपल्या जीवनावरही परिणाम होतो.
मनाला प्रभावित करणारे तत्त्व
काही तत्त्व आपल्या मनाला प्रभावित करतात; ज्यामध्ये जागा, काळ, आहार, संस्कार, संगत आणि कर्म या गोष्टींचा समावेश आहे.
अस्थिरतेचे पाच प्रकार
1. जागेमुळे येणारी अस्थिरता
कधीकधी एखाद्या ठराविक जागा किंवा घरामध्ये मन अस्थिर होऊ लागते. जागा बदलल्यानंतर मनाला आराम मिळतो. भजन, कीर्तन, लहान मुलांचे हसणं-खेळणं यासारख्या गोष्टीं पाहून-ऐकून त्या-त्या जागांचे तरंग बदलू लागतात आणि मनावरही याचे सकारात्मक परिणाम होऊ लागतात.
2. शारीरिक अस्थिरता
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाची कमतरता किंवा जास्त प्रमाणात काम करणे यासारख्या गोष्टींमुळे शरीरामध्ये अस्थिरता निर्माण होते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी नियमित व्यायाम, कामाचे नियोजन करणे, फळांचे सेवन करावे.
3. मानसिक अस्थिरता
महत्त्वाकांक्षा, अतिविचार, राग, द्वेष यामुळे मानसिक अस्थिरता निर्माण होऊ लागते. ही समस्या दूर करण्यासाठी जीवनाकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहा, आत्मचिंतन करावे आणि सारं काही नश्वर आहे, असा विचार केल्यास सर्व काही क्षुल्लक वाटेल आणि मानसिक शांतता लाभेल.
4. भावनात्मक अस्थिरता
भावनिक अस्थिरता दूर करण्यासाठी केवळ ज्ञान मिळवणं पुरेसे नाही तर सुदर्शन क्रिया यासारख्या साधना केल्यास भावनात्मक अस्थिरता दूर होण्यास मदत मिळेल.
5. आत्मिक अस्थिरता
ही गोष्ट फार दुर्मीळ आहे. जेव्हा सर्व काही निरर्थक आणि शून्य वाटू लागतील तेव्हा तुम्ही खूप भाग्यवान आहात, असे समजा. या गोष्टीपासून दूर पळू नका, ती स्वीकारा. हीच आध्यात्मिक अस्वस्थता खऱ्या अर्थाने प्रार्थनेला जन्म देते. याच गोष्टीमुळे जीवनात चमत्कार घडतो आणि पूर्णत्व प्राप्त होते. तुमच्यातील हीच तळमळ तुम्हाला देवाशी एकरुप करते. सत्संग आणि आत्मज्ञानी व्यक्तीच्या उपस्थिती ही अस्थिरता शांततेत बदलते. देवाचे अस्तित्व प्रत्येक प्राणी, वनस्पतींमध्ये आहे. केवळ देवच देवाची उपासना करू शकतो, म्हणजेच जेव्हा तुम्ही तुमचे दिव्यत्व ओळखता तेव्हाच खरी भक्ती होणे शक्य आहे.
जागरुकता वाढल्याने तुम्ही सत्याच्या जवळ पोहोचता
जितकी तुमच्यातील जागरुकता वाढेल तितके तुम्ही सत्याच्या जवळ पोहोचाल. याकरिता जीवनशक्तीचा विस्तार करणे आवश्यक आहे. ही शक्ती सात्विक आहार, प्राणायाम, ध्यान, मौन साधना, सुदर्शन क्रिया आणि निष्काम सेवा केल्यास वाढते असे म्हणतात. मनातील चिंता कमी करण्यासाठी ध्यानधारणेपेक्षा अन्य कोणत्याही गोष्टी प्रभावी ठरू शकणार नाहीत.
ध्यानधारणेची प्रक्रिया सोपी करण्यासाठी श्री श्री रविशंकर यांनी तीन सोपी तत्त्वं सांगितली आहेत, पुढील प्रमाणे
1. इच्छा
जेव्हा तुम्ही ध्यानधारणा करण्यासाठी बसता, त्यावेळेस आपल्या सर्व इच्छा एकाबाजूला ठेवा. त्या इच्छा पुन्हा मनात येऊ शकतात, पण त्यावेळेस त्यापासून मुक्त व्हा.
2. विशेष प्रयत्न करू नका
ध्यान करण्याचा अर्थ म्हणजे काहीही न करणे. एकाग्र होण्याची आवश्यकता नाही, विचारांना दूर करण्याची आवश्यकता नाही, कोणतेही विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही, सर्व काही मुक्त सोडून द्या.
3. स्वतःची ओळख विसरा
आपण स्वतःवर कित्येक गोष्टींचे लेबल लावतो. मी शहाणा आहे, मी मूर्ख आहे, मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, मी सद्गुणी आहे, मी पापी आहे, इत्यादी; जेव्हा तुम्ही ध्यान करत बसता तेव्हा या सर्व गोष्टी सोडून द्या. त्या-त्या क्षणांसाठी तुम्ही कोणीही नाही, असा विचार करा. मला काहीही नकोय, मी काहीही करत नाही, मी कोणीही नाहीय, असे जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही स्वतःपासून मुक्त होता. तुम्ही त्या सुंदर शून्यतेच्या अनुभवात प्रवेश करता आणि शून्य हाच प्रत्येक गोष्टीचा आधार आहे.
ध्यान करण्याची योग्य वेळ (Best Time to Meditate)
जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर दोन ते तीन तासांचा कालावधी म्हणजे ध्यानधारणा करण्याची सर्वोत्तम वेळ. जेवणानंतर पचनप्रक्रिया जलद होते पण ध्यान करताना शरीराची गती मंदावते. त्यामुळे जेवणानंतर लगेचच तुम्ही ध्यानधारणा करण्यास सुरुवात केली तर तुम्हाला झोप येईल आणि अन्नाचे पचन योग्यरित्या होणार नाही. त्यामुळे झोपेतून उठल्यानंतर सकाळच्या वेळेस ध्यानधारणा करावी. दुपारच्या जेवणानंतरही ध्यान करू शकता, केवळ लगेचच करू नका.
ध्यान करण्याची सोप पद्धत
- डोळे बंद करा आणि शरीर सैल सोडा.
- दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना खांदे पूर्णपणे सैल सोडा.
- हळूहळू श्वास घ्या आणि खांदे कानांच्या बाजूने वर उचला. श्वास सोडताना खांदे पुन्हा सैल सोडा, हीच क्रिया पुन्हा एकदा करावी.
- हात सैल सोडा आणि चेहऱ्यावर हास्य ठेवा.
ध्यानात मग्न होण्याचे उपाय (Ways to Deepen Your Meditation)
ध्यान करताना तुम्हाला चांगला अनुभव येत नसेल त्यावर अधिक जोर देऊ नका. जेव्हा तुम्ही एखाद्याला आराम किंवा मुक्तता या गोष्टींचा अनुभव मिळवून देता तेव्हा याद्वारे तुम्हाला मिळणारे पुण्य आणि आशीर्वादामुळे तुम्ही ध्यानात बुडून जाता.
ध्यान करण्यापूर्वी प्राणायाम करणंही आवश्यक आहे. श्वास हे शरीर आणि मनामधील सेतू आहे. सुदर्शन क्रिया यासारख्या अभ्यासांमुळे ध्यान करण्याची प्रक्रिया सोपी होण्यास मदत मिळते.
(नक्की वाचा: Health News: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे डोक्यात घाणेरडे विचार येतात? हे खाणे करा सुरू गायब होतील सर्व वाईट विचार)
नियमित ध्यान करण्याचे परिणाम
तुम्हाला कधी अस्वस्थता किंवा भीती वाटत असेल तर थोडा वेळ ध्यानधारणा करावी. सात मिनिटे ध्यान केल्यास तणाव लगेचचा दूर होऊ शकतो. आरामदायी स्थिती बसा, डोळे बंद करा आणि शांतता अनुभवा. नियमित स्वरुपात ध्यान केल्यास मनाला खोलवर विश्रांती मिळते तसेच तुम्ही सतर्कही होता. मन शांत होते, शरीराची ऊर्जाही वाढते.
(नक्की वाचा: Rudraksha Benefits: रुद्राक्षचे पाणी प्यायल्यास काय होते? तज्ज्ञांनी सांगितले जबरदस्त फायदे)
Gurudev Sri Sri Ravi Shankar: Stress, Anxiety पासून ते Relationship, Spirituality पर्यंत सर्व गोष्टींबाबत साधलेला संवाद
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world